न्यायवैद्यक प्रयोगशाळा कधी सुरू होणार?

पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा उच्च न्यायालयाकडून आदेश


15th September 2021, 08:23 am
न्यायवैद्यक प्रयोगशाळा कधी सुरू होणार?

न्यायवैद्यक प्रयोगशाळा कधी सुरू होणार?
पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा उच्च न्यायालयाकडून आदेश

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी :  वेर्णा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळा कधी पूर्णपणे कार्यरत होईल याची माहिती देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पोलीस महासंचालकांना दिला आहे. याबाबत २१ रोजी पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्देशही खंडपीठाने जारी केला आहे.
या प्रकरणी मायकल ओकाफोर या नायजेरियन नागरिकाने खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी त्याच्या विरोधात असलेली अमली पदार्थ तस्करीचा खटला लवकर समाप्त करण्याची मागणी केली. या व्यतिरिक्त संबंधित खटल्यातील प्रलंबित असलेला न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अमली पदार्थाचा अहवाल लवकर प्राप्त करण्याची मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान वेर्णा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत आवश्यक रसायन तसेच यंत्रणा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, खंडपीठाने प्रयोगशाळा पूर्णपणे कार्यरत करण्यासाठी वेळोवेळी निर्देश जारी केले. तसेच याबाबत खंडपीठात अनुपालन अहवाल सादर करण्याचा निर्देश जारी करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी वेर्णा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. वाघमारे यांना खंडपीठाने प्रतिज्ञापत्राद्वारे स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या प्रकरणी डॉ. वाघमारे यांनी खंडपीठाच्या आदेशानुसार, प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र यात त्यांनी प्रयोगशाळा कार्यरत न होण्यासाठी विविध प्रकारची कारणे नमूद केल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवून त्यांना ताकीद दिली. तसेच याबाबत पुढील सुनावणीवेळी पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश जारी केला आहे.

हेही वाचा