अयोध्येतील रेल्वे स्टेशनला चढणार मंदिराचा साज

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची माहिती : पुनर्विकासासाठी १०४ कोटींचा खर्च अपेक्षित


04th August 2020, 12:45 am
अयोध्येतील रेल्वे स्टेशनला चढणार मंदिराचा साज

अयोध्या : राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा उद्यावर येऊन ठेपला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मंदिर उभारणीला सुरुवात होईल. दरम्यान, भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणं नव्या रूपात-ढंगात सजली जात आहेत. यात आता आणखी एका ठिकाणाची भर पडणार आहे, ती म्हणजे रेल्वे स्टेशनची. आता अयोध्येच्या रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या रूपात या रेल्वे स्टेशनची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने निधीमध्येही भरघोस वाढही केली आहे.प्रत्यक्ष राम मंदिर तयार होण्यापूर्वीच पुढील दोन वर्षांत अयोध्यावासीयांना मंदिराच्या प्रतिकृती स्वरूपात रेल्वे स्टेशन मिळणार आहे. या स्टेशनच्या पुनर्विकासासाठी रेल्वेने बजेटमध्ये वाढ केली असून ८० कोटींवरून ती १०४ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. सध्याच्या अयोध्या स्टेशनची रचना हीदेखील मंदिराप्रमाणेच आहे. काही वर्षांपूर्वीच त्याच्या पुनर्विकासाचा निर्णय झाला होता.
यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी ट्विट केले होते. यात त्यांनी म्हटले आहे, ‘करोडो लोक राम मंदिराला भेट देण्यासाठी येतील. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्या स्टेशनचा पुनर्विकास करण्याचे ठरवले आहे.”
___
बॉक्स
असे असेल नवे स्टेशन
रेल्वे स्थानकाचे नवे डिझाईन नव्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर असणार आहे.
यामध्ये प्रवाशांच्या सोयीसुविधांबरोबरच गर्दी हाताळण्यासाठी क्षमताही वाढवण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात स्टेशनमधील प्लॅटफॉर्मचा भाग विकसित केला जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात स्टेशनच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू होईल. यामध्ये अनेक शौचालये, निवासी खोल्या, तिकीट खिडक्या आणि मोकळी जागा असणार आहे.