४५ टक्के दुचाकी चालकांचा मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळेच!

पणजी : राज्यात मागील पाच वर्षांत रस्ते अपघातात १२९६ जणांचा मृत्यू झाला होता. यातील ५८७ दुचाकी चालकांनी (४५.२९ टक्के) अपघातावेळी हेल्मेट घातले नव्हते. तर ७१ चार चाकी चालकांनी (५.४७ टक्के) सीट बेल्ट बांधला नव्हता. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार नरेन दास गुप्ता यांनी प्रश्न विचारला होता.
उत्तरातील माहितीनुसार, राज्यात २०२० मध्ये २,३७५ रस्ते अपघातात २२३ जणांचा मृत्यू झाला होता. यातील ११५ वाहन चालकांनी हेल्मेट तर ७ जणांनी सीटबेल्ट घातला नव्हता. २०२१ मध्ये २,८४९ रस्ते अपघातात २२६ जणांचा मृत्यू झाला होता. यातील १०९ वाहन चालकांनी हेल्मेट तर १९ जणांनी सीटबेल्ट घातला नव्हता. २०२२ मध्ये ३,०११ रस्ते अपघातात झाले. यात २७१ जणांचा मृत्यू झाला होता. यातील १११ वाहन चालकांनी हेल्मेट तर १० जणांनी सीटबेल्ट घातला नव्हता.
राज्यात २०२३ मध्ये २,८४६ रस्ते अपघातात झाले. यात २९० जणांचा मृत्यू झाला होता. यातील १३७ वाहन चालकांनी हेल्मेट तर २० जणांनी सीटबेल्ट घातला नव्हता. तर २०२४ मध्ये २,६८२ रस्ते अपघातात २८६ जणांचा मृत्यू झाला होता. यातील ११५ वाहन चालकांनी हेल्मेट तर १५ जणांनी सीटबेल्ट घातला नव्हता. वरील कालावधीत संपूर्ण देशात रस्ते अपघातात ८ लाख १० हजार ९१३ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमधील २.४७ लाख जणांनी हेल्मेट घातले नव्हते. तर ७९ हजार ८४० जणांनी सीटबेल्ट घातला नसल्याचे उत्तरात म्हटले आहे.
राज्यात वरील कालावधीत रस्ते अपघातात झालेल्या एकूण मृत्युंपैकी ११६५ (९० टक्के) वाहन चालक अतिवेगाने वाहन चालवत होते. २०२० मध्ये मृत्यू झालेले १८१ वाहन चालक अतिवेगाने वाहन चालवत होते. २०२१ मध्ये २०३, २०२२ मध्ये २४०, २०२३ मध्ये २७० तर २०२४ मध्ये २७१ मृत्यू झालेले वाहन चालक अतिवेगाने वाहन चालवत असल्याचे उत्तरात म्हटले आहे.