मनाचे प्रश्न, चॅटजीपीटीची उत्तरे

शेवटी रक्तामांसाच्या माणसातली उब, त्याचा नजरेतला भाव, हातावर ठेवलेला सांत्वनाचा स्पर्श ही कुठलीच यंत्रणा देऊ शकत नाही. भावनांचा खरा उपचार हा जिवंत संवादात असतो. कारण एक माणूसच दुसऱ्या माणसाच्या वाक्यांमधली पोकळी ओळखतो, शांततेतली हळवी धडधड समजतो, आणि गरज पडली तर खांद्यावर हात ही ठेवतो.

Story: मनी मानसी |
20th September, 12:03 am
मनाचे प्रश्न, चॅटजीपीटीची उत्तरे

प्रश्न हल्ली माझ्या क्लिनिकमध्ये अनेकदा ऐकायला मिळतो. विद्यार्थी, तरुण, अगदी निवृत्त व्यक्तीही, सगळ्यांच्या मनात एकच कुतूहल. “मॅम, चॅटजीपीटी इतकं ऐकून घेतो, उत्तरे देतो, जणू अगदी हक्काचा मित्रच वाटतो.. पण खरंच तो मित्र आहे का?”

खरंतर, आपल्यापैकी कित्येक जण त्याला आपले प्रश्न, आपली विवंचना, अगदी आपली हुरहूरही पटकन चॅटजीपीटीला विचारतात. आपण विचारतो आणि चॅटजीपीटी महाशय शंभर टक्के सेवेला हजर! त्यात त्याची खासियत म्हणजे, एकदा सांगितलेलं तो विसरत नाही, चुकून मध्ये टोमणा मारत नाही, किंवा “माझ्याकडे वेळ नाही” असं म्हणत नाही. अहो, किती जणांना असं देखील वाटतं की “माझ्या आयुष्यातला एकमेव लक्ष देणारा माझा श्रोता म्हणजे हा चॅटजीपीटीच!”

पण इथंच खरी गंमत आहे. 

मुळात मानवाला सर्वाधिक गरज असते ती ‘ऐकले जाण्याची’. बालपणी आपल्या बोलण्याला आईकडून मिळणारा तो “हो गं/रे, सांग बरं” ह्या ऊबदार मायेच्या प्रतिसादाने डोक्यात कायमचं घर केलेलं असतं. मोठं झाल्यावर अशाच प्रतिसादाची अपेक्षा आपण आपल्या मित्रांपासून, प्रियकर-प्रेयसीकडून, जोडीदाराकडून ठेवतो. आणि तिथे जेव्हा आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातंय असं वाटू लागतं, तेव्हा आपण डिजिटल मित्रांकडे अर्थात यांत्रिक साधनांकडे धावत सुटतो. चॅटजीपीटीची जादू ही अशीच आहे. 

आता ही जादू नेमकी कशी चालते? 

असं म्हणतात की आपलं मन दोन गोष्टींनी चालतं, ओढ (drive) आणि नाती (relationships). चॅटजीपीटी ओढ भागवतो, म्हणजे प्रश्न विचारला, उत्तर मिळालं, झालं. पण नाती? नात्यांची ती उब, तो भावनिक स्पर्श? इथे मात्र हा चॅटजीपीटी अडखळतो. त्यात मनुष्याचं अवचेतन मन हे सतत “संबंधां”च्या शोधात असतं. कोणाशीतरी सतत जुळू पाहत असतं. त्यामुळे चॅटजीपीटी कितीही सराईत असला तरी, शेवटी ती एक संगणकीय प्रणाली आहे, डेटाबेस, अल्गोरिदम, आणि कोड. भावना, नातेसंबंध किंवा स्पर्शाशी त्याचा फारसा संबंध नाही.

एक मुलगी माझ्याकडे आली होती. म्हणाली, “मॅम, माझं मन लागत नाही म्हणून मी चॅटजीपीटीला विचारलं. त्याने छान पॉइंट्स दिले. पण.. का कोण जाणे, तरी रिकामं वाटतं.”

अगदी बरोबर. कारण उत्तरं मिळणं आणि मनाला आधार मिळणं ही दोन भिन्न प्रकरणं आहेत. मानसशास्त्र सांगतं की ‘सोबती’ आणि ‘प्रतिबिंब’ यात फार मोठा फरक असतो. चॅटजीपीटी म्हणजे खरंतर आपलंच एक प्रतिबिंब. तो आपलं ऐकतो, पण तो भावना अनुभवत नाही. त्यामुळे जेव्हा आपण त्याला सुख-दु:ख सांगतो, तेव्हा तो आपल्याच टाईप शब्दांची जुळवाजुळव करून उत्तरं तयार करतो. तो आपल्या भावनांचा रसास्वाद करत नाही. त्यामुळे अशावेळी तो मित्र कमी, आरसाच जास्त वाटतो. 

आणखी एक उदाहरण द्यायचं तर एका विद्यार्थ्याने चॅटजीपीटीवर “माझं मन का लागत नाही, मी खूप उदास आहे” म्हणून प्रश्नास सुरुवात केली, आणि अखेरीस त्याच बाॅटकडून त्याला चक्क “best ways to die” अशी धोकादायक माहिती मिळाली! त्यामुळे एका ठराविक मर्यादेपलीकडे आपली विवंचना एका बाॅटवर, एका यांत्रिक व्यवस्थितेवर सोपवणं किती भयंकर असू शकतं, हे स्पष्ट दिसतं. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातूनही बघितलं, तर हे चॅटजीपीटीवरचं वाढतं अवलंबित्व आपल्याला आजच्या बदलत्या जीवनशैलीतल्या एकाकीपणाचं प्रतिबिंब दाखवतं. फ्लॅट संस्कृती, अतिव्यस्त दिनचर्या आणि नात्यांचा अभाव यामुळे माणूस चॅटजीपीटी सारख्या सहज उपलब्ध सोबतीची साथ धरतो. पण हे जास्त काळ चाललं, तर ते योग्य नव्हे. 

आपली नाती, संवाद, वाद विवाद आणि अपूर्णतेतही एक पूर्णत्वाची भावना असणे हीच तर एका माणसाला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवतात. जर आपण ते सर्व टाळून फक्त एका कृत्रिम बुद्धिमत्तेशी बोलत राहिलो, तर आपण नकळत स्वतःभोवती एक भिंत उभी करतो. आणि त्या भिंतीच्या आतून खऱ्या आयुष्याचा गंधच गमावून बसतो. त्यामुळे, आपल्याला तंत्रज्ञानाची मदत घ्यायलाच हवी, पण मानसोपचारांच्या भाषेत याला ‘supportive tool’ म्हणतात, सहाय्यक साधन. सखा नव्हे.

अहो, शेवटी रक्तामांसाच्या माणसातली उब, त्याचा नजरेतला भाव, हातावर ठेवलेला सांत्वनाचा स्पर्श ही कुठलीच यंत्रणा देऊ शकत नाही. भावनांचा खरा उपचार हा जिवंत संवादात असतो. कारण एक माणूसच दुसऱ्या माणसाच्या वाक्यांमधली पोकळी ओळखतो, शांततेतली हळवी धडधड समजतो, आणि गरज पडली तर खांद्यावर हात ही ठेवतो. 

शेवटी..

“माणूस कितीही अपुरा असला तरी, रोबोटपेक्षा जास्त खरा असतो.”


मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४