ओटीटीचा मराठीतही बोलबाला...

ओटीटी अर्थात ओव्हर द टॉप हेच पुढील काळात मनोरंजनाचे प्रमुख साधन असेल. नव्हे, ती जागा ओटीटीने आजच पटकावली आहे. पण यात मराठी कुठे आहे? एका बाजूने अन्य प्रादेशिक भाषांचा ओटीटीमधील सहभाग वाढत असताना मराठीतील निर्मिती मागे आहे का? मराठीत ओटीटीला किती भवितव्य आहे? याचा धांडोळा...

Story: सचिन खुटवळकर |
04th July 2021, 12:38 am
ओटीटीचा मराठीतही बोलबाला...

करोनाचे संकट मनोरंजन क्षेत्राच्या मुळावर आले आहे. चित्रपट क्षेत्र असो किंवा मालिका, नाटके असो किंवा इतर मनोरंजनाची साधने. सगळ्यांनाच करोनामुळे आलेल्या मर्यादांची झळ बसली आहे. यातून मार्ग कसा काढावा, या विवंचनेत कलाकार आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित लोक असताना ओटीटी हा नवा पर्याय त्यांना खुणावू लागला आहे. भारतातल्या अन्य प्रादेशिक भाषांमध्ये ओटीटी धुमाकूळ घालत असताना मराठी मागे कशी राहील? त्यामुळे काही निर्मात्यांनी मराठी वेब सीरिज काढून अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मवर नशीब अजमावून पाहिले. पण त्यात म्हणावा तसा प्रवाहीपणा आला नाही. 

ओटीटीचा इतिहास तब्बल तेरा-चौदा वर्षे जुना आहे. नेटफ्लिक्सने २००७ सालीच नव्या पिढीतील टेक्नोसॅव्ही प्रेक्षकांच्या गरजा ओळखून हा प्लॅटफॉर्म वापरला. अमेरिकेसारख्या देशात तो प्रचंड लोकप्रिय ठरला, फोफावला. पण भारतात किंवा आशियात ओटीटीचे आगमन आणि तो स्थिरावण्यासाठी करोनाची लाट यावी लागली. त्यासाठी अनेक कारणे आहे. यातील पहिले कारण म्हणजे, मनोरंजनाचे सर्वांत सोपे माध्यम असणारे टेलिव्हिजन. एक मोठा वर्ग टीव्ही हेच मनोरंजनाचे साधन मानतो. त्यानंतर थिएटर किंवा नाट्यगृहात जाऊन कलास्वाद घेणारे लोक. ऑनलाईन माध्यमातून बसल्याजागी मनोरंजन करणारी युट्यूब किंवा अॅपचा वापर मर्यादित प्रमाणात होतो. भारतीयांच्या दुर्दैवाने काही शहरी भाग वगळता आपल्या देशात सक्षम मोबाईल नेटवर्कची सेवा पुरवली जात नाही. डिजिटल इंडियाचे वारे वाहत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साधे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नेटवर्क मिळत नाही. तिथे ओटीटी किंवा ऑनलाईन मनोरंजनाच्या बाता न मारलेल्याच बर्याक! असो.

बहुआयामी वापरामुळे मोबाईल हा आज शरीराचा एक कृत्रिम अवयव झालेला आहे. याच मोबाईलच्या माध्यमातून मनोरंजनाचे क्षेत्र काबिज करण्यासाठी ओटीटीची घोडदौड सुरू आहे. गेल्या एक-दोन वर्षांपासून ओटीटीवरून हिंदी भाषेतील कंटेंटचा प्रचंड भडिमार सुरू आहे. या आशयाच्या दर्जाबाबत मतप्रवाह वेगवेगळे आहेत. मात्र जमेची बाजू ही की, हा आशय लोकांना आवडेल, रुचेल असाच बनवला जातो. किंबहुना लोकांना अपेक्षित असलेला आशय दिला जातो, असे म्हणावे लागेल. त्यामुळेच शिव्या, प्रणय दृश्ये आणि हिंसा सर्रासपणे दिसून येते. आता प्रश्न हा आहे की, हिंदीच्या तुलनेत रांगत रांगत सावरू पाहणाऱ्या मराठी आशयाला नेमका कुठला धागा पकडून मनोरंजनाचे जग जिंकता येईल. या प्रश्नाचे उत्तर नजिकच्या काळात मिळेलच. परंतु हिंदीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मराठी प्रेक्षकांच्या एका मोठ्या वर्गाची कथित अभिरुची पाहता, मराठीतील ओटीटी आधारित निर्मिती हिंदीच्याच वाटेने चालेल, अशी चिन्हे आहेत.

अलीकडचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास, गेल्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत ओटीटीवर सादर होणाऱ्या वेबसीरीजमध्ये मराठी आशयाला स्थान मिळत नसल्याची निर्मात्यांची तक्रार होती. अनेक प्रतिष्ठित कंपन्या मराठी वेबसीरीज प्रदर्शित करण्यासाठी नकार देत असल्याने महाराष्ट्रातील अनेक कलावंतांच्या कलाकृती रसिकांच्या समोर येत नाहीत, असा त्यांचा आरोप होता. लॉकडाऊनच्या काळात अनेक वेबसीरीज प्रदर्शित झाल्या. मात्र त्यात मराठी वेबसीरीजची संख्या नगण्यच होती. अनेक प्रतिष्ठित ओटीटी प्लॅटफॉर्म तर मराठी आशयाला आजही विचारातही घेत नाहीत. त्यामुळे मराठी वेबसीरीजची निर्मिती होत असली, तरी त्या कुठे प्रदर्शित करायच्या, असा प्रश्न निर्मात्यांसमोर आणि कलाकारांसमोर उभा होता. ‘हुतात्मा’, ‘गोंद्या आला रे’, ‘एक थी बेगम’, ‘समांतर’, ‘डेट विथ सई’, ‘हॉर्न ओके प्लीज’, ‘काळे धंदे’, ‘सेक्स, ड्रग्ज अँड थिएटर’ अशा काही मराठी वेबसीरीज विस्कळीतपणे वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्या. ही गेल्या दीड-दोन वर्षातील मराठीतील ओटीटी निर्मितीची स्थिती. मात्र हक्काच्या व्यासपीठा अभावी वेबसीरीजच्या अनेक कल्पना पडून राहिल्या. हीच स्थिती चित्रपटांची. काही मराठी चित्रपटांना ओटीटीवर स्थान जरूर मिळाले. त्यात अलीकडच्या ‘पिकासो’, ‘दिठी’चा समावेश आहे. मात्र असे काही अपवाद वगळता सरसकट मराठी चित्रपटांना व्यावसायिक ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोकळीक मिळाली नाही. कमी बजेट हा एक आणखी मोठा अडथळा. निर्मितीसाठी येणारा खर्च कमी असलेल्या मराठी वेबसीरीजना प्रदर्शनासाठी जास्त पसंती ओटीटी प्लॅटफॉर्मकडून मिळते. मोठ्या खर्चाच्या भव्य कल्पना त्यामुळे मागे पडल्या. साहजिकच हिंदीच्या धर्तीवर ‘जो बिकता है, वही बनता है’ म्हणत उथळ आशयाला पसंती मिळू लागली. मात्र ओटीटीने एक मोठे जग खुले केले आहे, हे ध्यानात घ्यायला हवे. तुमच्या कंटेंटमध्ये दम असेल, निर्मितीमूल्य व्यावसायिक स्पर्धेत टिकणारे असेल, तर अशी कलाकृती जगभर स्वीकारली जाते. सबटायटल्सचा पर्याय वापरून जगाच्या पाठीवर कुठेही चांगला आशय पोहोचवता येतो. त्यामुळे बजेटची चिंता आणि नेटवर्क कनेक्टिविटीचा मुद्दा फारसा पटण्यासारखा नाही. मराठी निर्मात्यांनी या गोष्टी ध्यानात घेऊन हे नवे अवकाश व्यापून टाकण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

इंटरनेट तसेच नव्या तंत्रज्ञानामुळे आपल्या काम करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म हा त्यातलाच एक बदल. आजची पिढी याच ओटीटीच्या प्रेमात आहे. गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाने सगळ्यांचीच गणिते बिघडवून टाकली आहेत. सिनेमागृहे, रंगभूमीचे पडदे बंद झाली. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक आणि अगणित कलावलंबितांची कमाई ठप्प झाली. अशा स्थितीत ओटीटी हा पर्याय काही प्रमाणात दिलासादायक ठरला आहे. नाट्यसृष्टी अजूनही सावरली नसली, तरी चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील मंडळी हळूहळू सावरत आहेत. एका अर्थाने सध्याच्या स्थितीत मनोरंजन क्षेत्र ओटीटी प्लॅटफॉर्मवरच अवलंबून आहे. केवळ मोबाईल फोनच नव्हे, तर कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हींच्या माध्यमातूनही ओटीटी वापरणे शक्य होते. त्यामुळे भविष्यात गावोगावी डिजिटल इंडिया हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्णत्वास आला, तर ओटीटी भारतात सुसाट प्रगती करेल हे नक्की. कारण हल्लीच जाहीर झालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्स, अॅरमेझॉन, डिस्ने, हॉटस्टार आणि सोनी लाइव्हसारख्या इंटरनॅशनल ओटीटी प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रादेशिक भाषांचा मजकूर अर्धा टक्काही नाही. कारण इथे तितक्या प्रमाणात निर्मिती अद्याप होत नाही. या पार्श्वभूमीवर करोनाच्या निमित्ताने का होईना, प्रादेशिक भाषांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म येत आहेत. गुजराती, तेलगू, मल्याळम, बंगाली, पंजाबी भाषांतही ओटीटी प्लॅटफॉर्म आले आहेत. लोकप्रियही होत आहेत. मराठीचा पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’ काल-परवा लाँच झाला. त्यामुळे येणाऱ्या. काळात असे आणखी मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध होतील आणि कोविडच्या आव्हानात्मक काळात मनोरंजन क्षेत्रातील मरगळही दूर होईल, अशी अपेक्षा करुया.