आणखी चार बळींसह २८६ बाधित

२०८ जणांची करोनावर मात; सक्रिय संख्या १,८८४


04th August 2020, 02:44 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात सोमवारी करोनाने आणखी चौघांचा बळी घेतला. त्यामुळे मृत्यूंची संख्या ५७ झाली आहे. शिवाय नवे २८६ बाधित आढळले असून, २०८ जणांनी करोनावर मातही केली आहे. त्यामुळे सक्रिय बाधितांचा आकडा १,८८४ झाला आहे.
राज्यात करोनाबाधितांसह मृत्यूंच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत असल्याने गोमंतकीयांत भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोमवारी मेरशी येथील ७२ वर्षीय पुरुष व सांगे येथील ७० वर्षीय महिलेचा मडगाव येथील कोविड इस्पितळात, तर वास्को येथील ६८ वर्षीय महिलेचा गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आझिलो इस्पितळात एका तरुणाचा दुपारी मृत्यू झाला. सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मेरशी आणि वास्को येथील मृत व्यक्तींना इतर आजार होते, असे आरोग्य खात्याने दिलेल्या दैनंदिन अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांचा आकडा ६,८१६ झाला आहे. तर ४,८७६ जण करोनावर यशस्वी मात करून घरी गेले आहेत. अजून ९८३ जणांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याने पुढील दोन दिवसांत बाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.