नवा भारत घडविण्याची युवा पिढीत क्षमता

प्रत्येक युवकामध्ये ध्येय गाठण्याची ऊर्जा असतेच, कष्ट करण्याची ऊर्मी असते आणि जबाबदारी पेलण्याचे धाडसही असते; पण काही तरुण मंडळी आपल्या जबाबदाऱ्या डावलून पुढे चालले आहेत, ही मोठी शोकांतिका आहे.

Story: विचारचक्र | प्रा.राजेश कळंगुटकर |
21st June 2021, 07:33 pm

आधुनिक भारत घडवण्याच्या कामात युवकांचा लक्षणीय सहभाग असेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात" या कार्यक्रमात व्यक्त केले,  कारण भारत देश युवकांचा देश आहे म्हणजेच भारताची अर्ध्यावर लोकसंख्या तरुण आहे. येणारे युग युवकांचे असेल कारण नव्या पिढीजवळ देशाला उंचीवर नेण्यासाठी लागणारी ऊर्जा, उर्मी आणि धाडस आहे. युवाशक्तीमध्ये जग जिंकण्याची ताकद असते पण युवक कुणाला म्हणावं हा मुळचा कळीचा मुद्दा आहे. काही युवक आपण  तरुण आहोत असं भासवताना,  पण युवकांप्रमाणे कष्ट करायची तयारी नसते, धाडस दाखवायला बघत नाहीत, ध्येयापर्यंत पोचण्याची उर्मी नसते. फक्त भूतकाळातील आठवणीत रमू पाहतात. अशा तरुणांनी समजावं की आपण कुठल्या टप्प्यावर  आहोत आणि आयुष्यात आपण कोणतीही उंची गाठू शकत नाही. पण काही युवकांमध्ये आशा आणि दिशा असते म्हणजेच त्यांच्यात ध्येय गाठण्याचे धाडस असते.  असा युवक भविष्यात आपली उंची वाढवण्याचे काम करतो. आजच्या युवकांची स्वतःची मते आहेत. अस्थिरता , जातियवाद, लिंग भेद किंवा इतर कुठलेही भेदभाव असो, या सर्व गोष्टीविषयी जाब विचारण्याची त्यांची कुवत असते. असा हा आजचा  युवक खऱ्या अर्थाने नव्या भारताच्या नव्या ववस्थेचे प्रतीक आहे.

आजचा युवक तसं बघायला गेलो तर अत्यंत बुद्धिमान,  कुशल आणि काही तरी नवीन करण्याची स्वप्ने बाळगून आहे. पण काही तरुण आपण समंजस  आहोत, शहाणे आहोत, हुशार आहोत, धाडसी  आहोत, आपल्यात ध्येय गाठण्याची क्षमता आहे हे इतरांना कळू न  देणे म्हणजेच  बुद्धिमान असणं असं समजतात . आपण बुद्धिमान आहोत हे दुसऱ्याला कळलं तर आपल्यावर कामगिरी सोपवली जाऊ शकते, आपल्यावर जबाबदारी येऊ शकते म्हणून आपण बुद्धिमान आहोत हे माहीत असून सुद्धा आपल्याला काहीच कळत नाही असं भासवण्याच  काम कित्येक युवक-युवती करीत असतात. म्हणून आजचा युवक कित्येक चांगल्या गोष्टी पासून दूर राहतो. त्यांना बऱ्याच वेळा संधी मिळून सुद्धा संधीपासून दूर राहावं लागतं कारण जबाबदारी घ्यायची , नवीन गोष्टी शिकायची त्यांची तयारी नसते . अशा मानसिकतेमुळे काही युवक  आपल्या आयुष्यात मागे खेचले जातात. मिळालेल्या संधीच सोनं करणं उचित समजत नाही, अशानं त्यांच्यातील देशभक्ती आणि देशप्रेम विकसित होतं नाही किंबहुना ते खुंटत. जास्त गोष्टी माहीत असल्या तर जास्त जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील असा समज काही युवकांचा झालेला आहे म्हणून ते आयुष्यात उंची गाठू शकत नाही. 

प्रत्येक युवकांमध्ये  ध्येय गाठण्याची ऊर्जा असतेच, कष्ट करण्याची ऊर्मी असते आणि जबाबदारी पेलण्याचं धाडसही  असतं पण काही तरुण मंडळी आपल्या जबाबदाऱ्या डावलून पुढे चालले आहेत ही मोठी शोकांतिका आहे. कारण आजच्या आपल्या युवकांमध्ये नकारात्मक कारणं देण्याची परंपरा आहे,  जबाबदाऱ्या टाळण्याची परंपरा आहे मग ताकद आणि क्षमता असून सुद्धा त्यांचा सद्उपयोग होत नाही. शिवाजी महाराजांजवळ काय होत? साधनं नव्हती, संपत्ती नव्हती पण ध्येयाच्या जोरावर महाराजांनी स्वराज्य उभं केलं. मग आजच्या युवापिढीचं काय झालय?  त्यांच्याजवळ ध्येय का नाहीत ? कठीण परिश्रम करण्याची तयारी का नाही?  संयम ही यशाची गुरुकिल्ली आहे हे माहीत असून सुद्धा त्यांच्याजवळ संयम का नाही? तांत्रिक प्रगतीमुळे आजची पिढी खूप वेगवान झाली आहे. जगात जे काही चांगले आहे ते आपल्यापर्यंत कमीच कमी वेळेत पोहोचलं पाहिजे असा समज  आजच्या युवापिडीचा झाला आहे. 

आजच्या युवापीढीत आत्महत्या करण्याचं प्रमाण खूप वाढू लागलं आहे कारण प्रत्येक युवकांमध्ये संयम असतोच अस नाही. परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी नाही,  परिस्थितीशी लढण्याची तयारी नाही. आत्महत्या करणारी मुलं जास्त करून अशा कुटुंबातील असतात ज्यांना न मागता सगळं त्यांच्यापर्यंत पोचतं आणि त्यांच्या शब्दकोशात " नाही " हा शब्द वागळण्यात आलेला असतो .अशा युवकांना दुःख, कष्ट माहीत नसतं आणि दुःखाची लहानशी झुळूक जरी  त्यांच्या आयुष्यात आली तर  त्यांना सोसवत नाही आणि हीच मुलं परिस्थितीवर रडतात आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. शांत समुद्र कधीही चांगला खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र खवळलेलाच  असला पाहिजे,  लाटावर लाटा उसळल्याच पाहिजेत तेव्हाच एक चांगला खलाशी तयार होऊ शकतो. माणसाच्या आयुष्यात चडउतार, सुख -दुःखाचे  आणि वाईट प्रसंग असायलाच पाहिजे तेव्हाच एक मजबूत व्यक्ती तयार होतो आणि जीवनाला अर्थ येतो . याउलट गरीब कुटुंबातली बहुतेक मुलं आपल्याला आत्महत्या करताना दिसत नाहीत कारण त्यांना वाईट परिस्थितीशी सामना करण्याची , कष्ट करण्याची आणि कुठल्याही परिस्थितीत आयुष्य जगण्याची सवय जडलेली असते. परिस्थितीमुळे कुणाचे भविष्य घडत नाही आणि   बिघडतही नाही, तेव्हा परिस्थितीला दोष देण्यात काहीही अर्थ नाही. सद्गुरू वामनराव पै म्हणतात " तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार "कारण आपलं भविष्य आपणच घडवतो आणि आपणच बिघडवतो . 

शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला ध्येय दिलं, स्वराज्य आणि फक्त स्वराज्य आणि ते मिळवण्यासाठी त्यांनी जीवाची पर्वा न करता ध्येयपूर्तीसाठी तुटून पडले . आजच्या युवा पिढीला आपण ध्येय दिलं पाहिजे आणि त्याच बरोबर ध्येयपूर्ती साठी योग्य  मार्गदर्शन,  प्रोत्साहन आणि सहायता दिली पाहिजे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची लोकसंख्या ३५ कोटी होती. आपली त्यावेळची युवापिढी गांधीजींच्या चलेजाव आणि भारत छोडो चळवळीत सहभागी झाली  कारण गांधीजींनी त्यांना ध्येय दिलं. स्वातंत्र्यासाठी त्यावेळेची युवापिढी आत्मबलिदानासाठीसुद्धा  तयार झाली. स्वातंत्र्यासाठी घरदार,  साधन,  संपत्तीचा त्याग करायला त्यावेळचा युवक तयार झाला कारण स्वतंत्र हवं होतं. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं,  हव्या त्या गोष्टी सहज मिळायला लागल्या आणि मिळवण्यासाठी काहीही नव्हतं. स्वतंत्र्याची  किंमत कमी झाली आणि स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या पिढीला स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार वाटू लागला. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याचा फरक  त्यांना जाणवला नाही, मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल गांभीर्याने कधी विचाराच केला नाही.आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती झाली आणि माणसाचं आयुष्यच बदलून गेलं. आता मिळवण्यासाठी काहीच नाही,  उंच उंच इमारती आहेत,  चांगल्या शिक्षणाच्या सोयी आहेत , चांगले कपडे, जेवण  सगळं काही सहज उपलब्ध झालं.

युवापिढी भरकटली, चुकीच्या मार्गाला लागली, जवाबदारी पत्करायला बघत नाही, त्यांना ध्येयं नाहीत असं आपण जाणीवपूर्वक सांगत असतो पण युवापिढी घडवण्याची जबाबदारी आम्हा पालकांची नव्हती का? युवा पिढी चुकीच्या मार्गाला लागली तर त्यांच्यावर चांगले संस्कार घडवण्याची जबाबदारी आम्हा पालकांचीच  होती आणि पालक म्हणून आम्ही कुठंतरी  कमी पडलो.   आजच्या तरुणाजवळ धाडस, ताकद, उर्मी,ध्येय,  ऊर्जा सगळं काही आहे, ते फक्त चांगल्या दिशेने वळवायला  पाहिजे .त्या ऊर्जेचा चांगला उपयोग व्हायला हवा नाहीतर मग ती ऊर्जा चुकीच्या दिशेने बाहेर पडते . नवीन भारत घडवण्याची क्षमता आजच्या युवा पिढीत आहेत,आजच्या युवकांना स्वतःची मतं आहेत, त्यांच्याजवळ नवीन विचार आहे, नवीन पद्धती आहेत.  आपण फक्त त्यांना योग्य वळण द्यायला पाहिजे. त्यांना व्यवस्थेविषयी आदर आहे  आणि अराजकतेविषयी राग आहे. नवी पिढी नव्या भारताच्या, नव्या व्यवस्थेचे प्रतीक आहे.  ही पिढी एक नवी शिस्त, नवे युग आणि नवीन विचार आणू पाहत आहे. नवीन भारताच्या निर्मितीसाठी आपण युवापिढीला प्रोत्साहन दिलं पाहिजे हीच काळाची गरज आहे.