चाकोरीबद्ध वाटेने न जाणारा संकल्प महाले

" तरुणांनी जर निश्चय केला तर ते हवे तसे बदल घडवू शकतात. कारण त्यांना समस्या जाणवतात आणि त्या समस्यांना तोंड देण्याची व त्यात बदल घडवून आणण्याची क्षमता तरुणांमध्ये असते."

Story: मार्ग नवा, ध्यास नवा | सुश्मिता मोपकर |
18th July 2021, 12:08 Hrs
चाकोरीबद्ध वाटेने न जाणारा संकल्प महाले

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ।

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्र्चिद् दुःखभाग् भवेत् ।।

सद्याच्या महामारीच्या काळात ईश्वरचरणी हीच प्रार्थना सगळ्यांच्या मनात आहे. आपण देवाजवळ सगळ्यांच्या हिताची प्रार्थना करतो आणि हाच देव मनुष्याच्या रुपात आपल्या मदतीस धावतो. अशी कित्येक उदाहरणे आपल्याला अवतीभवती दिसतात. अशाच एका नवतरुणाची आज आपण ओळख करुन घेणार आहोत. तो होतकरु तरुण आहे चिकोळणा-बोगमाळो पंचायतीचा उप-सरपंच संकल्प महाले. 

संकल्पच्या या प्रवासाला योग्य दिशा महाविद्यालयीन काळापासूनच मिळाली. पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात सरचिटणीस म्हणून संकल्पची निवड झाली. यावेळीच त्याने स्वतःच स्वतःसाठी नेतृत्वाचे धडे घेतले. गोवा विद्यापीठात ' टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी ' या विद्यार्थी संस्थेच्या अंतर्गत गोवा विद्यापीठ पदव्युत्तर विद्यार्थी संघटनेचा सांस्कृतिक सचिव आणि नंतर अध्यक्षपद त्याने भुषविले . गोवा विद्याप्रसारक मंडळाचे डॉ . दादा वैद्य शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातून बी.एड.ची पदवी मिळविली. अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेऊन यशाची पायरी गाठली. हे सारे अनुभव आणि त्याच्या मित्रपरिवार व कुटुंबाकडून मिळालेले पाठबळ यानेच त्याला पंचायत निवडणुकीत भाग घेण्यास उद्युक्त केले व चिकोळणा- बोगमाळो पंचायतीचा पंच सदस्य म्हणून तो विजयी झाला आणि आज तो हे उप-सरपंचाचे पद सांभाळूनही आपली कर्तव्ये आणि जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडताना दिसत आहे.

कामाच्या स्थळी स्वतः हजर राहणारा, लोकांच्या हाकेला धावणारा, लोकांना मदतीचा हात देणारा, कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडून देता येईल ते शंभर टक्के देणारा हा तरुण सर्वांनाच दिसला. त्याच्या या वाटचालीत खूप लोकांचे आशीर्वाद त्याला लाभलेले आहेत. अशावेळी चिकोळणा- बोगमाळो पंचायतीचे पूर्वीचे माजी सरपंच इनासियो यांच्या नजरेतून संकल्प काही सूटला नाही. मागील चार वर्षांच्या कालावधीत तेही पंचसंदस्यांपैकी एक होते. सद्या संकल्प ज्या पदावर आहे ते पद सांभाळण्याचा कालावधी त्यांचा होता, पण या पदासाठी त्यांनी संकल्पला योग्य मानले आणि आपले पद सुपुर्द केले. हा त्यांचा मोठेपणा होता असे म्हणावे लागेल. आता ते आपल्यात नाहीत तरीही त्यांनी दाखविलेला मार्ग आणि आशीर्वाद संकल्पवर सदैव राहतील. महामारीच्या काळातही संकल्प समाजकल्याणासाठी झटताना सगळ्यांच्या नजरेस पडत आहे. 

मागील चार वर्षांत संकल्पचे काम कोणी जवळून पाहिले असेल तर ते त्याच्या गावातील लोकांनी आणि सर्वांना माहीत आहेच की त्याने कधीही कोणाला कशाच प्रकारची मदत करण्यास नकार दिला नाही. पडेल ते काम करण्यास तो सदैव तत्पर असतो. महामारीच्या काळात गरजू लोकांपर्यंत मदतीस कोणी पोहचू शकत नव्हते अशावेळी संकल्प त्या लोकांच्या मदतीला धावला. लोकांना आवश्यक साहित्य, औषधपाणी उपलब्ध करुन देणे यासारखी कामे त्याने केली आहेत. गावात पॉझिटीव्ह असलेल्यांना हव्या त्या गोष्टी स्वतः जाऊन दिल्या. त्यानंतर त्या लोकांचे संपूर्ण घर सॅनिटाइज करण्यासही तो स्वतः गेला. स्वतःची पर्वा न करता गरजेच्या वेळी या लोकांना मदत करायला तो एका पायावर उभा राहिला. लसीकरणाच्या वेळीही तो सगळे सुरळीतपणे घडवून आणण्यास वावरत आहे. महामारीच्या या काळात त्याच्या वागण्यातून माणूसकीचे दर्शन घडले, त्याने अनेकांना मदतीचा हात दिला. 

उप-सरपंचपदी निवड झालेल्या क्षणी ज्या जबाबदाऱ्या संकल्पने हाती घेतल्या होत्या त्या यशस्वीरित्या तो पार पाडत आहे. जी कामे करणार म्हणून गावातील लोकांना शब्द दिला होता ती सगळी कामे पूर्णत्वास नेली आहेत. काही दिवसांपूर्वी तौक्ते वादळाने गावचे चित्रच बदलून टाकले. झाडांच्या फांद्या तर विजेच्या तारांना आणि घरांच्या कौलांना सोबत घेऊन थेट पृथ्वीला स्पर्श करण्यास खाली वाकल्या. अशा परिस्थितीत संकल्पने आपले सहकारी मित्र सरपंच लॉरेना कुन्हा, क्लाउडियो डिक्रुझ, अरुण नाईक,  नारायण ढोले, जर्जिनो वालसान, साईश नाईक, सखाराम नाईक, मितांशु कवळेकर, सावियो वाझ, रेखा देसाई, आनंद गडेकर, भुपेन क्षेत्री  यांच्या सोबतीने लोकांच्या मदतीस धावला. 

संकल्प आज केवळ आपल्या गावातीलच नव्हे तर राज्यातील तरुणांचे प्रेरणास्थान बनला आहे. एम. ए., बी. एड चे शिक्षण घेऊन तो केवळ शिक्षकी पेशाच्या दिशेने स्थैर्यतेने वाटचाल करु शकला असता. शिक्षण पूर्ण झाले की आपल्याला नोकरी मिळावी आणि आपण आयुष्यात स्थिर व्हावं असेच स्वप्न आपण पाहत असतो, पण संकल्पने मात्र त्या वाटेवर चालताचालता समाजकल्याणाचाही ध्यास धरला. चाकोरीबद्ध वाटेने न जाता समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्याने वेगळीच वाट चोखाळली आणि त्या दिशेने तो आता यशस्वीपणे वाटचालही करत आहे. खूप माणसांना वाटत असते की समाजासाठी आपण काहीतरी करावे. पण सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. हे कार्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा, समाजाप्रती असलेला आदरभाव, कर्तव्यभावना आणि जिद्द असावी लागते. या सगळ्या गोष्टी संकल्पमध्ये आहेत आणि ते त्याच्या महाविद्यालयीन जीवनापासून आतापर्यंत सगळे पाहत आले आहेत.  कोणतीही समस्या आपल्यासमोर आली तर आपण सामोरे जाऊ अशी तयारी ठेवणारा हा तरुण लोकांच्या हितासाठी काम करण्याचा सल्ला देतो. आजच्या परिस्थितीत युवा पिढीची भूमिका स्पष्ट करताना संकल्प म्हणतो, " तरुणांनी जर निश्चय केला तर ते हवे तसे बदल घडवू शकतात. कारण त्यांना समस्या जाणवतात आणि त्या समस्यांना तोंड देण्याची व त्यात बदल घडवून आणण्याची क्षमता तरुणांमध्ये असते." संकल्पवर विश्वास ठेवणाऱ्या माणसांना आज त्याच्याविषयी सार्थ अभिमान.