गंभीर गुन्ह्यांचा शोध-दर १०० टक्के : पंकजकुमार सिंग


15th September 2021, 08:17 am
गंभीर गुन्ह्यांचा शोध-दर  १०० टक्के : पंकजकुमार सिंग

गंभीर गुन्ह्यांचा शोध-दर  १०० टक्के : पंकजकुमार सिंग
प्रतिनिधी । गोवन वार्ता
मडगाव :  लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि गुन्ह्यांच्या घटना कमी करण्यासाठी, गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी दक्षिण गोव्यातील पोलीस प्रयत्न करत आहेत. गुन्ह्यांचा शोध-दर गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी बर्‍याच प्रमाणात सुधारला आहे, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांत राज्यभरात चेन स्नॅचिंगची अनेक प्रकरणे समोर आली. यापैकी सासष्टी पोलीस क्षेत्रामध्ये सहा प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी सर्व प्रकरणांचा शोध लावण्यात आला असून आंतरराज्य टोळीतील आरोपींना पकडण्यात आले आहे. सोनसाखळी चोरीतील आरोपी चेन हिसकावतात आणि नंतर लपून बसतात. गुन्हे करताना ओळख लपवण्यासाठी मास्क आणि हेल्मेट वापरतात. या सर्व आव्हानांनंतरही दक्षिणेतील पोलीस अधिकार्‍यांच्या संयुक्त टीमने अविरत काम करत आरोपींना अटक केली. आरोपी मोहम्मद सरफराज आणि अजय बोगुलकर यांच्याकडून अंदाजे ८ लाख किमतीचे १८२ ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले.
याव्यतिरिक्त मोबाईल हिसकावण्याच्या दोन प्रकरणांत मॅक्सन फर्नांडिस, इरफान अहमद आणि इस्माईल शेखला अटक करण्यात आली आहे.
कुख्यात मोटारसायकल चोर शहाबुद्दीन शेखला अटक करण्यात आली आहे. संयुक्त कारवाईनंतर सात मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. सासष्टी परिसरात छुप्या पद्धतीने धिरयो आयोजित केले जात आहेत. तरीही पोलिसांनी ८ गुन्हे नोंद करत १६ व्यक्तींना अटक केली आहे. याशिवाय ९९ बैल-मालक तसेच बैल झुंजीच्या आयोजकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मटका जुगाराची ८३ प्रकरणे नोंदवून कारवाई करण्यात आलेली आहेत. मालमत्तेप्रकरणी ७४ प्रकरणे नोंदवली गेली असून ५० प्रकरणांचा शोध लागलेला आहे. सासष्टीतील २० लाखांची चोरीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक सिंग यांनी सांगितले.
महिला आणि मुलांवरील गुन्हे पोलिसांकडून अत्यंत गांभीर्याने घेतले जातात आणि सर्व प्रकरणांची वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काळजीपूर्वक तपासणी केली गेलेली आहे. यावर्षी बलात्काराची १२ प्रकरणे घडली असून सर्व प्रकरणांचा शोध लावण्यात आलेला आहे. बाणावली प्रकरणातील आरोपींनाही तत्काळ अटक करण्यात आली.
लैंगिक तस्करीप्रकरणी ३ पीडितांची सुटका केली आणि दोन आरोपींना अटक केली. सासष्टी परिसरात पाच खुनाची प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी चार प्रकरणांचा शोध लावण्यात आलेला आहे. कोलवातील अज्ञात व्यक्तीच्या खूनप्रकरणी लवकरच शोध लावण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. दिवसरात्र गस्त घालण्यात आली आहे. गुन्हेगारांवर आळा आणण्यासाठी पोलीस ठाण्यांना अतिरिक्त वाहने आणि कर्मचारी पुरवले गेले आहेत. गुन्हे घडू नयेत यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा किनारी भागात बसवण्यात आले आहेत. गोव्यातील लोकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी गोवा पोलीस वचनबद्ध असल्याचेही पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा