इंचांच्या शंभरीकडे पावसाची दमदार वाटचाल

राज्यात पुन्हा मुसळधार; आज, उद्या वाढ होण्याचा अंदाज


04th August 2020, 12:43 am
इंचांच्या शंभरीकडे पावसाची दमदार वाटचाल

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील पावसाने इंचांच्या शंभरीकडे दमदार वाटचाल सुरू केली आहे. सोमवारी सकाळी ८.३० पर्यंत ९३.५९ इंच पाऊस पडला होता. सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरूच होता. शिवाय आगामी दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज कायम आहे. त्यामुळे दोन दिवसांत पाऊस इंचांचे शतक पूर्ण करण्याची शक्यता आहे.
राज्य हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ ऑगस्टपासून पावसात वाढ झाली आहे. गेले दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होता; पण सोमवारी सकाळपासूनच वादळासोबत मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत पणजीत ११, मुरगावात २०, म्हापशात १७, तर पेडणेत १० मिमी पावसाची नोंद झाली. इतर ठिकाणीही वादळी पाऊस कायम राहिला. त्यामुळे काही ठिकाणी पडझडीच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या. पणजीसह इतर शहरांतील अंतर्गत रस्त्यांवर पुन्हा एकदा पाणी साचले. त्याचा स्थानिक आणि वाहन चालकांना काही प्रमाणात फटकाही सहन करावा लागला.
राज्यातील मच्छीमारीचा हंगाम सुरू झाला आहे. पण अरबी समुद्रात ताशी ५० ते ६० कि.मी. वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे मच्छीमारांनी पुढील चार दिवस मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
...................................
बॉक्स
आतापर्यंतचा पाऊस (इंचांत)
म्हापसा : ८१.५३
पेडणे : १०६.६५
फोंडा : ९६.३०
पणजी : ९६.५१
जुने गोवे : १०४.५७
साखळी : ९९.१६
वाळपई : ८७.९६
काणकोण : १०४.४५
दाबोळी : ८७.१७
मडगाव : ७७.७७
मुरगाव : ८९.६८
केपे : ९३.६२
सांगे : ८७.४२