देवरूपी माया – नारबंधो

मातेच्या दुःखी अंतःकरणातून निघालेल्या शापवाणीने साऱ्या गावाची दुर्दशा झाली.जमीनी ओसाड पडल्या. अन्न पाण्याविना लोकांचे हाल होऊ लागले. गाव सोडून जाण्यावाचून लोकांकडे दुसरा पर्याय राहिला नाही. सुखसोयींनी समृद्ध असलेला ‘बेतकी’ गाव एकाएकी ओसाड पडला.

Story: पिरोज नाईक |
04th July 2021, 12:35 am
देवरूपी माया – नारबंधो

अंत्रुज महालातील बेतकी हा निसर्ग संपन्न गाव. गावाच्या पूर्वेला मांडवी नदी. सभोवताली डोंगरांचे उंच कडे. गावाच्या मध्यभागी झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यांनी युक्त असलेले विशाल तळे. या पाण्यावरच गावात भातशेती व बागायतीचे पीक घेतले जात होते. त्यामुळे गाव समृद्ध होता. गावात कशाचीही कमतरता नव्हती. पण त्यावर्षी पावसाची अतिवृष्टी झाली आणि पाणी अडवण्यासाठी तळ्याला घातलेला बांध फुटला. अनेक वेळा प्रयत्न करूनसुद्धा बांध बुजेना. शेतकऱ्यांचा आधार असलेल्या तळ्यातील सारे पाणी वाहून जाऊ लागले . त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे, तर उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे पिकाची नासाडी होऊ लागली. तांत्रिक उपाय यशस्वी होत नसल्याचे पाहून गावातील लोकांनी मांत्रिकाकडे धाव घेतली. बांध टिकून रहायचा असेल तर या ठिकाणी कुमार व कुमारिकेचा बळी द्यावा लागेल. हे ऐकून सारा गाव भयभीत झाला. कोणी महाभाग एखाद्याची फसवणूक करून हे कुकर्म करेल या भीतीने प्रत्येकजण आपआपल्या मुलांना डोळ्यात तेल घालून जपू लागला. कारण गावाचे रक्षण करणाऱ्यांच्या मनाने दुर्बलाचे भक्षण करण्याचे योजले होते. ते बळीच्या शोधात होते.

तळ्याच्या काठावर एक विधवा ब्राह्मण स्त्री रहात होती. ऐन तारुण्यात पतीचे निधन झाल्याने संसाराचा गाडा तिला एकटीलाच ओढावा लागत होता. माया व नारायण या दोन मुलांकडे पाहून ती दिवस घालवत होती. माया नावाप्रमाणेच प्रेमळ, समजूतदार व शांत स्वभावाची होती. नारायण तर तिचा जीव की प्राण. लाडाने ती त्याला ‘नारबंधो’ म्हणायची. कामानिमित्त बाहेर पडलेली ब्राह्मणी घरी येईपर्यंत संध्याकाळ होत असे. तोपर्यंत भावाची देखभाल करण्याचे काम मायाच करीत असे. दिवसभर ती दोघेही तळ्याच्या काठावर खेळत असत. संध्याकाळी आई घरी आली की, तिच्या कुशीत शिरुन दिवसभरातील गमतीजमती तिला ऐकवित असत. ब्राह्मणी कामावर गेल्यानंतर ही मुले तळ्याच्या काठावर एकटीच खेळत असतात हे गावकऱ्यांना माहीतच होते. त्यातील कुकर्मी लोकांचे लक्ष या भावंडावर जाऊन स्थिरावले. काहीतरी कुभांड रचून याच मुलांचा बळी द्यायचा, असा मनाशी पक्का विचार करून ते अचूक संधीची वाट पाहू लागले.

दुपारची वेळ होती. सगळीकडे सामसूम होते. नेहमीप्रमाणे दोन्ही भावंडे तळ्याकाठावर उभी होती. इतक्यात त्यांचे लक्ष पाण्यावर तरंगत असलेल्या पिवळ्या धमक केळ्यांच्या घडाकडे गेले. ती पिकलेली केळी पाहून नारबंधोच्या तोंडाला पाणी सुटले. तो पटकन पाण्यात उतरला. अगदीच हाताशी असलेल्या घडाला त्याने हात घातला. हात घालताच केळी झटक्यात दूर गेली. ते पहाताच नारायण आणखी पुढे गेला. पुन्हाही तसेच घडले. घडाला बांधलेली दोरी हातात घेऊन कोणीतरी तळ्याच्या काठावरच्या झुडपामध्ये लपून बसलेला असून, तोच हा केळीचा घड पुढेपुढे नेत असल्याचे मायाच्या लक्षात येताच ती जीवाच्या आकांताने ओरडली ‘नारबंधो, पाणी खोल आहे पुढे जाऊ नकोस.’ पण तिची हाक कानावर पाहोचण्यापूर्वीच सारा खेळ संपला होता. तिच्या बंधोने एव्हाना एक दोन गटांगळ्या ही खाल्ल्या होत्या. घडलेला सारा प्रकार तिच्या ध्यानात आला. गावकऱ्यांनी गावाच्या भल्यासाठी आपली व आपल्या पाठच्या भावाची निवड केलेली आहे. आमच्या जाण्याने गावाचे भले होत असेल तर आपले जीवन सार्थकी लागेल असा विचार मनात येताच, ‘नारबंधो, थांब. एकटा जाऊ नकोस, मी ही येते तुझ्याबरोबर.” असे म्हणत तिनेसुद्धा पाण्यात उडी घेतली. दोघांचाही बळी घेण्यासाठी टपून बसलेल्या गावकऱ्यांची युक्ती सफल झाली होती.

संध्याकाळी ब्राह्मणी घरी आली. आई दिसताच क्षणी कुशीत विसावणारी दोन्ही मुलं न दिसल्याने ती एकदम घाबरी -  घुबरी झाली. तिने त्यांना हाका मारल्या. वाड्यावर जाऊन चौकशी केली; पण कोणीच काही बोलत नव्हते. कोणीच कसे बोलत नाही, कुणालाच कशी दिसली नाही? अंधार पडू लागला तरीही मुलांचा काहीच ठावठिकाणा नसल्याचे पाहून आता मात्र नक्कीच कुठेतरी घातपात झाला असावा असा संशय तिच्या मनात घर करू लागला. तरीही मुलं येतील या आशेने सारी रात्र तिने जागून काढली. दुसरा दिवस उजाडला. दुपार झाली आणि दोन्ही मुलं पाण्यावर तरंगत असल्याची बातमी तिच्या कानावर येऊन थडकली. ग्रामस्थांनी मान खाली घालून सगळे विधी पार पाडले. जे घडले तो एक अपघात होता असे भासवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. सत्य कधी लपून रहाते का? घातपातच केला असल्याची वार्ता कोणी तरी तिच्या कानावर घातली. रडून रडून आता तिच्या डोळ्यातील पाणी देखील सुकून गेले होते. अंतःकरणातील भावना नष्ट झाल्या होत्या. क्रोध अनावर होऊन ‘ या गावात चोवीस वर्षे अन्न शिजणार नाही’ असा शाप देऊन त्याच क्षणी ती गाव सोडून निघून गेली. मातेच्या दुःखी अंतःकरणातून निघालेल्या शापवाणीने साऱ्या गावाची दुर्दशा झाली.जमीनी ओसाड पडल्या. अन्न-पाण्याविना लोकांचे हाल होऊ लागले. गाव सोडून जाण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही. सुखसोयींनी समृद्ध असलेला ‘बेतकी’ गाव एकाएकी ओसाड पडला.