पी. व्ही. सिंधूकडून अपेक्षा वाढल्या

डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डला नमवत उपांत्यपूर्व फेरीत दाखल


29th July 2021, 11:39 pm
पी. व्ही. सिंधूकडून अपेक्षा वाढल्या

टोकियो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपला विजयाचा प्रवास सुरू ठेवला आहे. सिंधूने गुरुवारी सरळ गेममध्ये डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डला २१-१५, २१-१३ ने हरवून तिच्या पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. सिंधू गुरुवारी खेळल्या गेलेल्या महिला एकेरीच्या १६ सामन्यांच्या फेरीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होती आणि या सामन्यात तिने प्रतिस्पर्धी ब्लिचफेल्डला कोणतीही संधी दिली नाही.

पहिल्याच गेममध्ये सिंधूने सामन्यावर वर्चस्व राखले आणि तिच्या जोरदार स्मॅश व नियंत्रणासह ११-६ अशी आघाडी घेतली. यानंतर, मियाने पुनरागमन करताना सिंधूला आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण शेवटी सिंधूच्या कौशल्य आणि आक्रमक वृत्तीसमोर ते पुरेसे सिद्ध झाले नाही आणि सिंधूने पहिला गेम २१-१५ असा जिंकला.

दुसऱ्या गेममध्येही सिंधूचा दबदबा

दुसऱ्या गेममध्येही सिंधूने डॅनिश खेळाडूला जास्त संधी दिली नाही आणि तिच्यावर सतत दबाव ठेवला. पहिल्या गेमप्रमाणेच सिंधूने दुसऱ्या गेमच्या सुरूवातीस ११-६ अशी आघाडी घेतली आणि अखेर २१-१३ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यासह रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती सिंधूने भारतासाठी पदक जिंकण्याची आशा वाढविली आहे.

सामन्याप्रमाणे रणनीतीमुळे यश : सिंधू

उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर सिंधूने तिच्या यशाचे रहस्य उघड केले आहे. सिंधू म्हणाली, ऑलिम्पिक सुरू झाल्यापासून ती प्रत्येक सामन्याप्रमाणे रणनीती करत आहे. सिंधू येत्या सामन्यांमध्येही हा क्रम कायम ठेवेल. विश्वविजेती सिंधू आता कांस्यपदकापासून अगदी काही पाऊल दूर आहे पण त्यासाठी तिला जपानच्या अकिनो यामागुचीचा पराभव करावा लागणार आहे. तिची उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिच्याशी लढत होणार आहे.

यामागुचीने उपउपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या गयुन किमचा २-० असा पराभव केला. यामागुचीने हा सामना २१-१७, २१-१८ असा जिंकला. सामन्यानंतर सिंधू म्हणाली की बऱ्याच लोकांनी तिला या स्पर्धेचे महत्त्व सांगितले आहे आणि या स्पर्धेत सामन्याप्रमाणे वेगळी रणनीती आखणे अधिक चांगले आहे.