माशेल, जुने गोवेत पाणी पुरवठ्याला विलंब

३-४ दिवस कळ सोसण्याची विनंती; पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न : पाऊस्कर


22nd August 2019, 06:43 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                              

पणजी : कुर्टी येथील ९०० एमएम व्यासाची जलवाहिनी पूर्ववत झाल्याने पणजीसह तिसवाडी तालुक्यातील पाणी पुरवठा शुक्रवारपर्यंत सुरळीत होईल. दुसरी ७५० एमएम व्यासाची जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागणार आहेत. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करून तिवरें, बाणस्तरी, हडकोण, माशेल, बेतकी, खांडोळे, कुंभारजुवे, जुने गोवे, खोर्ली आदी भागांतील लोकांची सोय करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊस्कर यांनी दिले.                               

फोंडा-कुर्टी येथे घडलेली घटना ही नैसर्गिक आपत्तीत मोडत असली तरी, काही प्रमाणांत अभियंत्यांची बेफिकीरी याला कारणीभूत आहे. सध्या ९०० एमएम जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. पाणी सोडण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. हे पाणी पोहचण्यास ८ ते १० तास लागतात. त्यानंतर हे पाणी पणजीतील मुख्य टाकीत भरण्यासाठी आणखी ३ ते ४ तास लागणार आहेत. गुरुवारी पहाटेपर्यंत पणजीतील लोकांना पाणी पुरवठा होईल, असा विश्वास वाटतो, असेही मंत्री पाऊस्कर म्हणाले. या घटनेतून बोध घेऊन दिवाळीनंतर अन्य पर्यायाची व्यवस्था करण्याचे सरकारने ठरवले आहे. यापुढे अशी परिस्थिती उद्भवू नये, याची काळजी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

जलवाहिनीची दुरुस्ती होईपर्यंत टँकरद्वारे पाणी

केवळ पणजीसह तिसवाडी नव्हे तर फोंडा तालुक्यातील काही भागांतील पाणी पुरवठा बंद झाला आहे. याठिकाणी ७५० एमएम जलवाहिनीचे दुरुस्ती काम लवकरच हाती घेतले जाईल. यासाठी अतिरिक्त ३ ते ४ दिवस लागणार आहेत. तिवरे, बाणस्तारी, हडकोण, माशेल, बेतकी, खांडोळे, कुंभारजुवे, जुने गोवे, खोर्ली आदी भागातील लोकांना आणखी काही दिवस कळ सोसावी लागेल. दरम्यान, या जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरूच राहील, तसेच ही जलवाहिनी जोडता येऊ शकते काय, याचाही अभ्यास सुरू आहे, असेही मंत्री पाऊस्कर म्हणाले.

‘साबांखा’ मंत्र्यांनी मागीतली माफी

जलवाहिनी फुटून पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्यातील काही भागांतील लोकांना बरेच कष्ट घ्यावे लागल्यामुळे बांधकाममंत्री दीपक पाऊस्कर यांनी सर्वांची माफी मागितली आहे. नियमित पाणी पुरवठा करणे ही सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. सरकार पाणी पुरवठ्यासाठी लोकांकडून शुल्क आकारते. त्यामुळे विनाखंडीत पाणी पुरवठा होणे हा लोकांचा हक्क आहे. यापुढे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.