एअर चीफ मार्शल हृषीकेश मुळगावकर

कलाकार

Story: इजिदोर डांटस |
01st November 2020, 01:34 pm
एअर चीफ मार्शल हृषीकेश मुळगावकर

भारतीय हवाई दळाचे प्रमुख हृषीकेश मुळगावकर हे मूळ गोमंतकीय. त्यांचा जन्म  १४ ऑगस्ट १९२० रोजी मुंबईत झाला. त्यांचे घराणे मुळगाव- डिचोली येथील. त्यांना अरविंद या नावानेही ओळखले जायचे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शंकरी. त्यांच्या मुलाचे नाव प्रकाश आणि मुलीचे नाव ज्योती. प्रकाश हे अस्थिरोगतज्ज्ञ, सर्जन आहेत. ते इंग्लंडला असतात. मुलगी ज्योती राय मुद्राशास्त्री व दागिने डिझाइनर आहेत. १९६५ साली हृषीकेश व शंकरी यांचा घटस्फोट होताच, त्यांनी तारा वेणुगोपाल यांच्याशी लग्न केले.

हृषीकेश वडील डाॅ. एस. मुळगावकर हे लोकप्रिय सर्जन होते. त्यांचे मुंबईत कंबाला हिल विभागात स्वत:चे इस्पितळ होते. हृषीकेश यांचे भाऊ सुमंत टेल्को कंपनीचे अध्यक्ष, दुसरे बंधू एस. मुळगावकर इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य संपादक होते, सुमंत यांच्या पत्नी लीला या मुंबईच्या शेरिफ होत्या.

मुळगावकर यांचे शिक्षण द मेलबर्न कॉलेज, लंडन व सेंट झेवियर महाविद्यालय, मुंबई येथे झाले. शिक्षण सुरू असतानाच डिसेंबर १९४० मध्ये रॉयल इंडियन एअर फोर्ससाठी विमानचालक म्हणून त्यांची निवड झाली. त्याच सुमारास संरक्षण सेवा महाविद्यालय, वेलिंग्टन (तमिळनाडू) येथून ते पदवीधर बनले, तसेच लढाऊ विमानचालक प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी प्राविण्य प्राप्त केले. दुसऱ्या महायुद्धकाळात व १९४४-४५ च्या सुमारास मुळगावकर यांनी ब्रह्मदेश आघाडीवर हरिकेन विमानचालक व स्पिटफायर लढाऊ विमानचालक म्हणून काम केले होते.

भारत-पाकिस्तान संघर्षाच्या वेळी (१९४८-४९) काश्मीर खोऱ्यातील युद्धप्रसंगी विमान हल्ले, वाहतूक व निरीक्षण इत्यादी कामे त्यांच्याच नियंत्रणाखाली चालत असत. त्या वेळच्या कार्याबद्दल त्यांना महावीरचक्र प्रदान करण्यात आले होते. जगातील पन्नासापेक्षाही जास्त जातींची लढाऊ विमाने त्यांनी चालवली आहेत. वेगाने लढाऊ विमाने चालविणारे ते  पहिले भारतीय विमानचालक होत.  १९६८-१९७१ सालापर्यंत ते हवाई दलाचे मुखेली होते. त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकही मिळाले होते.

स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या फ्लाइपास्टचे नेतृत्व त्यांनी केले आहे. त्यांनी हवाई दलात अनेक बदल घडवले. ते आजही पाळले जातात.  १९५९ ते १९६२ पर्यंत लंडनमधील भारतीय उच्चायुक्तात ते सल्लागार होते. १९७१ मध्ये ते नॅशनल डिफेन्स कॉलेजीचे कमांडंट आशिल्ले. त्यांनी शांतता आणि युद्धाच्या काळात एकूण साडेचार हजार तासांचे उड्डाण केले होते. अपघात उगाच होत नाहीत, तर ते केले जातात, असे ते म्हणायचे. १९७८ मध्ये सप्टेंबरात ते ३८ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. पुणे येथे ते स्थायिक झाले होते. योगासन, पोहणे व कुत्र्यांची त्यांना प्रचंड आवड होती. बजाज टेंपो, अवंती मायनिंग टुल्स अँण्ड मशिन्सच्या संचालक मंडळावर ते होते. 

‘लिडिंग फ्रॉम द कॉकपिट : अ फायटर पायलट्स स्टोरी’ हे त्यांचे चरित्र २००९ साली त्यांच्या मुलीने ज्योती एम. राय यांनी लिहिले आहे. यात त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती मिळते. या पुस्तकाची प्रत मुळगांवकर यांच्या सहीनिशी माझ्याकडे आहे. ही अविस्मरणीय भेट असे मी मानतो. ९ एप्रिल २०१५ रोजी त्यांचे निधन झाले. 

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)