राज्यातील देवस्थान समित्यांच्या निवडणुका पूर्ण

मयेत महाजनकीवरून वाद : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर स्थिती नियंत्रणात


14th March 2022, 12:46 am
राज्यातील देवस्थान समित्यांच्या निवडणुका पूर्ण

प्रतिनिधी। गोवन वार्ता

डिचोली : विविध मंदिरांच्या समित्यांची निवडणूक होऊन अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र मयेत श्री देवी महामाया देवस्थानच्या नवीन समितीच्या निवडीवेळी वाद झाल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. गावातील काही ग्रामस्थांनी निवडणुकीला आक्षेप घेतल्याने गावातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र मामलेदारांनी पोलिसांना बोलवत हे प्रकरण शांत केले. याशिवाय वेळूस रवळनाथ देवस्थानच्या निवडणुकीतही तणाव निर्माण झाला.

मये गावातील श्री देवी महामाया देवस्थानची नवीन समिती निवडीसाठी निवडणूक ठरविण्यात आली होती त्याप्रमाणे नेमून दिलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेला सकाळी सुरुवात केली. त्यावेळी गावातील नाईक, गोसावी, गावस या ग्रामस्थ गावकऱ्यांनी निवडणुकीत आम्हालाही सदस्यता हवी आहे. मात्र, डावलण्यात आल्याने  प्रक्रियेत हस्तक्षेप करून आम्हाला ही निवडणूक मान्य नसल्याचे सांगितले. 

नाईक, गावस, गोसावी या ग्रामस्थांच्या  मते ही निवडणूक देवस्थान समिती बेकायदेशीररीत्या घेत असल्याचा आरोप त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांकडे केला. आम्हालाही मतदान करण्याचा हक्क आहे आणि देवस्थान समिती तो हक्क आम्हाला बजावू देत नसल्याचे त्यांनी सांगितले. देवस्थान समितीने मागील निवडणुकीत ज्या महाजनांची नावे मतदानाला ग्राह्य धरलेली तिच नावे यावेळी देखील आहे आणि निवडणूक पूर्ण कायदेशीर असल्याचा दावा केला. 

वातावरण  तापू लागल्याने शेवटी मामलेदारांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर  पोलिसांना बोलविण्यात आले आणि डिचोलीचे मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर यांनी परिस्थिती अजून चिघळू नये यासाठी देवस्थान समितीची निवडणूक स्थगित करून निवडणूक पुढे ढकलली.