निरपेक्ष

कुण्या शेजाऱ्याने निरपेक्षपणाने दिलेले चिबूड, दोडकी, काकडी, भेंडे, केळ-पाने आपण घेतोच की मोकळेपणाने. तसेच आपले राजकारणी आपणाला ह्या पिशव्या पाठवून देतात त्या अगदी निरपेक्ष भावनेने असं समजून घेतलं म्हणजे झालं.

Story: मिश्किली/ वसंत भगवंत सावंत |
19th September 2021, 12:32 am
निरपेक्ष

शेवटी बऱ्याच चर्चे अंती आमचं एकमत झालं एकदांचं! कुण्या राजकारण्याने चतुर्थीची भेट म्हणून दिलेली पिशवी घेण्यात काहीच गैर नाही! एरव्ही आम्हीच म्हणत असतो की, काय कळस गाठलाय महागाईने !कडधान्य कडाडलंय, मुग-वाटाणे, गुळ-साखर, पीठ-मीठ वगैरे, नेहमी सणाच्या दिवसांतच अधिक वाढते. तेल-तूप तर असं तापलय की पेट्रोल-डिझेलची वाढ परवडली म्हणायची. मूर्तिकाराकडे गेलो की कोळीष्टकात अडकल्याचा भास होतो दर वर्षी. माटोळीवाले तर अव्वाच्या सव्वा दर आकारू लागतात. नोटा  मोजून देतो त्या तुलनेत पिशवीत टाकलेले नग फारच चिल्लर वाटतात. यंदा पावसाने भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दगा दिलाय असं म्हणत दलाल लोक आपली पोळी भाजून घेतात. खायची पाने, केळ-पाने असो किंवा हळद-पाने असो, तीही तोऱ्यात आपल्या दर वाढवून ठेवतात. फळ-फळावळ तशी येते भरपूर प्रमाणात, पण किंमती मात्र फळफळलेल्याच असतात! साधी फुलंं विकत घ्यायची म्हटलं तर त्यांच्या किंमतीही फुलल्या-फुगलेल्या असतात. आरास करायला  पुरेसा वेळ नाही म्हणून आयतं मकर घ्यायल्या गेलो तर आपल्या तोंडावरील रंग उडतात. 

फटाके वाजवणे म्हणजे पैश्यांची राख करणे असं आपण नेहमी म्हणतो पण मुला-बाळांच्या नावाने आपलीही हौस भागवून घेत असतो. बरं-वाईट काहीही होवो, पुरोहितबुवा तर लागतातच.म्हटल्यावर त्यांनी सांगितलेली दक्षिणा ठेवावीच लागते. काहीही असो, आता बाप्पाचं कार्य म्हटल्यावर त्यांच्याच आशीर्वादाने नेटकेपणे पार पडतेच  की! तेच आपणाला मार्ग सुचवतात की एकएक!! आपल्या भक्तांवरील ओझं थोड कमी व्हावे म्हणून तेच ह्या राजकारणी लोकांनाही सद्बुद्धी देत असावेत! 

कुण्या शेजाऱ्याने निरपेक्षपणाने  दिलेले चिबूड, दोडकी, काकडी, भेंडे,  केळ-पाने  आपण  घेतोच की मोकळेपणाने. तसेच आपले राजकारणी आपणाला ह्या पिशव्या पाठवून देतात त्या अगदी निरपेक्ष भावनेने असं समजून घेतलं म्हणजे झालं. आता अश्या पिशव्या दिल्या म्हणून   निवडणुकीत  आपलं मत त्यालाच द्यायला हवं असा दंडक काही ते आपल्यावर घालू शकत नाहीत. तसं असतं तर निवडणुकीच्या वेळी परत येऊन आमच्या खिशात त्यांनी नोटा  कोंबल्या असत्या का? दिल्या पिशवीला जागून ही लोकं आपणालाच मतं देतील म्हणून ते निर्धास्त राहिले असते ना? ज्या अर्थी मते घेण्यासाठी ते वेगळा खर्च करतात, त्या अर्थी त्यांनी सणासुदीला दिलेली पिशवी ही निरपेक्ष भावनेनेच दिली आहे हे सत्य आपणही मानून घ्यायलाच पाहिजे. 

 बैठकीत आमच्या ‘बुधवंताने’ आम्हाला व्यवस्थित समजावून दिल्यावर अश्या पिशव्या घेणे म्हणजे एका प्रकारे बाप्पांचा प्रसाद स्विकारणे, तर देऊ केलेली पिशवी नाकारणे हा राजकारण्याचा अपमान नसून साक्षात देवाबाप्पांचा अपमान ठरतो हे सगळ्यांना पूर्णपणे पटलं. ‘बुधवंत’ पुढे म्हणाले, नाहीतरी आपण बाप्पांकडे गाऱ्हांणे घालताना मागतोच की नेहमी, ‘हे बाप्पा पुढच्या वर्षी तुझा उत्सव अधिक उत्साहाने साजरा करण्यासाठी आम्हाला बुद्धी दे !' यंदा आमच्या आमदारांनी निरपेक्षपणे ह्या पिशव्या आम्हाला दिल्या आहेत, आतां पुढचा उत्सव अधिक आनंद-उत्साहाने साजरा करायला हवा तर यंदाच्या पिशवीतील त्रुटी-कमतरता आपण त्यांना कळवायला नको का ? 

‘बुधावंताची’ ही कल्पना  सगळ्यांना आवडली  आणि आम्ही सगळ्यांनी पुढच्या वर्षी येणारी पिशवी कशी असावी, त्या विषयी सखोल चर्चा करून आमदारांना कळवण्यासाठी खालील प्रमाणे सूचना केल्या. 

१) सगळ्यांच्या घरी फक्त दीड-दिवसांचा गणपती नसतो, तर बऱ्याच जणांच्या घरी पाच,सात  दिवसही बसवला जातो त्यासाठी तांदूळ देताना फक्त पाच किलोंची पिशवी देऊ नये तर योग्य चौकशी करून प्रमाण ठरवावे. 

२) यंदा केवळ एकाच प्रकारचे,  ते ही एकच तेल-पाकीट देण्यात आले होते, पुढच्या वर्षी समयी-आरतीसाठी वेगळी आणि स्वयंपाकासाठी वेगळी पुरेशी तेल-पाकिटे देण्यात यावी. 

३) चतुर्थीसाठी करंज्या वगैरे पाच सहा दिवस आधी केल्या जातात, वाटलेल्या पिशव्या ऐनवेळी देण्यात येत असल्याने  तेल, साखर, मैदा बाजारातून विकत घेण्याची पाळी येते, ही अडचण लक्षात घेऊन सामानाच्या पिशव्या योग्य वेळी वितरीत केल्या जातील याची व्यवस्था करावी. 

४) दुकानावर गेलो की विविध प्रकारचे फटाके पाहून ते विकत घेण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळे पर्यावरणाची  हानी होते. जनतेला फटाक्यांच्या दुकानावर जावे लागू नये यासाठी एकाच प्रकारच्या पण आवश्यक फटाक्यांचा पुरवठा पिशवीतूनच व्हावा. 

५) सणासुदीला नारळांची किंमत ताड-माड वाढते, ह्या दरवाढीला आला घालण्यासाठी आवश्यक नारळांची सोय पिशवीतूनच व्हावी.  

६) पिशवीतून माटोळीचे सामान देणे शक्य नसले तरी स्वस्त भाजी केंद्राप्रमाणे स्वस्त माटोली केंद्रे, स्वस्त फुल-फळ केंद्रे  उभारण्याचा प्रयत्न करावा.

एकावर एक भन्नाट  सूचना येत राहिल्यावर शेवटी वैतागून बुधवंतच म्हणाला, यंदा आमच्या आमदाराने निरपेक्षपणे आम्हाला पिशव्या दिल्या आहेत  म्हणून आम्ही हे सूचनापत्र त्यांच्याकडे सुपूर्द करू पाहतो ते बरे आहे.  परंतु पुढच्या वर्षी निवडणुका आहेत, समजा यंदाच्या पिशवीतील त्रुटींवर नाराज होऊन बाप्पांनी आमच्या आमदारांचाच मोरया केला तर एवढे कष्ट घेऊन तयार केलेली ही सूचना यादी वाया नाही कां जाणार? त्यापेक्षा आपण असं करू,  प्रामाणिकपणे  आपण तयार केलेली ही यादी निवडणूक होईपर्यंत प्रलंबित ठेवू आणि मगच उगवत्या सूर्याला निरपेक्ष भावनेने नमस्कार करू. 

बुधवंताचे म्हणणे सगळ्यांनी निरपेक्षपणे मान्य केले.