Goan Varta News Ad

आंतरराष्ट्रीय योग दिन

२१ जून हा दिवस दरवर्षी सर्व जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त या दिवसाचे महत्त्व जाणून घेवू.

Story: योग । चंद्रकांत रामा गावस |
21st June 2021, 07:12 Hrs
आंतरराष्ट्रीय योग दिन

भारतीय धर्म संस्कृतीमधील योग संकल्पनेची मांडणी श्रीमद्-भगवद्गीता या पवित्र ग्रंथात केलेली आहे. भारतीय प्राचीन संस्कृती,परंपरा यामध्ये योगा, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. प्राचीन काळातील भारतीय थोर ऋषिमुनींनी वेळोवेळी योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो,शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो असे आवर्जून सांगितलेले आहे.मग मनात प्रश्न उद्भवतो की योग म्हणजे काय?

 तन अन् मन यांचा सर्वांग सुंदर व्यायाम म्हणजे योग. माणसाचे सुदृढ तन आणि निकोप मन असणे अत्यंत गरजेचे आहे. सुदृढ तनात निकोप मन राहते यासाठी नित्यनियमाने व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. मनातील चित्तवृत्ती यांचा निरोध म्हणजे योग. मनात परस्परविरोधी अशा अनेक वृत्ती निर्माण होत असतात व त्यांना अडवणारी प्रक्रिया ही मनातच निर्माण होत असते.  मनामध्ये येणा-या योग्य-अयोग्य विचारांना हे करा,हे करू नका, हे टाळा, हे थांबवा अशा प्रकारचा इशारा दिला जातो. परंतु अविचाराने हा इशारा धुडकावला जातो. म्हणजेच मनात येणाऱ्या परस्पर विरोधी वृत्तींच्या आहारी न जाता त्याबद्दल त्रयस्थ बनून उदासीनपणे पाहण्याची कला म्हणजे निरोध होय. परस्परविरुद्ध घटकांना सारखेपणाने सांभाळणे म्हणजे योग. इंद्रिय व शिव म्हणजे योग. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये व मन यांना योगामुळे ताब्यात ठेवता येते. योग हा शरीराचे धातु सौष्ठव मिळवण्याचा उपाय आहे.म्हणून योगासारखे बलं दुसरे कोणतेच नाही

 भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक,मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नती साधता येते. भारतातील ही योगसंस्कृती जागतिक पातळीवर बऱ्याच देशवासियांना भावली. त्यामुळे देश-विदेशात योग साधने वर चर्चा झाली आणि जगातील अनेक देशांनी भारतीय योग संस्कृती स्वीकारली.

 भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. २१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे.भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने केला गेला आहे.

 करोना विषाणू संसर्गाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नियमित व्यायाम व योग करावा. व्यायामासाठी बाहेर जाता येत नसल्याने घरात योगासने करावीत. फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी प्राणायाम व मनाच्या आरोग्यासाठी नामस्मरण, ध्यान यासारखी योगसाधना करावी.

"नित्यनियमाने योगसाधना करा,सुदृढ तन कमवा

आरोग्याची उत्तम निगा राखा, मन निकोप ठेवा"

' कोणत्याही दोन गोष्टी जोडणे' या अर्थाने योग-संयोग हे शब्द व्यवहारात वापरले जातात. मात्र शरीरस्वास्थ्य व आत्मोन्नती या संदर्भात योग या शब्दाचा विचार केल्यास 'योग: चित्त वृत्ति निरोध:' असे वर्णन पातंजली योगामध्ये आढळते.