अनंत चतुर्दशी

‘अनंत’ म्हणजे जो कधी न मावळणारा, कधी न संपणारा आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरुपी शक्ती. अनंत म्हणजे शेषनाग. शेषनागावर पहुडलेल्या श्री विष्णूंना अनंत असेच नाव आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतात. त्यांना प्रसन्न करून अनंताचे व्रत करतात.

Story: लोकसंस्कृती/ पिरोज नाईक |
18th September 2021, 11:16 pm
अनंत चतुर्दशी

भारतीय संस्कृती म्हणजे येथील लोकांची धार्मिकता, श्रद्धा दर्शवणारी संस्कृती. देवशयनी एकादशीपासून सुरु झालेल्या व्रत, वैकल्यांना अनंत चतुर्दशीच्या व्रतानंतर पूर्ण विश्रांती मिळते. श्रावणमासापासून सुरु झालेल्या सोवळ्या-ओवळ्या, शाकाहारी भोजनाला या व्रतानंतर पूर्णविराम मिळतो.

शेती-बागायतींनी नटलेला, फळा-फुलांनी बहरलेला, झुळझुळ झऱ्यांच्या गायनाने कान तृप्त करणारा, मन मोहून टाकणारा, अंत्रूज महालातील सावई, वेरे हा गाव. गावाच्या मध्यभागी निसर्ग सौंदर्यावर लुब्ध होऊन चंदनाने खचाखच भरलेल्या होडीतून आलेल्या श्री अनंताचे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर. संपूर्ण गोमंतकामध्ये एकमेव आगळेवेगळे देवालय. मंदिराच्या चोहोबाजूंनी झुळझुळ वहाणारे झरे व पाण्यावर बांधलेल्या मंदिरात शेषनागावर विराजमान झालेले विष्णूरुपी श्री अनंत. मंदिरामध्ये वर्षभर भजन, किर्तन, अभंग-गायन शिवाय निरनिराळे उत्सव चालूच असतात. तेथील सर्वात महत्त्वाचा व मोठा उत्सव म्हणजे ‘अनंत चतुर्दशी’.

या दिवशी सकाळपासून मंदिरामध्ये अभिषेक व धार्मिक विधी चालू असतात. अनंत म्हणजे श्री विष्णूचे रुप. मंगलमूर्ती गणेशाला दुर्वा प्रिय असते. श्री शंकराच्या पिंडीवर बेल वाहतात त्याचप्रमाणे विष्णूरुपी श्री अनंताला तुळस ही वनस्पती अत्यंत प्रिय आहे. भक्तगण देवाला तुळशीमाळा वाहतात.

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने दूरदूरच्या गावातील भक्तगण देवालयाला भेट देतात. दुपारी पूजा-अर्चा, आरती, नैवेद्य होतो. भाविक अनंताच्या प्रसादाला व आशीर्वादाला आवर्जून हजर रहातात. दुपारी महाप्रसाद असतो. संध्याकाळी रव्यापासून बनवलेली प्रसादाची खीर (सोजी) सर्वांना वाटण्याची प्रथा आहे.

भाद्रपद शु. चतुर्दशी म्हणजे अनंत चतुर्दशी. या दिवशी अकरा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. भाद्रपद महिन्यातील चौदाव्या तिथिला अनंत चतुर्दशीचे व्रत करतात. या व्रतामध्ये चौदा या संख्येला महत्त्व दिले जाते. व्रतासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू चौदाच्या संख्येत आणल्या जातात. चौदा प्रकारची फळे, फुले, धान्य, शिवाय नैवेद्यामधील भाज्या सुद्धा चौदा प्रकारच्या करतात. पूजेला लावला जाणारा दोरा चौदा गाठीचा असतो तर चौदा वर्षे हे व्रत करतात.

‘अनंत’ म्हणजे जो कधी न मावळणारा, कधी न संपणारा आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरुपी शक्ती. अनंत म्हणजे शेषनाग. शेषनागावर पहुडलेल्या श्री विष्णूंना अनंत असेच नाव आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतात. त्यांना प्रसन्न करून अनंताचे व्रत करतात. दु:ख दारिद्र नष्ट व्हावे, सुख समृद्धी लाभावी, संकटे दूर होऊन गत वैभव प्राप्त व्हावे, मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी अनंत स्वरूपात भगवान विष्णूचे हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे व्रत स्वत:हून न करता कोणी सांगितल्यास अथवा ‘दोरा’ सहजपणे उपलब्ध झाल्यास करावे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी चौदा गाठी असलेल्या लाल रंगाच्या रेशमी धाग्याची पूजा करतात याला ‘रक्षासूत्र’ असे म्हणतात. विसर्जनानंतर हा धागा उजव्या हाताच्या दंडावर बांधतात. ह्या व्रताचे वैशिष्ट्य असे की पूजा केल्यानंतर लगेच विसर्जन (काही वेळाने त्याच दिवशी) करतात. हे रक्षासूत्र म्हणजे अनंत, आपला रक्षणकर्ता. कोणत्याही संकटापासून  तोच आपले रक्षण करणार अशी श्रद्धा उराशी बाळगून हे व्रत करतात. चौदा वर्षे पूर्ण झाल्यावर व्रताचे उद्यापन करावे. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा मंत्र जपावा, भगवंताचे स्मरण करावे असे सांगतात.

महाभारत कालामध्ये युधिष्ठिर राजाला हे व्रत करण्यास सांगितले. द्यूत खेळात हरल्यानंतर पांडवांना वनवास व अज्ञातवास पत्करावा लागला व दु:ख, दारिद्र, कष्ट सहन करावे लागले. त्यावेळी यातून मुक्त होण्यासाठी आपण काय करावे? असे युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले असता श्रीकृष्णाने अनंत व्रत आचरण्यास सांगितले आणि अनंत व्रतानंतर पांडव क्लेशापासून मुक्त झाले, अशी आख्यायिका आहे.