मासिकेचा कप म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात शंभर प्रश्न येतात. याच प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत ' कप क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीमा खंडाळे.
मासिकेचा कप या जरा आगळ्यावेगळ्या दोस्ताविषयी थोडया वेगळ्या रीतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया… तुमच्या नजरेतून जरा त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करूया. मला वाटतं अजुनही तुमचे प्रश्न असतील.. मागच्या लेखात अशाच काही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी केला. या भागात पाहूया अजून काही प्रश्नांची उत्तरे जी मेंस्ट्रुअल कप म्हटल्यानंतर महिलांना भेडसावत असतात...
ऋतू कप किंवा मासिकेचा कप, हा सिलिकॉनचा बनलेला, मेडिकली ग्रेडेड मटेरियलचा असतो.
आरोग्याच्या दृष्टीने हा एक उपयुक्त असा पर्याय आहे. शरीरात ठेवण्यासाठी हे एक योग्य मटेरियल आहे. एक कप साधारण ५-१० वर्षे आपण वापरू शकतो, अर्थात, हा आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर पर्याय होतो, कसा ते सांगते…सॅनिटरी पॅडसाठी तुम्ही महिन्याला १००-१२५/- खर्च करता. वर्षाला साधारण १२००-१५००/- एक कप (चांगल्या कंपनीचा) आपण सरासरी एक हजार रुपयांचाही म्हटला, तरी आपले पैसे ५-६ महिन्यात वसूल होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे, ज्या कारणासाठी मी हे काम सुरू केले, पर्यावरण संरक्षणार्थ!!!एक कप वर्षानुवर्षे वापरल्यामुळे, आपण कचराच करीत नाही.
एका वाक्यात सांगायचे झाले तर, आरोग्याच्या दृष्टीने, आर्थिक दृष्टीने आणि पर्यावरणाच्या दृष्टीने, हा मासिकेचा कप किंवा ऋतू कप फायदेशीर पर्याय ठरतो. हा कप वापरायची एक विशिष्ट पद्धत आहे, ती जरा समजून घेतली की कपची आणि आपली गट्टी जमलीच म्हणून समजा! हा कप साधारण २०-२२ मि.ली. इतका मासिक स्त्राव एका वेळी साठवू शकतो.
एका मासिक चक्रात आपले साधारणपणे ५०-६० मिलीं मासिक स्त्राव जाते, त्यामुळे हा लहानसा कप त्याचे काम अगदी नीट करतो. आपल्याला ज्या दिवसात जास्त स्त्राव असतो, त्या वेळी ३-४ तासात कप काढून धुवून पुन्हा वापरावा. इतर दिवसात ८-१० तासांनी ही धुतला तरी चालतो. २ ते ३ पाळीच्या चक्रात आपल्याला या सगळ्या गोष्टींचा नीट अंदाज येतो.
पाळीच्या पूर्वी आणि पाळीसंपल्या नंतर, कप गरम उकळत्या पाण्यात स्वच्छ करून ठेवला की झाले! थंड आणि गरम पाण्यात कप स्वच्छ होतो. कुठला ही साबण, डिटर्जंट कप स्वच्छ करायला वापरू नये.
१५-१६ वर्षांपासून हा कप कुठलीही मुलगी किंवा स्त्री योग्य मार्गदर्शनाखाली वापरू शकते. कप वापरताना तुम्ही पोहू शकता, पावसात भिजू शकता, आपल्या आवडीचे, रंगाचे कपडे बिनधास्त घालू शकता. आपल्याला डाग पडण्याची भीती नसते, मांड्यांची कातडी घासण्याची (rashes) भीती नसते. कधी कधी तर आपली पाळी सुरू आहे हे ही आपण विसरून जातो. इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी जर एका छोट्याशा कपमुळे शक्य होत असतील तर का नाही त्याच्याशी दोस्ती करावी? तुम्ही स्वतःलाच एक साधा प्रश्न विचारून बघा, तुम्हाला आरोग्य महत्त्वाचे आहे? पर्यावरणाची तुम्हाला थोडी काळजी आहे? पुढच्या पिढीला तुम्ही स्वच्छ पर्यावरण देऊ इच्छिता?
जर उत्तर 'हो' असेल तर हा शाश्वत पर्याय अवलंबलाच पाहिजे ...चला तर मग, एक छोटेसे पाऊल पुढे जाऊया या शाश्वत पर्यायाला सोबत करत!!! ऋतू कप सोबत!!!