पेरीमेनोपॉज समजून घेऊया

पेरीमेनोपॉज म्हणजे काय? पेरीमेनोपॉजची लक्षणे कोणती असतात? उपाय योजना

Story: आरोग्य |
20th September, 12:02 am
पेरीमेनोपॉज समजून घेऊया

फिसमधून आल्या आल्या वेदाला आईचा ओरडा कानावर पडला.. “काय गं.. किती हिंडत असतेस! घरात वेळेवर यायला काय होतं?” ऐकून वेदा थोडीशी चपापली. आई एरवी कधी अशी बोलत नव्हती. “आई, अगं मी वेळेवरच आलेय. एवढं का रागावतेस?” आई थोड्या वेळाने शांत झाली आणि म्हणाली, “मला कळतच नाहीये... मधे मधे खूप थकल्यासारखे वाटते, रडू येते आणि मग उगाचच चिडचिड होते..”

वेदाच्या ध्यानात आले की, आई गेल्या काही महिन्यांपासून थोडी वेगळीच वागत होती. पाळी अनियमित होत होती, चिडचिड वाढली होती, रात्री झोपही नीट लागत नव्हती. तिने याबाबत थेट डॉक्टरशी बोलायचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी सांगितलं, “तुझ्या आईला पेरीमेनोपॉजचा टप्पा सुरू झाला असावा. ही रजोनिवृत्तीच्या आधीची नैसर्गिक अवस्था आहे, ज्यात काही शारीरिक आणि मानसिक बदल होतात. यादरम्यान योग्य आहार, व्यायाम आणि थोडे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.”

पेरीमेनोपॉज म्हणजे काय?

पेरीमेनोपॉज म्हणजे ‘मेनोपॉजपूर्व काळ’. हा एक नैसर्गिक टप्पा आहे जो स्त्रियांमध्ये मासिक पाळी कायमची थांबण्याच्या आधी काही वर्षांपासून सुरू होतो. यामध्ये शरीरात हार्मोन्समध्ये (विशेष करून इस्ट्रोजेनमध्ये) मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतात, ज्यामुळे अनेक शारीरिक व मानसिक लक्षणे दिसून येऊ शकतात.

पेरीमेनोपॉज कोणत्या वयात सुरू होतो?

साधारणपणे बहुतेक स्त्रियांमध्ये पेरीमेनोपॉज ४०व्या वर्षी सुरू होतो, पण काही जणींमध्ये तो ३०च्या उत्तरार्धात देखील सुरू होऊ शकतो. हा काळ काही महिन्यांपासून ते ४–१० वर्षांपर्यंत असू शकतो.

पेरीमेनोपॉजची लक्षणे कोणती असतात?

पेरीमेनोपॉजच्या काळात विविध लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे सौम्य ते तीव्र स्वरूपाची असू शकतात:

अनियमित पाळी: मासिक पाळी लवकर किंवा उशिरा येणे, रक्तस्राव जास्त किंवा कमी होणे, पाळी काही महिने थांबून पुन्हा होणे.

शरीरातील गर्मी वाढणे: अचानक गरम होणे, विशेष करून चेहरा, मानेवरील तापमान वाढणे, रात्री घाम येणे

झोपेच्या समस्या: निद्रानाश, झोप लागण्यास अडचण, मधेच झोपेतून जागे होणे

मानसिक चढ-उतार: चिडचिडेपणा, नैराश्य किंवा चिंता, भावनिक अस्थिरता

जननेंद्रियाशी संबंधित लक्षणे: योनी कोरडेपणा, लैंगिक इच्छा कमी होणे, लैंगिक संबंधादरम्यान वेदना. 

इतर लक्षणे: थकवा, केस गळणे, त्वचा कोरडी होणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, ब्रेन फोग. 

पेरीमेनोपॉजचा टप्पा का येतो?

हा एक नैसर्गिक प्रक्रियांचा भाग आहे. वय वाढल्यावर शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन या स्त्री-हार्मोन्सचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. हे हार्मोन्स अंडोत्सर्जन आणि पाळी नियंत्रित करतात. जेव्हा त्यात असंतुलन येते, तेव्हा पेरीमेनोपॉजची लक्षणे दिसू लागतात.

पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉज मधील फरक कसा ओळखावा?

पेरीमेनोपॉज पाळी बंद होण्याच्या आधीचा काळ असतो तर पाळी १२ महिने सलग न आल्यावर त्याला मेनोपॉज म्हटले जाऊ शकते. पेरीमेनोपॉज मधे हार्मोनल चढ उतार सुरू असतात तर मेनोपॉज हार्मोन्सचे स्थायिक प्रमाण असते. पेरीमेनोपॉज दरम्यान पाळी अनियमित असते तर मेनोपॉज टप्प्यात पाळी पूर्णपणे थांबलेली असते.

उपाय योजना जीवनशैलीतील बदल

नियमित व्यायाम : हार्मोनल संतुलन राखतो, झोप सुधारणे. 

संतुलित आहार : भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, धूम्रपान व मद्य टाळणे. 

योग व ध्यान : मानसिक स्थैर्यासाठी योग करणे. 

वैद्यकीय उपाय

हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी : इस्ट्रोजेनची कमतरता भरून काढणे. 

औषधे : झोपेच्या समस्या, डिप्रेशन, गरम होण्याची लक्षणे कमी करणे. 

सप्लिमेंट्स : कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, बी १२

नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाय

अश्वगंधा, शतावरी, मेथी यांसारखी औषधे काही महिलांना फायदेशीर वाटतात. पण यांचा वापर करताना वैद्यकीय सल्ला आवश्यक असतो.

पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉजनंतर हाडांची घनता कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी पूरक घ्या. 

वजनाचे व्यायाम करा. 

धूम्रपान आणि मद्यपान टाळा. 

डॉक्टरांकडे कधी जावे?

खूप जास्त रक्तस्राव, पाळी दोन आठवड्यांनी वारंवार येणे, तीव्र मानसिक अस्थिरता, 

रात्री सतत झोपेची अडचण, योनीभागातून विचित्र स्त्राव येणे या सारखी लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजच्या धकाधकीच्या जीवनात, या अवस्थेची योग्य माहिती आणि समज असणे गरजेचे आहे, जेणेकरून स्त्री स्वतःच्या शरीरातील या बदलांशी सकारात्मक पद्धतीने सामना करू शकेल. या टप्प्याबद्दल समजून घेतल्याने शारीरिक आणि 

मानसिक आरोग्याची योग्य काळजी घेणे शक्य होते.


- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर