भाजपमुळे मानवी जीवनात समृद्धी, उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

मये मतदारसंघात प्रचारात सहभागी खासदार सदानंद शेट तानावडे. सोबत आमदार प्रेमेंद्र शेट, दया कारबोटकर, उमेदवार कुंदा मांद्रेकर व इतर.
डिचोली : राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (१३ डिसेंबर) कारापूर आणि मये मतदारसंघात झंजावाती दौरा करून भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारची विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवत, त्यांनी ‘डबल इंजिन’ सरकारला खंबीरपणे साथ देण्याचे आवाहन केले.
खासदार तानावडे यांच्यासमवेत आमदार प्रेमेंद्र शेट, उत्तर गोवा जिल्हा भाजप अध्यक्ष दयानंद कारबोटकर, विविध पंचायतींचे सरपंच, मंडळ समितीचे पदाधिकारी आणि उमेदवार कुंदा मांजरेकर (मये) व महेश सावंत (कारापूर) हे प्रचारात सहभागी झाले होते.
खासदार तानावडे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश जागतिक महासत्तेच्या दिशेने कसा वाटचाल करत आहे, यावर जोर दिला. त्यांनी गोवा सरकारने घेतलेल्या जनहिताच्या निर्णयांची प्रशंसा केली.
गोवा राज्याने प्रत्येक घरात समृद्धी आणण्यासाठी 'माझे घर' या योजनेसोबतच अनेक क्रांतिकारक निर्णय घेत मानवी जीवन समृद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विरोधकांच्या भूलथापांना आणि अपप्रचाराला बळी न पडता, कार्यकर्ते, मतदार आणि नागरिक यांनी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मतदारसंघातील विकास योजनांचा आणि एकूण कामगिरीचा सविस्तर आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने विकासकामे अधिक गतीने होत आहेत.
आता डबल इंजिन नव्हे, तर ट्रिपल इंजिन (केंद्र, राज्य आणि जिल्हा पंचायत) च्या माध्यमातून विकासाची गंगा आणण्यासाठी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना विजयी करणे आवश्यक आहे.
- प्रेमेंद्र शेट, आमदार, मये