‘तिला’ बोलू द्या..!

महिलांनी कोणते कपडे घालावेत, समाजात कसे वावरावे, कसे बोलावे आणि कसे व्यक्त व्हावे, हे कोणी ठरवले? मनोरंजन विश्वात हा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ यांच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टवरून उठलेल्या कल्लोळावरील निरीक्षण.

Story: मनोरंजन | सचिन खुटवळकर |
17th July 2021, 11:39 pm
‘तिला’ बोलू द्या..!

नांजलीची कहाणी कदाचित काहींना माहीत नसेल. पण आजच्या काही संदर्भांमुळे या कहाणीची उजळणी करावीच लागेल. कारण डोक्यात घाण आणि डोळ्यांत वासना असणारी गिधाडे घिरट्या घालत आहेत. स्त्रीला व्यक्त होण्यापासूनही वंचित करण्याचे मनोरे खुलेआम रचले जात आहेत. शास्त्रात शूद्र म्हणून कुठे तरी उल्लेख असलेल्या जगन्मातेला आज पुन्हा पडद्याआड ढकलण्याचे उपद्व्याप काही महाभाग करू इच्छितात. त्यामुळे नांजलीचा इतिहास अशांना नव्याने सांगणे क्रमप्राप्त आहे.

ब्रिटिश शासित भारतातही शुद्रांना अनन्वित अत्याचारांना सामोरे जावे लागत असे. केरळमध्येही असे घडत असे. साधारणपणे १०० वर्षांपूर्वीची ही घटना आहे. मुलाच्छीपुरम किंवा स्तन असलेल्या महिलेची भूमी असे आताचे नाव असलेल्या या गावात एक धक्कादायक घटना घडली.

ब्रिटिशशासित भारतात अस्तित्वात असलेल्या ५५० राजघराण्यांपैकी एक असलेल्या त्रावणकोर राज्याच्या राजाने ‘स्तन-कर’ लागू केला होता. खालच्या जातीतील स्त्रियांना आपले स्तन झाकण्याची परवानगी नव्हती आणि तसे केल्यास त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर आकारला जात असे. अर्थात या कारस्थानामागे जातीची रचना टिकवून ठेवणे हा होता. त्या काळात कपड्यांवरील सामाजिक चालीरीती एखाद्या व्यक्तीच्या जातीच्या दर्जानुसार तयार केल्या जात होत्या. याचा अर्थ असा होता की ते केवळ त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवरून ओळखले जाऊ शकत होते. 

एझावा या हीन समजल्या जाणाऱ्या  जातीत एक स्वाभिमानी महिला होती. नांजली असे तिचे नाव. तिने स्तन-कर न भरता छाती झाकून निषेध करण्याचा निर्णय घेतला. इसवी सन १९०० च्या दशकाच्या सुरुवातीस खालच्या जातीच्या दर्जाच्या महिलेसाठी हे एक मोठे दिव्य होते. जेव्हा राजाच्या कर निरीक्षकाच्या कानावर ही खबर गेली, तेव्हा तो तिच्या घरी गेला आणि तिला कथित कायदा हातात न घेण्याची तंबी दिली. मात्र स्वाभिमानी नांजलीने कर भरण्यास नकार दिला आणि त्याऐवजी निषेध म्हणून चक्क धारदार हत्याराने स्वत:चे स्तन कापले.

त्या काळात हे धाडस तिने केले. मात्र अतिरक्तस्रावामुळे नांजलीचा मृत्यू झाला. तिच्या पतीने तिच्या चितेत उडी मारून आत्महत्या केली. या जोडप्याला मूल नव्हते. एका पाशवी प्रथेविरोधात लढणाऱ्या दांपत्याचा असा करुण अंत झाला. तिचे कृत्य निःस्वार्थी होते. यातून त्रावणकोर राज्यातील सर्व कथित हीन जातीतील स्त्रियांना जाचक अटीतून मुक्ती मिळावी, हा हेतू मात्र सफल झाला. शेवटी राजाला स्तन-कर मागे घेणे भाग पडले.

नांजलीचा हा धिरोदात्त इतिहास आज उगाळण्याचं कारण म्हणजे सध्या सगळीकडे चर्चेत असलेली स्त्रियांच्या स्तनांविषयीची पोस्ट. स्त्रीने स्तनांचा आकार लपवावा, शक्य होईल तिथे स्तनांबद्दल काळजी घ्यावी, असा सर्वसाधारण समज आहे. या समजापोटी आणि या धारणेच्या ओझ्यापोटी वयात येऊ पाहणाऱ्या मुलींपासून ते वयस्क स्त्रीपर्यंत सगळ्यांची जी फरफट होते, ती हेमांगी कवी-धुमाळ या मराठी अभिनेत्रीने मांडली आहे. तिच्या फेसबुक पेजवर जाऊन ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ ही मूळ पोस्ट वाचल्यास या विषयाची दाहकता समजेल. कोणीही सहृदयी माणूस, मग ती स्त्री असो वा पुरुष स्तनांबद्दल महिला घेत असलेल्या या ‘अघोरी’ काळजीचे वास्तव जाणून घेतल्यानंतर नक्कीच हळहळेल. नव्हे, या पोस्टला अनुषंगुन हेमांगी यांनी मांडलेल्या मोकळ्या विचारांचे समर्थनही करेल. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रथाशरण मानसिकतेमुळे विवेकाची उंची हरवलेल्या अनेकांनी (यात काही स्त्रियाही आल्या!) हेमांगी यांच्या मताला आक्षेप घेतला. ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ हा विषय स्त्रियांची मासिक पाळी आणि लैंगिक शिक्षणाइतकाच अडगळीत पडलेला आहे. अशा विषयावर मुक्तपणे एखादी स्त्री व्यक्त होत असेल, स्वत:चे व्यक्तीस्वातंत्र्य वापरून समाजाने लादलेल्या आणि नकोशा वाटणाऱ्या  धारणांना आव्हान देत असेल, तर त्याचे खंडन करण्याचा प्रश्नच येत नाही. उलट अशा स्त्रीच्या पाठिशी राहायला हवे. तिला बोलू द्यायला हवे. परंतु हेमांगी यांच्या पोस्टवरील विरोधी कमेंट्स वाचल्या, तर पूर्णत: भ्रमनिरास होतो.

अर्थात, जसे व्यक्तीस्वातंत्र्य हेमांगी कवी यांना आहे, तसेच ते विरोधी मते व्यक्त करणाऱ्यांंनाही आहे. पण जरा विचार करा. तुमच्या घरातील आई किंवा बहिणीने असा विचार मांडला, तर तिचे समर्थन कराल की विरोध कराल? या प्रश्नाची आणखी एक बाजू अशी की, मुळात हेमांगी यांनी त्रासदायक ठरणारे ब्रा स्त्रियांनी न घालण्याविषयी मांडलेला विचार हा असंख्य स्त्रियांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया असू शकते. कदाचित तुमच्या-आमच्या घरातील महिलांचीही तीच भूमिका असू शकणार नाही कशावरून? कधी मोकळेपणाने संवाद झाला आहे का अशा विषयांवर? नाही! मग जजमेंट देऊन मोकळे होण्याची घाई कशासाठी? दुसरा एक कंगोरा असा की, ब्रा हे अंतर्वस्त्र पर्याय म्हणून स्वीकारले गेले आहे. जसे पुरुष (पुरुषांनाही दोन स्तन असतात!) बनियन घालतात, तशाच स्त्रिया ब्रा घालतात. दॅट्स इट! मग एखादीने वेगळा विचार मांडून शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही त्रासदायक ठरणारे हे प्रावरण न वापरण्याचा मानस बोलून दाखवला तर बिघडले कुठे? 

आता कोणी म्हणेल, मग इतक्या स्त्रिया ही अंतर्वस्त्रे घालतात, त्या मूर्ख आहेत का? मुळीच नाही! तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. जसा एखादे वस्त्र घालण्याचा एखादीचा अधिकार आहे, तसाच एखादे वस्त्र घालण्याचे संकेत अव्हेरण्याचा अधिकारही तिला आहे. हेमांगी यांनी घरगुती वातावरणाचा उल्लेख करून हा विषय खूपच सुलभपणे मांडला आहे. कामाच्या ठिकाणी, समाजात वावरताना अशी अंतर्वस्त्रे किंवा अन्य सो कॉल्ड ड्रेस कोडशिवाय घरगुती माणसांत वावरताना स्वत:ला आणि कुटुंबीयांनाही जसे वावगे वाटत नाही, तसेच मोकळे, निकोप वातावरण समाजातही असावे, असा तिचा साधा सरळ मुद्दा आहे. त्यासाठी माध्यम म्हणून तिने ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ हा शब्दप्रपंच उभा केला आहे. अशा खऱ्या अर्थाने प्रबोधक आणि पुरोगामी विचार मांडणाऱ्या‘ स्त्रियांना पाठबळ द्यायला हवं की नको? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने स्वत:चा विवेक जागृत ठेवून स्वत:लाच द्यावे. ते उत्तर देण्याआधी नांजलीची कहाणी एकदा शांतचित्ताने समजून घ्यावी. त्रावणकोरच्या राजाचा प्रतिगामी थाट आता पुरे झाला. मुलीबाळींना जरा मोकळा श्वास घ्यायला द्या. त्यांना किमान व्यक्त होऊ द्या, तिला बोलू द्या!

(फोटो सौजन्य : गुगल )