सचित बोरकर खून : संशयितास ६ दिवसांची कोठडी

-

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th July 2021, 11:52 pm
सचित बोरकर खून : संशयितास ६ दिवसांची कोठडी

मडगाव : मडगाव कोकण रेल्वे स्थानकासमोरील गाड्यावर किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत सचित बोरकर (वय ४७, रा. आके मडगाव) याला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी मोतीडोंगर येथील रहिवासी संशयित लक्ष्मण चव्हाण उर्फ पिका याला मडगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ६ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

मडगाव रेल्वे स्थानकासमाेरील रेणुका उर्फ लांबा यांचा आमलेट रस्साचा गाडा असून २५ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारात सचित बोरकर याला लक्ष्मण चव्हाण याने किरकोळ कारणावरून मारहाण केली. सचित याला धक्काबुक्की केली व त्याच्या डोक्यावर गाड्यावरील खुर्चीने वार केला. या मारहाणीत सचित बेशुद्ध झाल्यानंतर उपस्थितांनीच त्याला हॉस्पिसिओत दाखल केले. पोलिसांना त्यांनी अपघात झाल्याचे सांगितल्याने पोलिसांनी अपघातासंदर्भात गुन्हा नोंद केला होता. उपचारादरम्यान सचित याचा बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात २६ रोजी पहाटे ३.३० वाजता मृत्यू झाला. त्यानंतर सचित याच्या नातेवाईकांनी मडगाव पोलिस ठाण्यात येत सचितचा अपघातात मृत्यू झालेला नसून त्याला मारहाण करण्यात आली होती, असे निवेदन सादर केले व त्यांनी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांचीही भेट घेतली. त्यानंतर मडगाव पोलिसांनी सचित बोरकर याचा मृत्यू हा मारहाणीत झाल्याने खून प्रकरणी गुन्हा नोंद केला. चौकशीनंतर मडगाव पोलिसांनी मोतीडोंगर येथे राहणारा संशयित लक्ष्मण चव्हाण उर्फ पिका याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याला रीतसर अटक केली. त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 


हेही वाचा