दागिने, रोख रक्कम हडप केल्याची फोंडा पोलिसांत तक्रार

फोंडा : नवरा रुग्णालयात दाखल असल्याने घर बंद ठेवावे लागत असताना, विश्वासाने दिलेले दागिने व रोख रक्कमच ओळखीच्या व्यक्तींनी हडप केल्याचा धक्कादायक प्रकार फोंड्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वरचा बाजार, फोंडा येथे राहणाऱ्या प्रेमा शेट्टी यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
प्रेमा शेट्टी यांचे पती रुग्णालयात असल्याने त्यांचे घर बराच काळ बंद होते. परिसरात चोऱ्यांच्या घटना घडत असल्याने खबरदारी म्हणून त्यांनी सुमारे ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि अंदाजे ८.५ लाख रुपये रोख रक्कम आपल्या ओळखीच्या व्यक्तींकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिली होती. मात्र दीड महिन्यानंतर दागिने व रक्कम परत मागितली असता त्यांना रिकामा बॉक्स देण्यात आला.
यानंतर त्यांनी वारंवार पैशांचा व दागिन्यांचा तगादा लावला; परंतु संबंधित व्यक्तींनी प्रत्येक वेळी टाळाटाळ करत बोळवण केली. फसवणूक होत असल्याचा संशय बळावल्यानंतर अखेर त्यांनी फोंडा पोलिसांत तक्रार नोंदवली.
बी गायत्री श्रीधर नायडू, बी दामोदर नायडू, बी किशोर श्रीधर नायडू, बी मोहना कुमार नायडू व अमरनाथ यांची नावे तिने पोलीस तक्रारीत दिली आहेत. फोंडा पोलिसांनी सदरची तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास सुरू आहे.