हडफडेत क्लबला आग लागू्न अग्नितांडव, तर जिल्हा पंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला

पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या क्लबला भीषण आग लागून दुर्घटनेत २५ जण ठार झाले. वेर्णा औद्योगिक वसाहत तसेच अन्य ठिकाणीही आगीच्या घटना घडल्या. जिल्हा पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरुच आहे. याशिवाय चोरी, ड्रग्ज प्रकरणे तसेच राज्यातील विविध अपघातांत अनेकांना प्राण गमवावे लागले. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार

हडफडेत क्लबला आग लागून २५ ठार
हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या प्रसिद्ध क्लबमध्ये भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २५ जण ठार झाले आहेत. तर सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये क्लबच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. लाकडी फर्निचरमुळे आग वेगाने पसरली व मोठी दुर्घटना घडली.
बेतूल येथे पोहण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता
बेतूल येथील ओएनजीसी येथे कामाला असलेला सुरजीत सिंग (२२, रा. मूळ उत्तरप्रदेश) हा आपल्या सहकार्यांसह नदीवर गेला होता. दुपारच्या सुमारास तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता पाण्याच्या अंदाज न आल्याने बुडाला. यानंतर कुंकळ्ळी अग्निशामक दलाने शोधमोहीम राबवली परंतु तो सापडून आला नाही.
वागातोर, आसगावातील क्लब, ब्यूटीक रिसॉर्ट आस्थापने सील
रोमिओ लेनचा वागातोर येथील क्लब आणि आसगाव मधील ब्यूटीक रिसॉर्ट मामलेदार कार्यालयाकडून सील करण्यात आला आहे. सुरक्षात्मक उपाय व्यवस्थेची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवत सरकारच्या आदेशानुसार रोमिओ लेनच्या या दोन आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
सोमवार

गौरव लुथरा, सौरभ लुथरा थायलंडला पसार
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये घडलेल्या अग्नितांडव प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि क्लबचे मालक गौरव लुथरा व सौरभ लुथरा हे थायलंडला पसार झाले आहेत. क्लबचे गोवा प्रमुख करणसिंग कोहली (४९, दिल्ली) याला गोवा पोलिसांनी दिल्ली येथे अटक केली.
जादा परताव्याचे आमिष दाखवून एकाला ६७ लाख रुपयांचा गंडा
तिसवाडी तालुक्यातील एका नागरिकाला जादा परताव्याचे आमिष दाखवून ६७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
काजू बागायतीमध्ये साफसफाईसाठी गेलेल्या राम गोविंद गावकर (रा. बेंदुर्डे बाळळी) यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. यात जखमी गावकर यांचा मृत्यू झाला.
मंगळवार

‘रोमिओ लेन’च्या अतिक्रमणावर बुलडोझर
हणजूण-वागातोर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन खात्याच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या रोमिओ लेनचा भाग जमीनदोस्त करण्यात आला. याबाबतची कारवाई पर्यटन खात्याने केली आहे. हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये घडलेल्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता. याची दखल घेऊन राज्यातील क्लबांची तपासणी तसेच इतर कारवाई करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले होते.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी एकूण ३२७ अर्ज दाखल
राज्यात २० डिसेंबर रोजी जिल्हा पंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली. या मुदतीत उत्तर गोवा जिल्ह्यातील २५ मतदारसंघांतून १५९, तर दक्षिण गोवा जिल्ह्यातील २५ मतदारसंघांतून १६८, असे एकूण ३२७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
क्लबचे मालक गौरव, सौरभ लुथराविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस
फुकेत (थायलंड) येथे पळून गेलेल्या ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा यांना ताब्यात घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसांनी ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ जारी केली आहे.
दाबोळी विमानतळावर ३७ पैकी ७ विमाने रद्द
इंडिगो कंपनीची विमान सेवा विस्कळीत झाल्याने जगभरातील प्रवाशांना जबर फटका बसला आहे. गेले नऊ दिवस अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना आपल्या नियोजीत स्थळी जाणे कठीण बनले. गोव्यातील दाबोळी विमानतळावर मंगळवारी ३७ पैकी ७ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.
बुधवार
लुथरा बंधूंना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन नाकारला
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना दिल्लीतील रोहिणी न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.
झेडपी निवडणुकीसाठी उत्तरेतून १५८, तर दक्षिणेतून १६२ अर्ज ग्राह्य
राज्यात २० डिसेंबर रोजी जिल्हा पंचायत (झेडपी) निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी पार पडली. उत्तर गोव्यातून १ आणि दक्षिण गोव्यातून ६ अर्ज फेटाळण्यात आले. त्यामुळे आता उत्तरेतून १५८ आणि दक्षिणेतून १६२ अर्ज ग्राह्य ठरले आहेत.
कळंगुट येथे ११.५८ लाखांच्या ड्रग्जसह एकाला अटक
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने खोबरावाडो - कळंगुट येथे छापा टाकून नितीन लुंबा (४४, मूळ दिल्ली) या ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून ११.५८ लाख रुपयांचा ११५.८६१ ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त केला आहे.
नवे वाडे-वास्को येथे चॅपेलमधील मूर्तीची मोडतोड
नवे वाडे येथील सेंट अँथोनी चॅपेलातील मूर्तीची मोडतोड केल्याप्रकरणी तसेच तेथील फंडपेटीतील रक्कम चोरल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी नवनीत सिंग या तीस वर्षीय व्यक्तीला अटक केली.
गुरुवार
जि. पं. निवडणुकीच्या रिंगणात २२६ उमेदवार
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या ५० जागांसाठी आता २२६ उमेदवार अंतिम रिंगणात उरले आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत उत्तर आणि दक्षिण गोव्यातून प्रत्येकी ४७ अशा एकूण ९४ उमेदवारांनी माघार घेतली.
पेडणेत १ कोटीचे ड्रग्ज जप्त
केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने पेडणे पोलिसांच्या मदतीने पेठवाडा-कोरगाव येथे मोठी कारवाई केली. येथील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकून १ कोटी रुपये किमतीचे १.३२१ किलो ‘डीएमटी’ ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणी बेलारुसची नागरिक इना वोल्कोवा या महिलेला अटक करण्यात आली.

म्हापसा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार
दत्तवाडी, म्हापसा येथे अपघातात भरत हलकी (२८, रा. बिलवान पेडे) हा दुचाकीस्वार युवक ठार झाला. स्वीफ्ट कारच्या उघडलेल्या दरवाजाला दुचाकीची धडक बसल्यामुळे हा अपघात घडला आहे.
शुक्रवार
कळंगुट सरपंचांचा मोबाईल जप्त
न्यायालयात व्हिडिओ रिकॉर्डिंग केल्याप्रकरणी म्हापसा न्यायालयाने कळंगुटचे सरपंच जोजफ सिक्वेरा यांचा मोबाईल केला जप्त. सिक्वेरा यांच्या मुलाच्या खटल्या संदर्भात सुनावणीवेळी घडला प्रकार.

वेर्णा औद्योगिक वसाहतीत भंगार अड्ड्याला भीषण आग
वेर्णा औद्योगिक वसाहतीत एका भंगार अड्ड्याला आग लागून तेथे व परिसरात दाट धूर पसरल्याने स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली. आग लागल्याची माहिती मिळताच विविध ठिकाणचे अग्निशमन दल तेथे पोहचले. यामध्ये काही खासगी कंपन्यांच्या अग्निशमन दलांचा समावेश होता.
बनावट काॅल सेंटरचा पर्दाफाश
बायंगिणी-जुने गोवा येथून अमेरिकन नागरिकांना कर्ज व इतर सुविधा देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या बनावट काॅल सेंटरचा गुन्हा शाखेच्या सायबर विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सायबर विभागाने छापा टाकून हिमांशू सिंग चौहान (२८, वडोदरा - गुजरात) याच्यासह इतर सहा जणांना अटक केली. त्याच्याकडून विभागाने ६ लाख किमतीचे ६ लॅपटाॅप, ४ मोबाईल व इतर साहित्य जप्त केले.
शनिवार

कॅफे सीओ २ , गोया सील
हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' क्लबमध्ये झालेल्या भीषण अग्नितांडवानंतर गोवा सरकारने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लब्सविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, वागातोर येथील दोन प्रसिद्ध नाईटक्लब ‘कॅफे सीओ २’ आणि ‘गोया’ सील करण्यात आले आहेत.
१.७८ लाख मतदारांची नावे मसुदा यादीतून वगळली
गोव्यातील १.७८ लाख मतदारांची नावे मसुदा यादीतून वगळली. आतापर्यंत १०.८४ लाख (९१.५५%) मतदारांचे एन्युमरेशन फॉर्म जमा झाले असून १.८२ लाख मतदारांचे मॅपिंग प्रलंबित आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी सांगितले.
लक्षवेधी
गोव्यातील ग्रामीण भागासहीत समुद्र किनारी भागात स्टारलिंक कंपनीतर्फे ‘हायस्पीड इंटरनेट’ सेवा पुरवण्यात येणार आहे. इंटरनेट सेवेसहीत राज्यात डिजीटल सुविधा निर्माण करण्यासंदर्भात चर्चा झाली. स्टारलिंक कंपनीचे वरिष्ठ ‘बिजनेस ऑपरेशन्स’ प्रमुख लॉरेन ड्रेयर यांच्याकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची चर्चा झाली. यावेळी माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते.
दक्षिण गोवा पोलिसांनी वाढत्या चोरी, दरोड्याच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी व रात्रीची गस्त वाढवली आहे. शनिवारी रात्री कोलवा, बाणावली, वास्को, मडगाव, नावेली आदी भागात अचानक नाकाबंदी करत वाहनांची व व्यक्तींची चौकशी करण्यात आली.
पाजीफोंड येथील बंद घरात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. खिडकीची ग्रील काढून चोरांनी घरात प्रवेश करत रोख रकमेसह सुवर्णालंकार असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरी केला. चोरांनी घरातील फ्रिजमधील पदार्थ खाल्ले तसेच मद्यही प्यायल्याचे सामाजिक कार्यकर्त्या आवढा व्हिएगस यांनी सांगितले.
पणजी येथील कला अकादमीमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या लाकडी बांधकामाच्या स्पाॅन्जला आग लागण्याची घटना घडली. पणजी शहरात १२ डिसेंबर रोजीपासून सुरू होणाऱ्या ‘सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल २०२५’ साठी तात्पुरती लाकडी बांधकामाला आग लागल्यामुळे नुकसान झाले आहे.