शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपविरोधकांची बैठक

देशातील स्थितीबाबत चिंता : १५ पक्ष एकत्र; काँग्रेस दूरच


22nd June 2021, 11:58 pm
शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपविरोधकांची बैठक

 फोटो : राष्ट्रमंचच्या बैठकीत बोलताना यशवंत सिन्हा. सोबत शरद पवार व अन्य नेते.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षे असली तरी भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना संघटित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीला १५ पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेसने मात्र या बैठकीपासून दूर रहाणेच पसंत केले. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते मजिद मेमन यांनी काँग्रेसही आमच्यासोबत असल्याचा दावा केला.
पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन म्हणाले, जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. ही बैठक शरद पवारांच्या घरी झाली असली तरी ती शरद पवार यांनी बोलावली नव्हती. राष्ट्रमंचचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी ही बैठक बोलावली होती. राष्ट्रमंचच्या सदस्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. देशातील राजकीय, आर्थिक व सामाजिक वातावरणात सुधारणा करण्यासाठी राष्ट्रमंचाची काय भूमिका असेल, यावर सर्वांचे मत घेण्यात आले. बैठकीत काही अराजकीय व्यक्तीदेखील सहभागी झाल्या होत्या. जावेद अख्तर, न्यायमूर्ती ए.पी. शहा यांनीही आपले मत मांडले. हा राजकीय कार्यक्रम नव्हता.
काँग्रेसला वेगळे पाडण्यासाठी आघाडीची चर्चा चुकीची
माजिद मेमन पुढे म्हणाले, अशा चर्चा सुरू आहेत की, शरद पवारांच्या माध्यमातून मोठे राजकीय पाऊल उचलले जात आहे. यामध्ये काँग्रेसला वेगळे पाडण्यात आले आहे. मात्र ही माहिती चुकीची आहे. राजकीयदृष्ट्या अशी कोणतीही मोठी घडामोड झालेली नाही. आम्ही त्या सदस्यांना बोलावले होते, जे राष्ट्रमंचच्या विचारसरणीशी सहमत आहेत. काँग्रेसच्या सदस्यांना मी स्वतः निमंत्रण दिले होते. यामध्ये मनीष तिवारी, कपिल सिब्बल, डॉ. अभिषेक मनुसिंघवी, शत्रुघ्न सिंन्हा यांचा समावेश आहे. काहीजणांची खरोखरच अडचण होती. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु त्यांनी आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसला वेगळे पाडण्यासाठी मोठी आघाडी तयार होत आहे, अशा चर्चा पूर्णपणे चुकीच्या आहेत.

हेही वाचा