Goan Varta News Ad

स्वच्छ सुंदर गाव

Story: चंद्रकांत रामा गावस |
18th July 2021, 12:09 Hrs
स्वच्छ सुंदर गाव

भटकंती करणे मला फार आवडते. भटकंतीत जे काही चांगले दिसेल ते टिपणे आणि तो अनुभव शब्दबद्ध करणे हा माझा छंद आहे. असाच एकदा केरी गावातून चोर्ला घाट मार्गे सुर्ला गावाकडे जात होतो. चोर्ला घाटातील रमणीय निसर्ग न्याहाळत असताना तो नागमोडी घाट केंव्हा संपला ते कळलेच नाही.

 घाट संपल्यावर चोर्ला  गाव लागला. तेथून सुर्लला जाण्यासाठी मी वळलो.तसा शाळा तपासणनीस म्हणून त्या गावाशी माझा संबंध जुळलेला. त्यामुळे बऱ्याचवेळा त्या गावात मी जात होतो. त्या गावी अनेकदा मी रात्रीचा मुक्कामही करीत होतो. सुर्ल हा सत्तरी तालुक्यातील ठाणे ग्रामपंचायतीत असलेला, उंच डोंगर भागात वसलेला एक छोटा निसर्ग संपन्न गाव. साधारण वीस-पंचवीस घरांनी सजलेला.  तो गाव मला खूप आवडायचा. तिथले सृष्टीसौंदर्य मनाला भुरळ घालणारं आहे. मला त्या गावाचा हिल स्टेशन सारखा अनुभव यायचा. भग्नावस्थेत पडलेल्या त्या पोर्तुगीजकालीन शासकीय चौकटीत उभे राहून पाहिल्यावर दिसतात सह्याद्रीचे उंच कडे जे गोमंतक भूमीचे रक्षण करण्यासाठी खंबीरपणे पहारा करीत उभे आहेत याची जाणीव होत होती. कर्नाटकातून म्हादई नदी गोमंतक भूमीत धबधब्यासारखे खाली उडी घेताना तिच्या पवित्र दर्शनाने माझ्या मनात उदंड ऊर्जा प्राप्त होत होती. तिथलं अल्हाददायक वातावरण अत्युच्च आनंद सागरात लोटून देत होतं. त्यामुळे स्वर्गीय आनंदाच्या डोहात डुंबत होतो. हिवाळ्यात तर तिथली बोचरी थंडी अंगात हुडहुडी आणत असे. हे सर्व सुखद धक्के सहता सहता केव्हा माझं आणि सुर्ल गावाचं ऋणानुबंधाचं नातं जोडलं गेलं हे मला कळलेच नाही

त्या दिवशी मी सूर्ल गावी भरवस्तीत गाडी थांबवली. गाडीतून खाली उतरताच मला एक अद्भुत असे दृश्य पाहायला मिळाले. त्या गावातील काही माणसे येथील मंदिर व शाळा परिसर स्वच्छ करीत असतांना मला दिसली. त्या स्वच्छता अभियानात पाच-सहा ज्येष्ठ नागरिक, काही युवक व छोटी मुलेही सहभागी झाली होती.  काहींच्या हातात एक काठी होती त्या परिसरात लोकांनी फेकलेल्या प्लास्टिक पिशव्या, कागदाचे बोळे, अनावश्यक वस्तू काठीच्या सहाय्याने ते कार्यकर्ते उचलायचे. एकत्र गोळा करून ते जाळून टाकायचे, तर काही जण झाडू घेऊन तो परिसर स्वच्छ करत होते.  त्या दिवशी मला एक विशेष आनंद पर्वणी लाभली होती. ते दृश्य पाहून मी अगदी भारावून गेलो होतो. सूर्लवाशियांचे मला फार कौतुक वाटले. त्यांच्याजवळ मी गेलो आणि म्हणालो, "छान! तुम्ही तुमच्या गावात स्वच्छता अभियान हा उपक्रम राबवून गाव स्वच्छ सुंदर ठेवत आहात ही अत्यंत भूषणावह व अभिमानास्पद बाब आहे.

त्यावर एक जेष्ठ नागरिक बोलला, " नाही सर! आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत. गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याचा प्रयत्न करत आहोत." दुसरा ज्येष्ठ नागरिक म्हणाला, "आम्ही पुढाकार घेऊन स्वच्छता करतो, म्हणून या गावचे युवक व छोटी मुलेही या कार्यात सहभागी होतात."

मी म्हणालो, "अगदी बरोबर! आपला गाव आपणच स्वच्छ ठेवायला हवा. संत गाडगेबाबा पहाटे हातात खराटा,झाडू घेऊन आपला गाव स्वच्छ करायचे. ग्रामगीतेत त्यांनी म्हटले आहे की,

'रामधून पूर्वी गाव पूर्ण व्हावे, स्वच्छ सौंदर्यवान

कोणाही घरी गलिच्छपण न दिसावे"

 सूर्ल गावातील या ज्येष्ठ नागरिकांचे विचार आणि स्वच्छता अभियानाचा गावकर्ऱ्यांचा स्तुत्य उपक्रम मला खूप आवडला.त्या गावकर्ऱ्यांना धन्यवाद देत मी शाळेकडे वळलो.