पुढच्या वर्षी लवकर या!

तुझं विसर्जन करून येताना तो रिकामा पाटसुध्दा खूप जड लागतो रे मला. दहा बारा दिवस पायाला चाक बांधल्यासारखे धावणारे हे पाय आता मात्र गळून गेलेत. तुझं विसर्जन करताना त्या पाण्यात मिसळलेलं माझ्या डोळ्यातलं पाणी फक्त तुलाच दिसलं असेल रे!

Story: अर्चना परब |
19th September 2021, 12:21 Hrs
पुढच्या वर्षी लवकर या!

आणि अकरावा दिवस आला पण, आता गणपती विसर्जन पण होणार. कसे वार्‍यासारखे दिवस गेले काही समजलंच नाही. असं वाटतंय कालच तुझ्या दर्शनासाठी  मुंबईहून आलोत. येताना बारा तासाच्या जागी चोवीस तास लागले, पण त्याचं काहीच वाटलं नाही, कारण आस होती माझ्या बाप्पा भेटीची, दर्शनाची. पावसाचा जोर काही कमी झाला नाही. पण त्या डोळे मिटून कोसळणार्‍या पावसाला माझा उत्साह मात्र नाही कमी करता आला. देवा हिच ओढ तर ताकद आहे माझी. हि ओढ काय सात जन्मात कमी नाही होणार इतकं अजोड नातं आहे तुझ्या माझ्यातलं. 

आरती, पूजा, भजन, परिवार, पाहुणे आणि माझा बाप्पा  ह्यांच्या सोबत किती आनंदात दिवस गेले माझे. माझ्याने जशी होईल तशी तुझी वेडीवाकडी सेवा केलीय मी. ही सेवाच तर ताकद देते मला माझ्या आयुष्यात जगण्याची. एक एक दिवस कमी होत होता ह्याची रूखरूख तर होतीच मनात. पण जितकं जमेल तितका आनंद भरून घेतलाय माझ्या झोळीत मी. 

दहाव्या दिवशी तुझ्या समोरच झोपलोय तुझ्या तेजस्वी चेहर्‍याकडे बघतच. असं वाटतय की तुझे डोळे मला काहीतरी सांगत आहेत. एकटक मलाच बघत आहेत. उद्या तू जाशील आणि परवा मनात नसतानाही मला जावं लागेल. 

तुझं विसर्जन करून येताना तो रिकामा पाटसुध्दा खूप जड लागतो रे मला. दहा बारा दिवस पायाला चाक बांधल्यासारखे धावणारे हे पाय आता मात्र गळून गेलेत. तुझं विसर्जन करताना त्या पाण्यात मिसळलेलं माझ्या डोळ्यातलं पाणी फक्त तुलाच दिसलं असेल रे! तुझ्या आगमनाच्या वेळचा आनंद, उत्साह आता मात्र कुठे तरी हरवलेला असतो. तुझ्या निमित्ताने ह्यादिवसात जो आनंद, उत्साह एक ऊर्जा मला मिळालीय तीच तर ताकद आहे माझी. ह्या ताकदीवरच तर पुढचे पूर्ण वर्ष काढायचे असते मला. पोटापाण्यासाठी गावापासून, घरापासून दूर जायचे असते आणि दूर जाऊन परत पुढच्या वर्षी तुला भेटायला यायची तयारी करायची असते मला. जाताना तुझा बुका घेतलाय पुडीमध्ये बांधून. कोणी मानो न मानो, पण मला माहीत आहे त्यात एक ताकद आहे आणि ही माझी श्रद्धा आहे आणि माझी श्रध्दा तू कधीच तोडणार नाहीस. तुझी कृपादृष्टी कायम माझ्यावर असणार आहे. मला कुठे दुखलं खुपलं तर हाच अंगारा मला परत उभं करणार आहे. सरतेशेवटी गार्‍हाणं घालताना माझ्या सगळ्या चिंता काळजी मी तुझ्या स्वाधीन केल्यात. आयुष्यात पुढे येणारे चांगले वाईट प्रंसग सोसायला तूच तर ताकद देणार आहेस मला. तुझ्या पायारवचे न्हावण पिलंय मी हिच तर माझी संजिवनी आहे. माझ्या मोबाईलमध्ये तुझे हजारो फोटो काढलेत मी. आता वर्षभर हेच तर ताकद होणार माझी. जायचं मन नाही आहे रे, पण काय करणार मार्ग तर तुच दाखवला आहेस. त्यावर चालले तर पाहिजेच ना! तुझ्या माटीची एक सुपारी आईने माझ्या बॅगेत टाकलीय आणि म्हणाली "आसानी रे गाठीक बांधुन घे निट" नकळत तुलाच माझ्या सोबत पाठवतेय ती. पण तिला काय माहीत तू कायम माझ्या सोबतच आहेस ते!जाताना वाट काही संपणार नाही वाटेत तुझ्याच आठवणी येतील सारख्या. गेल्यावर कामावर पण थोडे दिवस लक्ष नाही लागणार.

पण देवा आता जोमाने काम करणार आहे. आतापासूनच डोक्यात पुढच्या वर्षीची बेरीज - वजाबाकी चालू झालीय माझ्या. मूर्ती कशी असणार? डेकोरेशन कसले करायचे? यंदा तुझ्या भजनात नविन तबला घ्यायचा आहे. वेळेचे गणित जमले तर यंदा गायन पण शिकणार आहे. म्हणजे यंदापेक्षा चांगले अभंग म्हणेन. रेल्वेच्या तिकीट काढायच्या आहेत आणि त्या नाही मिळाल्या तरी कसेही गावाला येणारच मी. तुला भेटायला तुझी भक्ती करायला.

निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी..

चुकले आमचे काही,तर क्षमा असावी.. 

गणपती बाप्पा मोरया!!