‘ज्ञानदेव संकीर्तन’

-

Story: युट्यूबची जादूगिरी/ स्नेहल कारखानीस |
25th July 2021, 12:39 am
‘ज्ञानदेव संकीर्तन’

‘भगवद्गीता’ ही भगवंताची तत्त्वमूर्ती, तर ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवंताची वाङ्मयमूर्ती होय. 

   उपजे ते नाशे

   नाशलें पुनरपि दिसे

   हे घटिकायंत्र जैसे

   परिभ्रमे गा !!

हे श्री ज्ञानदेवांनी केलेले मानवी जीवनाचे थोडक्यांत वर्णन आहे. काय आहे हे मानवी जीवन ? जे जे आपल्या डोळ्यांना दिसते, इंद्रियांना जाणवते, ते सगळे काय आहे ? त्या सगळ्याला आधार काय ? बहुसंख्य लोक असे मानतात की या सगळ्याचा आधार देव आहे. कोण आहे देव ? कसा आहे तो ? कुणी बघितलाय त्याला ? कुणी त्याचे वर्णन केलेय का ? हो. देवाचे प्रत्यक्ष तत्त्वरूप वर्णन व्यासांनी महाभारतांतल्या भगवद्गीतेत केले आहे. ते संस्कृतमध्ये तत्त्वरूप स्वरुपात असल्यामुळे सामान्य मराठी वाचकाला सोपेपणी आकलन होण्यासारखे नाही ! ते त्या ज्ञानापासून वंचित राहू नयेत या कळवळ्याने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता मराठी वाचकांसमोर मराठी भाषेत वाङ्मय रूपाने सादर केली. काव्य, प्रासादिकता, व्यावहारिक दृष्टांत, सिध्दांत, रसाळता आणि तत्त्वचिंतन या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी लोकजीवनात सर्वोच्च शिखरावर जाऊन पोचला आहे. 

ज्ञानेश्वरीतील सिध्दांत, विषय प्रतिपादनाची रम्य शैली पाहून कोणी डोलू लागले, तर कोणी उपमा, दृष्टांताने व्यक्त झालेले काव्यदर्शन पाहून रसिकत्वाने भारावून गेले, तर कोणी, "दुःख, संकटे आणि कसोटीच्या प्रसंगी ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने मला सावरले आहे. मुखी पसायदाना व्यतिरिक्त मी अन्य कर्मकांड केलेले नाही. मानवी जीवनात दुःख कोणालाही चुकलेले नाही. मनाचे सांत्वन करण्यासाठी मी ज्ञानेश्वरीचा आधार घेत आलो आहे. दुःखमुक्तीचा याहून सोपा मार्ग नाही या निष्कर्षाप्रत मी आलो आहे." असा अनुभव व्यक्त करत ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक होऊन गेले.

ज्ञानेश्वरांनी आपल्या ओव्यांमधून समाजाला साहित्याप्रती आस निर्माण करून दिली. आजही ज्ञानेश्वरांच्या विचारांना शिळेपणा आला नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त करीत, 'ज्ञानदेव संकीर्तन' या नावाने आपल्या युट्यूब चॅनलद्वारे ज्ञानेश्वर माऊलींचे आध्यात्मिक चिंतन, प्रत्येक मराठी भाषिकांपर्यंत पोचवणारे, गोमंतकीय ज्येष्ठ साहित्यिक म्हणजेच प्रा. गोपाळराव मयेकर. ज्ञानेश्वरीचे व्यासंगी अभ्यासक, प्रभावी वक्ते, चारित्र्यवान राजकारणी, विद्यार्थीप्रिय प्राचार्य, मराठी भाषा आणि संस्कृतीचे प्रणेते आणि या सर्वांबरोबरच एक उत्तम भावकवी अशा विविध रंग-रुपातून प्रा. गोपाळराव मयेकर या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आपल्याला परिचय आहे.

'ज्ञानदेव संकीर्तन' या आपल्या युट्यूब चॅनलवर मयेकर सरांची ज्ञानेश्वरी या ग्रंथविषयावरील मार्गदर्शनपर व्याख्याने आपल्याला पहायला मिळतात. तसेच आपल्या सहज-सोप्या आणि प्रासादिक भाषेत, 'सत्य शिव सुंदर आणि ज्ञानेश्वरांचे अनुभवामृत' याविषयावर सरांनी मांडलेला सिध्दांत म्हणजे रसिकश्रोत्यांसाठी एक पर्वणीच होय. याचबरोबर, युग संजीवक अमृततीर्थ परब्रह्म ज्ञानेश्वर (चार भाग), ज्ञानेश्वरीतील काव्य सौंदर्य, पसायदानाची अपूर्वाई (दोन भाग), सत्य शिव अन् सुंदराचा अपूर्व आविष्कार (सहा भाग) अशा ज्ञानेश्वरीवर आधारित विविध विषयांचा आस्वाद घ्यायचा असेल तर मयेकर सरांच्या 'ज्ञानदेव संकीर्तन' या युट्यूब चॅनलला जरुर भेट द्या.

'साक्षात्कार म्हणजे काय?', 'साक्षात्कार हा विश्वाचा सण', 'ऋषिवचने आणि विज्ञान, 'परम सत्याचे दर्शन', 'आभास', 'विवेकनिष्ठेचा गौरव (चार भाग)', 'संत परंपरेची एकात्मता', 'मूलतत्त्वाचे स्वरूप', 'मौनाची भाषा', 'अध्यात्म आणि विकल्प', 'आत्मतत्त्व', 'चैतन्यतत्व', 'भक्तीचा पाया', 'ज्ञानेश्वरांचा आत्मप्रत्यय', 'दर्शन समृद्धिचा खेळ', 'मायावती', 'संतांनी पुरुषार्थ मारला का?', ' आत्मतत्वाचे दर्शन (भाग १ व २)', 'ज्ञानेश्वरांची भक्तिसंकल्पना (चार भाग)' अशा विविध विषयांचा समावेश असलेले, 'ज्ञानदेवांचे आध्यात्मचिंतन आणि आधुनिक विज्ञान' या मयेकर सरांच्या पुस्तकातील काही निवडक परिच्छेदांचे अभिवाचन प्रा. अनिल सामंत यांनी केले आहे, तर त्याचे ध्वनिमुद्रण श्री. दीपक मणेरीकर यांनी केले असून 'ज्ञानदेव संकीर्तन' या युट्यूब चॅनलवर आपल्याला ते ऐकायला मिळते.

प्रत्येक व्याख्यानातून प्रत्येक वेळी नव्या विषयाची नव्या पध्दतीने, नव्या दृष्टिकोनातून मांडणी करून, हलक्या-फुलक्या भाषेत, निरनिराळी उदाहरणे देत, लोकांना समजेल अशा साध्या सोप्या शैलीत आपल्या विषयांची मांडणी त्यांनी केली असून त्यांना भावलेला ज्ञानदेव त्यांनी अभ्यासपूर्वक लोकांसमोर मांडला. ज्ञानोबा माऊलींवरील असलेल्या श्रध्देतून ज्ञानदेवांचे तत्वज्ञान आणि सखोल विचार त्यांनी 'ज्ञानदेव संकीर्तन' या युट्यूब चॅनलद्वारे श्रोत्यांपर्यंत पोहोचवून आध्यात्मिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल रसिकश्रोते सरांच्या सदैव ऋणात राहतील. 

ज्ञानदेवांच्या आध्यात्मिक चिंतनाबरोबरच, गोवा कला अकादमीतर्फे उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झालेल्या "स्वप्नमेघ" या त्यांच्या काव्यसंग्रहाने मराठी भावकवितेचे दालन अधिक श्रीमंत आणि समृद्ध केले आहे. 'त्या अनंत अज्ञाताला', 'मीच माझा एकटाच', 'सावळ्या बन्सीधरा रे', 'सख्या ज्ञानराजा', 'विवेकानंद शिला-स्मारकापाशी', 'ज्ञानेशाच्या समाधीशी', 'संत स्मरण यात्रा या प्रा. मयेकर सरांनी लिहिलेल्या अनेक कवितांचे सादरीकरण अनिल सामंत यांनी 'प्रा. गोपाळराव मयेकर यांच्या कविता' या मथळ्याखाली 'ज्ञानदेव संकीर्तन' या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले आहे. 

"तुमच्या जीवनातील अनुभव हा साहित्याचा मूल आधार असतो. विविध प्रकारचे अनुभव जेवढे घेता येतील तेवढे मोकळ्या मनाने घ्या. जुन्या- नव्याचा भेद न करता व्यक्तिच्या आणि समाजाच्या कल्याणाचे जे काही असेल ते स्वीकारा. तुमच्या मध्ये जे काही चांगले असेल ते समाजाकरिता आहे याची जाणीव ठेवा." असे हे सुबोध मार्गदर्शनपर उद्गार असंख्य श्रोत्यांच्या कायम स्मरणात राहतील.

आपल्या गोड वाणीतून ज्ञानेश्वरीवर निरुपण करणारे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे पहिले अध्यक्ष, गोव्याचे माजी शिक्षणमंत्री तसेच माजी खासदार, अनेकांना गुरूस्थानी असलेले प्रा. गोपाळराव मयेकर यांनी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला अखेरचा श्वास घेतला. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून 'ज्ञानदेव संकीर्तन' या युट्यूब चॅनलद्वारे लहान थोरांना ज्ञानेश्वरीचे ज्ञानामृत पाजणाऱ्या या गुरूमाऊलींना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली.


https://youtube.com/channel/UC2tMk1iVyB3SdamLF8mgOhg