भाकरीची गोष्ट

कॅलिडोस्कोप

Story: मनोहर जोशी |
01st November 2020, 01:34 pm
भाकरीची गोष्ट

बारामतीच्या डॉ. संजय सावंत यांची वरील शीर्षकाची एक गोष्ट वाचली. साध्या, सोप्या शब्दांतली, परंतु माणुसकीला स्पर्श करणारी ही गोष्ट मुळातच वाचायला हवी. कथेचा सारांश असा. लेखक आणि त्यांचे एक उद्योगपती मित्र गाडीने पुण्याला जात होते. पुण्याच्या बरंच अलीकडे वाहतूक कोंडी झाल्याने त्यांना गाडी थांबवावी लागली. गाडीत बसलेले असताना त्यांचे लक्ष सहज बाहेर गेले. रस्त्याच्या कडेला खडी फोडणाऱ्या एका कामगाराची तात्पुरती उभी केलेली झोपडी होती. बाहेर एका खाटेवर नवरा बसलेला होता तर झोपडीत त्याची बायको तीन दगडांच्या चुलीवर भाकऱ्या भाजत होती. तव्यावरच्या गरमागरम भाकरीचा दरवळ गाडीच्या खिडकीतून आत पोहोचला. लहानपणी केव्हातरी खाल्लेल्या ताज्या भाकरीच्या आठवणीने मित्र अस्वस्थ झाला. त्याच्याने राहवेना. गाडीतून उतरून तो झोपडीसमोर गेला आणि सगळा संकोच बाजूला ठेवून त्याने "मला या तव्यावरच्या ताज्या भाकरी खायची इच्छा झाली आहे. मला प्लrज विकत द्याल का?" असे विचारले. त्या कामगाराला प्रथम चेष्टा वाटली. पण, मित्राच्या स्वरातील सच्चेपणा जाणवून त्याने बायकोला खुणावले. बायकोने चुलीच्या शेजारी उभ्या करून ठेवलेल्या चार गरमागरम भाकऱ्या आणि त्यावर पाट्यावर वाटलेल्या मिरच्यांचा झणझणीत ठेचा ठेवला आणि मित्राच्या हातात दिला. मित्राने आनंदाने तो घेत खिशात हात घातला आणि पाचशेची नोट काढून तो देऊ लागला. त्याबरोबर तो कामगार म्हणाला, "आवो सायेब हे काय करता, भाकरी कधी कोण इकत का?" त्याची बायकोहो त्याला साथ देत म्हणाली, "सायेब  भाकरीचं  पैसं  घेतलं तर आमा दोघांना नरकात बी जागा मिळणार नाय." 

या संपूर्ण कथेत माझ्या मनात घर करून राहिलेली कोणती वाक्ये असतील तर ती ही दोन वाक्ये. स्वार्थाने बरबटलेल्या आणि पैशासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या आजच्या जगात वरील शेतकऱ्याचे उदाहरण हे भांगेत तुळस मिळावी तसे वाटले. संस्कृती, परंपरा याचे ढोल, ताशे पिटत फिरणाऱ्या तथाकथित संस्कृती रक्षकांपेक्षा किंवा अगोदर मानधन ठरवून भरल्या पोटावर प्रकृती, विकृती आणि संस्कृती यावर विद्वत्ताप्रचुर भाषण देऊन त्याचा अर्थ सांगणाऱ्या विद्वानांपेक्षा वरील जोडप्याच्या दोन वाक्यात संस्कृती उभी राहते. अन्न हे पूर्णब्रह्म, हे वचन त्याने ऐकले नसेल, पण या पूर्णब्रह्माचं मोल करायचं नसतं हे संस्कार त्यांच्यावर झाले होते. दारावर आलेल्या पांथस्थाला आपल्या ताटातली अर्धी भाकर काढून देण्याचे औदार्य त्यांच्याकडे होते. वास्तवात तो एक शेतकरी होता. गावाकडे दुष्काळ पडला म्हणून घराला टाळं ठोकून मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरण्याची त्याच्यावर वेळ आली होती. काम मिळाले तर दोन वेळची भाकरी मिळणार, नाहीतर त्याच्यासाठी जल हेच पूर्णब्रह्म. पण, असं असूनही त्याने मिळणारे पाचशे रुपये नाकारले. कारण तो हाडाचा शेतकरी होता, अन्नदाता होता. आणि दाता कधी घेत नसतो तो फक्त देत असतो.                 

मला गंमत वाटली ती त्या मित्राची. एका मोठ्या कंपनीचा मालक. खिशातून रुमाल काढला तरी लाखभर रुपये पडतील, अशी सांपत्तिक स्थिती. प्रशस्त बंगला. एअर कंडिशन्ड बेडरूम्स. ओव्हन, मिक्सर, ज्युसर या सारख्या आधुनिक उपकरणांनी सुसज्ज किचन. चायनीज, इटालियन, थाय या सारख्या पदार्थांची रेलचेल. त्याच्या एका स्टार्टरच्या किमतीत त्या शेतकरी कुटुंबाचे एक वेळचे जेवण व्हावे. असे असतानाही कधीकाळी खाल्लेल्या  भाकरीच्या वासाने तो अस्वस्थ का व्हावा? कदाचित चटणी, भाकरी त्याचे नोकर सुद्धा खात नसतील. मग त्याला त्या भाकरीचे एवढे अप्रूप का वाटावे? याचे कारण आपला अंतरात्मा. आधुनिक असल्याचा आपण बाहेरून कितीही आव आणला तरी ज्या जमिनीत आपली नाळ पुरली आहे, ती कधीतरी असा साद घालते. पिढ्यानपिढ्यांचे गुणसूत्रातून आलेले संस्कार पुसू म्हटल्या पुसता येत नाहीत. त्यामुळे कितीही श्रीमंत झाला तरी बूट घालून देवघरात जाणार नाही. (अशी अपेक्षा) तुळशी वृंदावन दिसले की नकळत मांगल्याची, पावित्र्याची भावना निर्माण होते. टाळ- मृदंगाच्या नादावर शरीरातला अणुरेणू ताल धरतो. भाकरी म्हणजे भूमातेने दिलेल्या दानाचे कोणतीही भेसळ न करता केलेले शुद्ध स्वरूप. मातेच्या दुधासारखे. तितकेच सात्विक, तितकेच पौष्टिक. आणि म्हणून हवेहवेसे वाटणारे.  

माणूस कितीही मोठा झाला, श्रीमंत झाला, आधुनिकतेची कितीही पुटे चढवली तरी अंतरात दडलेले निरागस बालपण कधीतरी उसळी मारून वर येते. मग आईच्या मांडीवर डोकं टेकावंसं वाटतं. आजीने शिवलेल्या गोधडीची उब आठवते. कोकणातलं कौलारू घर, त्यापुढे सारवलेलं अंगण, तुळशीवृंदावन, आंब्या फणसाची झाडं डोळ्यांसमोर येतात. त्यांची चव जिभेवर रेंगाळते. धुवांधार पावसात ओटीवर बसून घेतलेले गरम गरम चहाचे घुटके आठवतात. रात्रीच्या निरव शांततेतला रातकिड्यांचा किर्रर्र आवाज कानात घुमतो. श्रावणात फुललेल्या जाईचा सुगंध नाकाभोवती रुंजी घालतो. चतुर्थीत केलेली धमाल आठवते. देशावर घर असेल तर गावाबाहेरचं शिवार, त्यात डोलणारी पिकं डोळ्यांसमोर उभी राहतात. ताजी लुसलुशीत कणसं भाजून, हातावर चुरडून आणि त्यावर तिखट मीठ घालून खाल्लेल्या हुरड्याची चव जिभेला पाणी आणते. गुऱ्हाळाच्या हंगामात प्रत्यक्ष गुऱ्हाळावर जाऊन घेतलेला उसाचा रस, ताज्या काकवीसोबत खाल्लेली भाकरी याची चव विसरू म्हटल्या विसरता येत नाही.

आजच्या शिक्षणाच्या आणि सुधारणांच्या चुकीच्या संकल्पनांपायी आपण आपली संस्कृती आणि परंपरा विसरत चाललो आहोत. नव्हे त्या टिकवणे म्हणजे मागासलेपणाचे समजतो. शिक्षणातून आणि घरातून मूल्ये आणि संस्कार रुजवले जावेत, ही अपेक्षा आहे. पण, नेमकं तेच हरवत चाललंय. कालानुरूप राहणीमानाच्या, कपड्याच्या पद्धती बदलणे हे स्वाभाविक आहे. पण, कपडे बदलले तरी माणसानं बदलायला हवं असं नाही. आणि त्याने बदलण्याचा कितीही आव आणला तरी मेकअप उतरवल्यावर खरा चेहरा समोर येतो तसे बर्गर, पिझ्झाच्या खाली दडपून ठेवलेल्या जुन्या जाणिवा कधी कधी जागृत होतात आणि मग तीन दगडाच्या चुलीवर भाजलेली भाकरी खाण्याची इच्छा होते. 

(लेखक शिक्षक, साहित्यिक आहेत.)