आंतरराष्ट्रीय, तात्या..

-

Story: तात्यांच्या बाता/ दीपक मणेरीकर |
25th July 2021, 12:05 am
आंतरराष्ट्रीय, तात्या..

त्या दिवशी पिठी भाकरी खाऊन जड अंगाने आम्ही ओसरीवर गप्पा ऐकत बसलो होतो. गप्पांच्या ओघात विषय निघाला स्वातंत्र्यपूर्व काळातला. तात्यांना काहीतरी आठवलं. ते आपल्या दोन्ही हातांच्या चिमटीने गळ्यातील जानवं फिरवत, डोळे किलकिले करून त्या आठवणींचं भेंडोळं सोडवू लागले. काही वेळाने, सर्वकाही साफ आठवल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. आणी लगेच तात्यांनी सुरुवात केली….

" एकदा काय झाले जाणें? तो साधारण १९४३चा काळ असावा. दुसरं महायुद्ध जोरात सुरू होतं, पण त्याची झळ गोव्यात तेवढी जाणवत नव्हती. भारतात इंग्रजांची सत्ता असल्याने आणि त्यांचा या युद्धात सहभाग असल्याने तिथे साधारण या युद्धाचे पडसाद उमटत होते. गोव्यात पोर्तुगीजांची राजवट होती व आमच्या पर्यंत भारतातील बातम्या तश्याही कमीच पोहोचायच्या. त्यादिवशी मी कुळागरांत पोफळींना पाणी लावत होतो आणी अचानक  विमानाचा आवाज अगदी जवळ येत असल्याचा भास झाला.

तो भास नव्हता. खरोखरच एक विमान आमच्या कुळागराच्या वरून, अगदी जवळून गेलं होतं व काही क्षणातच एक भयंकर मोठा बॉम्ब फुटल्यासारखा आवाज आला. मी तर्काने जाणलं, जे विमान माझ्या डोक्यावरून उडत गेलं ते जवळच कुठेतरी कोसळलं असावं. हा विचार मनात येतो म्हणेपर्यंत मला, पोफळीच्या झावळ्यांच्या मधून एक छत्रीधारी माणूस झपाटय़ाने खाली येतांना दिसला. अवघ्या काही मिनिटांत तो माणूस आमच्या, काळ्या आंब्याच्या जुनाट व प्रचंड झाडावर अडकला. मी झटपट झाडावर चढून त्या माणसाला सुखरूप खाली घेवून आलो.

त्याच्या चेहरेपट्टी व पेहरावा वरून बहुतेक तो ब्रिटीश वैमानिक असावा असं वाटत होतं. पोर्तुगीजांपासून या माणसाला काही इजा होऊ नये यासाठी मी त्याला माझ्या जवळ असलेल्या घोंगडीत झाकून माझ्या घरी नेला. त्याची व्यवस्था मी बाळंतिणीच्या काळोख्या खोलीत केली व बायकोला, झालेल्या घटनेची कल्पना दिली.

तो घरात आल्यापासून मी व माझ्या बायकोने त्याला आंबील, कोकम सरबत, ताक, दूध, भाकरी इत्यादी खूप खाण्यापिण्याच्या वस्तू देऊ केल्या. पण, पाणी व चहा सोडून दुसऱ्या कुठल्याही वस्तूला त्याने हात देखील लावला नाही. तो सतत फक्त आपल्या जवळील रेडिओवरून आपल्या लोकांशी संपर्क साधण्यात गुंतला होता. तीन दिवस असेच निघून गेले. झालेल्या गोष्टींचा मी कुणालाही सुगावा लागू दिला नाही आणि तिसऱ्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास, कसल्यातरी आवाजाने मी खडबडून जागा झालो. त्या लोकांनी अखेर आपला माणूस शोधून काढला होता.

१९४७ साली अखेर कधीतरी ते महायुद्ध संपलं, तिकडे भारतही स्वतंत्र झाला पण आम्ही अजुनही पारतंत्र्यात होतो. मागे घडलेली ती घटनासुद्धा आम्ही हळूहळू विसरून गेलो होतो. पण ती माणसं माझी माणुसकी विसरली नव्हती. एके दिवशी ते लोक माझ्या घरी आले व मला सन्मानाने आपल्या सोबत घेऊन गेले. मला त्यांनी नेला तो थेट अमेरिकेत. हो, तो वैमानिक अमेरिकी होता. अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वतः माझा तिथे सत्कार केला व मला कायम तिथेच रहाण्याचा आग्रह केला पण माझ्या गावच्या प्रेमाखातर व माझ्या माणसांच्या मायेपोटी मी तो नाकारला. त्यानंतर मला त्यांनी सुखरूप घरी आणून सोडला….."

तात्या अत्यंत भावनावश झाले होते व आम्ही सारे….. अवाक!