Goan Varta News Ad

झाडाझडतीमुळे काही मंत्री अस्वस्थ!

संतोष, रवींकडून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा; विधानसभेची जोरदार तयारी करण्याचेही निर्देश

|
10th June 2021, 10:29 Hrs
झाडाझडतीमुळे काही मंत्री अस्वस्थ!

फोटो : भाजप गोवा प्रभारी सी.टी. रवी. यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आणि गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी गुरुवारी मंत्र्यांशी घेतलेल्या बैठकांत कामगिरी आणि पक्षाला घातक ठरू शकणारी विधाने यांवरून काही मंत्र्यांची कानउघाडणी केली. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. पुढील तीन-चार महिन्यांत कामगिरीत सुधारणा न झाल्यास विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचे संकेत संतोष आणि रवी यांनी अप्रत्यक्षरीत्या या मंत्र्यांना दिल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.
राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याचीच तयारी म्हणून संतोष आणि रवी यांनी बुधवारी सायंकाळी राज्यात दाखल झाल्यापासून बैठकांचा धडाका लावला. बुधवारी रात्री त्यांनी काही आमदारांशी बैठका घेऊन पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून मंत्र्यांची वैयक्तिक बैठक घेत त्यांच्याकडील खात्यांच्या कारभाराबाबत चर्चा केली. दुपारनंतर पक्ष पदाधिकारी आणि रात्री भाजपच्या गाभा समितीसोबतही त्यांनी बैठक घेतली.
संतोष आणि रवी गोव्यात दाखल झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्याला गुरुवारच्या बैठकीसाठी वेळ आणि कालावधी अगोदरच ठरवून देण्यात आला होता. ज्यांची कामगिरी खराब त्यांना अधिक आणि कामगिरी चांगली त्यांना कमी कालावधी देण्यात आला होता. ज्या मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षांत आपली खाती आणि जनतेला योग्य न्याय दिलेला नाही, अशांची यादी प्रदेश भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अगोदरच संतोष यांना सादर केली होती. त्यानुसार संतोष आणि रवी या दोघांनीही खराब कामगिरी केलेल्या मंत्र्यांची झाडाझडती केल्याचे आणि कामगिरीत सुधारणा न केल्यास निवडणुकीत तिकीट न देण्याचे स्पष्ट संकेत त्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोविड काळात अनेक मंत्री जनतेपर्यंत पोहोचले नाहीत. त्याचा फटका पक्षाच्या प्रतिमेला बसल्याने भाजपविरोधात जनतेत नाराजी पसरली आहे. याशिवाय कोविड काळातही काही मंत्र्यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात वक्तव्ये केलेली होती. हेच मुद्दे घेऊन संतोष आणि रवींनी संबंधित मंत्र्यांची शाळा घेतल्याचेही समजते. त्यामुळेच बैठकीनंतर अनेक मंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसून आली.
............................................................
मुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यांत विरोधाभास
बी. एल. संतोष आणि सी. टी. रवी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानेच गोव्यात आलेले होते. त्यामुळेच त्यांनी आमदार, मंत्री, पदाधिकारी आणि गाभा समितीच्या बैठका घेऊन संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठामपणे सांगितले. पण प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मात्र संतोष आणि रवींनी ‘सेवा ही संघटन’वरच अधिक भर दिल्याचे स्पष्ट केले. या दोघांनी गोव्याप्रमाणे महाराष्ट्राचाही दौरा केला. त्यामुळे ते निवडणुकीनिमित्तच गोव्यात आले असे म्हणता येणार नाही, असेही तानावडे म्हणाले.
......................................................................
जिंकण्याची पात्रता असलेल्यालाच तिकीट द्या!
विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रत्येक मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास करावा आणि जिंकण्याची​ पात्रता असलेल्याच व्यक्तीला उमेदवारी द्यावी. गेल्या विधानसभा निवडणुकीत केलेली चूक पुन्हा करू नये, अशी मागणी आपण संतोष आणि रवींकडे केली आहे. त्यांनीही यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे, अशी माहिती मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
...................................................................
शंभर टक्के लसीकरणाचे निर्देश
संतोष आणि रवी यांनी गाभा समितीच्या बैठकीत ‘सेवा ही संघटन’अंतर्गत राज्यात आयोजित कार्यक्रम तसेच कोविड काळात पक्षाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. राज्यातील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी भाजप आमदार, मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा २१ जून रोजी बलिदान दिन आणि ६ जुलै रोजी जन्मदिन आहे. त्यानिमित्त राज्यभर वृक्षारोपण करण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे, असेही त्यांनी नमूद केले.