Goan Varta News Ad

विश्वास

एखाद्या रुग्णासोबतचं डॉक्टरचं नातं हे ज्या घटकावर अवलंबून असतं तो महत्त्वाचा घटक म्हणजे 'विश्वास'.औषधाच्या जोडीने रुग्णाचा डॉक्टरांवर जर पूर्ण विश्वास व इच्छाशक्ती असेल तर रुग्ण लवकर बरा होतो . विश्वासामुळे निर्माण होणारी रुग्णामधली सकारात्मकता रुग्णासाठी अत्यंत महत्त्वाची.

Story: स्टेथोस्कोप । डॉ. अनिकेत मयेकर |
21st June 2021, 07:13 Hrs
विश्वास

विश्वास ' म्हणजे विविध वस्तूंशी, व्यक्तींशी, अन्य प्राण्यांशी,विचारप्रणालींशी,मूल्यांशी, तत्त्वांशी किंवा अद्भूत कल्पित मानल्या जाणाऱ्या विषयांशीही जडणारे भावनात्मक नाते आहे.'- मराठी विश्वकोशात दिलेल्या विश्वास शब्दाचा अर्थ आम्हाला डॉक्टरी पेशा स्वीकारलेल्यांसाठी अतिशय महत्त्वाचा. आजही डॉक्टरला देवरूप मानले जाते. हे देवस्वरूपत्व कशामुळे प्राप्त होत असेल, तर ते रुग्णांचा डॉक्टेरांवर असलेला विश्वाकस व त्याचबरोबर डॉक्टरांनी त्या रुग्णाच्या 

विश्वासास पात्र ठरण्यासाठी स्वीकारलेल्या जबाबदारीमुळे. त्यामुळे डॉक्टर व पेशंट यांच्यातले विश्वास हे एक नाजूक नाते असते.

एकदा दुपारच्या वेळी फोनची रिंग वाजली. नंबर अनोळखी असल्याने नवीन पेशंट असेल म्हणून फोन घेतला. " डॉक्टर माझ्या आईला घेऊन यायचं आहे तुमच्याकडे. कधी येऊ? " " आज संध्याकाळी पाच वाजता या " मी सांगितलं व तिने बरं म्हणून फोन ठेवला.ते डोंबिवली वरून वाशीला येणार होते. संध्याकाळी पाच वाजायच्या सुमारास  रिसेप्शनवरुन फोन आला की रुग्ण आत पाठवत आहे. काही वेळापूर्वीच शेवटचा पेशंट तपासून गेल्याने मी जरा वाचत बसलेलो.इतक्यात दारावर टक टक ऐकू आली. "या आत" म्हणताना एक सतरा- अठरा वर्षांची मुलगी आपल्या आईला आधार देत आत आली. मी दोघींना समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. " ओळखलंत का डॉक्टर? " मुलीबरोबर पेशंट म्हणून आलेल्या मुलीच्या आईने विचारलं.आठवून बघितलं तर मी काही महिन्याआधी, म्हणजे मागील लॉकडाऊन व्हायच्या आधीच्या दिवसांत गेलो …

एक बाई व तिचा मुलगा एका सोळा - सतरा वर्षाच्या मुलीला त्यांच्या दोन्ही खांद्यांवर तिचे दोन्ही हात टाकून घेऊन आले. मुलीला बघितलं तर दोन्ही हातापायांमध्ये पॉवर नाही, हातपायांचें स्नायू  एकदम बारीक झालेले , डोळ्यांच्या पापण्याही अगदी मिटलेल्या. अगदी कृश अंगकाठी. त्यांना बसायला सांगितल्यावर त्या रुग्ण म्हणून आलेल्या मुलीच्या आईने त्या मुलीची आधीची केस फाईल माझ्या समोर ठेवली. "आमच्या नातेवाईकांच्या सांगण्यावर,अगदी विश्वासाने तुमच्याकडे आलो आहोत.डॉक्टर माझ्या मुलीचं काहीतरी करा " डोळ्यात पाणी आणून त्या माऊलीने सांगितलं. केस फाईल बघितल्यानंतर अतिशय प्रतिथयश अशा न्यूरोलॉजिस्टकडे औषधोपचार चालू होते. परंतु सुधारणा अजून लवकर होण्यासाठी अल्टरनेटिव्ह सायन्सचा आधार घ्यावा असं कदाचित त्यांनी ठरवलं असेल. त्या आपल्या मुलीला  अगदी विश्वासाने माझ्याकडे घेऊन आलेल्या. फाईल वाचल्यानंतर लक्षात आलं की तिला मायोटोनिक डिस्ट्रॉफी हा आजार आहे. या आजारात रुग्णाचे स्नायू व मांसपेशी अशक्त होत जातात. त्यामुळे पेशंट कृश होत जातो व त्याचबरोबर स्नायू पॅरलाईज होत जातात. या आजारात एरवीही रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता कमीच. ती मुलगीही अडीच वर्षे चालू शकली नव्हती. या आजारातून आलेल्या अशक्तपणामुळे तिला कुणाच्यातरी आधाराशिवाय साधं नीट चालताही येत नव्हतं. रूग्णाची हिस्ट्री पाहता,आयुष्यात एवढ्या कोवळ्या वयात अनेक धक्के बसल्याने ती मानसिकरित्याही खचून गेली होती.अगदी वडिलांच्या निधनापासून ते बरंच काही, किती किती सोसावे..कदाचित तेच तर कारण नसावं ? कारण मनाचे आजार दिसत नाहीत...सगळ्या बाबतीतले विश्लेषण करून शेवटी मीही त्यांना विश्वास दर्शवला,मॉडर्न मेडिसिनच्या जोडीला अल्टरनेटिव्ह  औषधोपचारची जोड व एक जगण्याचा ,बरं होण्याचा विश्वास दिला आणि खरंच ती मुलगी काही महिन्यांमध्ये चालत अगदी हॉस्पिटलला आली.तिच्यामध्ये अगदी खूप सुधारणा झाली होती. 

आणि आज तर लॉकडाऊन झाल्यानंतर हिच मुलगी आपल्या आजारी आईला आधार देत हॉस्पिटलला घेऊन आली होती. प्रश्न हाच उभा राहतो की असाध्य आजारात रुग्णांवर सकारात्मक परिणाम नेमके कशामुळे होत असतील?

औषधे आहेतच..... पण औषधांच्या जोडीला त्याप्रती असलेला विश्वास आणि सकारात्मक विचार, बरे होऊ ही इच्छाशक्ती ?

म्हणतात ना A TRUST CAN TURN YOUR HOPES  INTO REALITY हेच खरं ..