धीरयो प्रकरणी ४६ गुन्हे दाखल, ८८ जणांना अटक

२०१८ पासून आतापर्यंतची कारवाई, खास मंंडळाचीही स्थापना


22nd September 2021, 12:38 am
धीरयो प्रकरणी ४६ गुन्हे दाखल, ८८ जणांना अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात प्राण्यांवर होणारी क्रूरता रोखण्यासाठी तसेच त्याच्या कल्याणसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याच्या नेतृत्वाखालील राज्य प्राणी कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. तसेच धीरयो आयोजित करण्यावर कारवाई करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांत सोसायटी फॉर प्रिवेंशन ऑफ क्रूएल्टी टू एनिमल्सच्या सूचनेनुसार प्रत्येक पोलीस स्थानकात पोलीस विशेष विभाग कार्यरत करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त २०१८ ते ७ सप्टेंबर २०२१ रोजीपर्यंत धीरयो आयोजन केल्याप्रकरणी ४६ गुन्हे दाखल करून ८८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पशुचिकित्सा विभागाचे संचालक डॉ. अगोस्टिन्हो अँटोनियो मिसक्विटा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून दिली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
या प्रकरणी पीपल फॉर एनिमल या बिगर सरकारी संस्थेने खंडपीठात १९९६ मूळ याचिका दाखल करून धीरयोचा मुद्दा खंडपीठात मांडला होता. त्यानंतर खंडपीठाने धीरयो बंदी करण्याचा निवाडा २० डिसेंबर १९९६ रोजी दिला. याला संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ते फेटाळण्यात आले होते. असे असताना राज्यात धीरयो आयोजित करीत असल्याने याचिकादाराने २००६ आणि २०१५ मध्ये अवमान याचिका दाखल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करून खंडपीठाकडे मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर प्रथम १२ डिसेंबर २००८ आणि १७ मार्च २०१६ रोजी खंडपीठाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करून धीरयो पूर्णपणे बंद करण्याचा निवाडा दिला. त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्यात कोविडचे निर्बंध लागू असताना धीरयो सुरू असल्यामुळे पोलीस तसेच इतर संबंधितांकडे याचिकादाराने तक्रारी दाखल केल्या. असे असताना कोणतीच कारवाई होत नसल्याने याचिकादाराने संबंधितांना नोटीस बजावली. दरम्यान, जुलै आणि आॅगस्टमध्ये करोनाचे निर्बंध शिथील केल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात धीरयो आयोजित करण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर याचिकादाराने तिसऱ्यांना खंडपीठात अवमान याचिका दाखल केली. याची दखल घेऊन खंडपीठाने राज्यात धीरयो तसेच प्राण्यांवर होणारे क्रूर अत्याचार यावर काय उपाययोजना केली याची माहिती देण्यास सांगितले होते. त्यानुसार, डॉ. मिसक्विटा यांनी खंडपीठात माहिती सादर केली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ पातळीवर राज्य प्राणी कल्याण मंडळ स्थापन करण्यात आल्याची माहिती सादर केली.

गोवा पोलिसांनी राज्यात २०१८ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले ३३ धीरयो उधळून लावले. तसेच या कालावधीत बैलांच्या मालकांना फौजदारी दंड संहितेच्या कलम १४९ अंतर्गत ४१५ नोटीस बजावून कारवाई करण्यात आली. दोन्ही जिल्हात पोलीस उपअधीक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून पोलीस स्थानकातील एका पोलीस उपनिरीक्षकाला विशेष विभाग स्थापन करून कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात सादर केली आहे.