राजकीय अस्वस्थतेचा पूर

एका बाजूला पुराच्या थैमानातून हजारो कुटुंबे सावरत आहेत, धीराने पुन्हा उभे होण्यासाठी चाचपडत आहेत. घरांची डागडुजी करत आहेत तर दुसऱ्या बाजूला भाजप असो वा काँग्रेस सर्वांनीच आपल्या पक्षांची डागडुजी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Story: उतारा । पांडुरंग गांवकर ९७६३१०६३०० |
25th July 2021, 12:15 am
राजकीय अस्वस्थतेचा पूर

गोव्यात नद्यांचे पाणी गावांमध्ये, घरांमध्ये शिरलेले असताना लोक आपला जीव आणि संसार वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जात होते. त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची दिल्लीत पक्ष वाचविण्यासाठी खलबते सुरू होती तर गोव्यात भाजप आपली डॅमेज कंट्रोल करायला राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आगमनाच्या तयारीला लागला होता. पुराच्या पाण्याचा सुमारे पाच हजार घरांना फटका बसला, कित्येक घरे जमीनदोस्त झाली. कित्येकांनी आपल्या डोळ्यादेखत पुरामुळे घर पडत असताना पाहिले. आठ तालुक्यांमध्ये पुराने तांडवनृत्य केले. एका बाजूला पुराचे दुःख आणि दुसरीकडे राजकीय पक्षांची स्वतःच्या बांधणीसाठी सुरू असलेली तयारी असे गेल्या दोन दिवसांतले चित्र आहे.

काँग्रेसची अंतर्गत दुफळी मिटवण्यासाठी काँग्रेसचे नेते दिल्लीवारीत व्यस्त आहेत तर भाजप जागोजागी पक्षाचे झेंडे लावून नड्डा यांच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी सवाष्णींच्या हातात पंचारती देऊन तयारीत होता. एकूण काय तर पूर येवो किंवा घरे मोडून पडोत राजकीय पक्षांना त्याचे फार सोयरसुतक नाही. सरकारी पातळीवरून मदत म्हणून पुरग्रस्तांच्या हातावर शुल्लक रकमेचे धनादेश ठेवले जातील. कदाचित काहींना तेही मिळणार नाहीत. पुराने कोलमडलेली हजारो कुटुंबे सावरत आहेत. धीराने पुन्हा उभे होण्यासाठी चाचपडत आहेत. घरांची डागडुजी करत आहेत अशावेळी भाजप असो वा काँग्रेस सर्वांनीच आपल्या पक्षांची डागडुजी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून गिरीश चोडणकर यांची कारकीर्द संपुष्टात येत आहे. बाहेर राहून काँग्रेस चालविण्याचे काहींचे मनसुबे फळास येत आहेत. हा लेख छापून येईपर्यंत काँग्रेसच्या प्रदेश समितीच्या बदलाचा आदेशही दिल्लीहून निघू शकतो. गेले काही दिवस काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व कोणाकडे द्यावे त्यावरून पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद होते. इच्छुक असलेल्या सर्वांनीच चोडणकर यांना अकार्यक्षम दाखविण्याचा प्रयत्न करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. पण गेली काही वर्षे काँग्रेसचे अस्तित्व गोव्यात दिसत आहे त्याची धुरा चोडणकर यांनीच आपल्या खांद्यावर घेतली होती हे टाळता येणार नाही. सत्तेतील लोकांचे वैर नको म्हणून काँग्रेसच्या आंदोलनापासून दूर राहिलेले काँग्रेसचे काही आमदार आणि इतर नेते आता निवडणुका जवळ आल्यामुळे जागे झाले आहेत. काँग्रेसमध्ये अनेक नवे चेहरे येत आहेत. काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या आमदारांसमोर काही मतदारसंघांमध्ये नव्या चेहऱ्यांचे आव्हान उभे करण्याची तयारी चोडणकर यांनी केलेली असतानाच पक्षाला आता नवा प्रदेशाध्यक्ष द्यावा जेणेकरून निवडणुकीला उमेदवारी वाटपाची 'देवाण घेवाण' करता येईल म्हणून या गोष्टीवर काहींचे लक्ष आहे. त्याचसाठी आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद घेण्यासाठी काहीजण पुढे सरसावले आहेत. तरीही काहीजण काँग्रेसने आयुष्यभर जे हवे ते दिलेले असतानाही आपल्यालाच सगळी पदे मिळावीत म्हणून प्रयत्नशील आहेत. दिल्लीत राहूल गांधी, के. सी. वेणुगोपाल, दिनेश गुंडू राव यांनी गोव्यातील स्थानिक नेत्यांमध्ये समझोता घडवून आणला. गोव्यात २०२२ मध्ये काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात असे दिसत असल्यामुळे सर्वांनी एकत्र राहून काम करा असा मंत्र राहूल गांधी यांनी दिला आहे. लवकरच प्रदेशाध्यक्ष आणि दोन कार्याध्यक्ष नियुक्त करण्याबाबत दिल्लीहून आदेशही निघण्याची शक्यता आहे. या नव्या बदलानंतर पैसे नसतानाही दिल्लीतून येणाऱ्या एक लाख रुपयांमध्ये महिनाभर पक्षाचे काम चालवण्याची कसरत करणारे गिरीश चोडणकर यांच्या वाट्याला पुढे काय येते ते पहावे लागेल.

दुसऱ्या बाजूने भाजपने एक अंतर्गत सर्व्हे केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या सर्व्हेमुळेच भाजपात चलबिचल आहे. दिल्लीतील यंत्रणा वापरून हा सर्व्हे झाला आहे. सर्व्हे भाजपला पोषक नाही त्यामुळे २०२२ मध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता भाजपकडे रहावी यासाठी पक्ष जोमाने कामाला लागला आहे. पक्षाचे नेते वारंवार गोव्यात येऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा देत आहेत. भाजपकडे सर्वाधिक आमदार आहेत. गोव्याच्या इतिहासात सर्वाधिक आमदार असलेला हा आतापर्यंतचा एकमेव पक्ष आहे. काँग्रेसला रोखण्यासाठी भाजप सर्वप्रकारे प्रयत्न करत आहे. त्यातच उत्तराखंडमध्ये झालेला नेतृत्व बदल आणि आता कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या हालचाली असल्यामुळे गोव्यातही राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे धुरळा उठला आहे. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनीही आपण पक्षाने सांगितले तर गोव्यात यायला तयार आहोत असे म्हणून चर्चेला पुष्टी दिली. डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर नाराज असलेले आणि त्यांना हटविण्यासाठी टपून असलेले बिगर भाजप मंडळीही श्रीपाद नाईक गोव्यात यावेत यासाठी मोर्चेबांधणी करू लागले. भाजपला हा वाद किंवा अशी चर्चा परवडणारी नव्हती. हा सगळा गोंधळ निस्तरण्यासाठी लगेच या वादानंतर मुख्यमंत्री दिल्लीत गेले. तिथे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह डझनभर नेत्यांची भेट घेतली. त्यांनी जी तत्परता दाखवून दिल्ली गाठली त्यामुळे तेंडुलकर यांच्या पोस्टमुळे निश्चितच पक्षात अस्वस्थता परसरली हे स्पष्ट दिसले. या वादानंतर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा गोव्यात आल्यामुळे स्थानिक भाजपात नेमके काय चालले आहे त्याचा अंदाज घेऊनच ते दिल्लीला परततील. स्थानिक काँग्रेसमध्ये काय चालले आहे ते राहूल गांधींनी नेत्यांना दिल्लीत बोलावून जाणून घेतले. भाजपमध्ये काय चालले आहे ते जाणून घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षच गोव्यात आले आहेत. दोन्ही पक्षामध्ये सध्या अंतर्गत दुफळी मिटवण्याचेच प्रयत्न सुरू आहेत असा अंदाज या सगळ्या घटनांमधून येतो. त्यामुळे गोव्यात आलेला पूर हा या राजकीय पक्षांनी फार गांभीर्याने घेतलेला नाही. राजकीय अस्वस्थतेच्या पुराने पक्षांना डॅमेज करू नये एवढीच चिंता त्यांना लागली आहे.