विरोधकांनी धर्माच्या नावावर फूट पाडू नये : मंत्री फळदेसाई

वालकिनी-सांगे येथे कोपरा बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या समवेत मंत्री सुभाष फळदेसाई व इतर. (संदीप मापारी)
सांगे : जिल्हा पंचायत निवडणूक ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी असते. त्यामुळे आपला हक्काचा माणूस निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी गेल्या वेळेपेक्षाही अधिक मताधिक्याने भाजप उमेदवार निवडून येणे आवश्यक असून, प्रत्येक कार्यकर्त्यांने गावच्या विकासासाठी उमेदवाराला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
वालकिनी, सांगे येथे भाजपच्या कोपरा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार व समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, उमेदवार राजश्री गावकर, अलका फळदेसाई, सर्वानंद भगत यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी विरोधकांच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली. मंत्री सुभाष फळदेसाई हे विकासकामात गुंतलेले आहेत आणि सांगेचा विकास व्हावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत. भाजप समाजातील शेवटच्या व्यक्तीकडे पोहोचला आहे, पण विरोधक फक्त सोशल मीडियावर व्हिडिओ काढून टीका करत आहेत.
६३ वर्षांनंतर गोमंतकीयांचे घर कायदेशीर होत असताना त्यांच्या पोटात दुखत आहे. विरोधकांनी धर्माच्या नावाने फक्त भांडण लावून दिले आहे. लोकांनी त्यांच्याकडे लक्ष न देता आपले घर आपल्या नावांवर करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्य गोमंतकीयांचे घर कायदेशीर करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सर्वानंद भगत यांनी सुभाष फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सांगेत विकासाची गंगा घरोघरी नेण्यासाठी भाजप उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी नरेंद्र सावईकर, उमेदवार राजश्री गावकर, अलका फळदेसाई, नवनाथ नाईक, सुरेश केपेकर, वासुदेव मेंग गांवकर इत्यादींनीही आपले विचार मांडले.
राजश्री गावकर निष्ठावंत कार्यकर्त्या
मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावेळी उमेदवार राजश्री गावकर यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिले. २०२२ च्या निवडणुकीत बाहेरील उमेदवाराला घेऊन नाचणारे काही लोक आमच्या उमेदवाराला बाहेरील म्हणतात, हे चुकीचे आहे. राजश्री गावकर ही निष्ठावंत कार्यकर्ती आहे आणि आमच्या मतदारसंघाची आहे. तिने पंच, सरपंचपद घेऊन आपल्या पदाला न्याय दिला आहे. गेली वीस वर्षे तिने भाजपचे कार्य केले आहे. सर्वांच्या सहमतीने तिला तिकीट दिले आहे, यात काय वाईट आहे? असे फळदेसाई म्हणाले.