पावं कथैगल: मानापमानाचा बडेजाव मांडणाऱ्या कथा

‘पावं कथैगल’ चा शब्दशः अर्थ होतो पापयुक्त कथा! या कथा पापपुण्याची नवी व्याख्या मांडतात. प्रत्येक व्यक्ती समाजात आपल्याला चांगला दर्जा मिळावा आणि टिकावा यासाठी कायम झटत असते. ही निष्कलंक स्वप्रतिमा जपण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याचा त्या व्यक्तीचा क्रूर अट्टाहास ‘पावं कथैगल’ या तमिळ अँथॉलजी सिरीजमध्ये दिसून येतो. तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी सुधा कोंगारा, विग्नेश शिवन, गौतम मेनन आणि वेट्रीमारन यांनी दिग्दर्शित केलेली ही सिरीज अजिबात चुकवू नका!

Story: प्रथमेश हळंदे |
06th June 2021, 12:02 am
पावं कथैगल: मानापमानाचा बडेजाव मांडणाऱ्या कथा
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजापासून तुटून एकटं राहणं, ही कल्पनाच त्याला करवत नाही. त्याला कुणाची न कुणाची सोबत सतत हवीच असते. त्यामुळे नवनवीन नाती जोडणे आणि आपला गोतावळा वाढवत राहणे, याकडे त्याचा विशेष कल दिसून येतो. या गोतावळ्याचं व्यापक रुपांतर समाजात होतं आणि त्यानंतर एक विशिष्ट सामाजिक स्थैर्य आपल्याला लाभावं, यासाठी मानवाची निरंतर धडपड सुरु होते. आपल्या समाजाशी जुळवून घेण्यासाठी, आपला सामाजिक दर्जा कायम राखण्यासाठी समाजाने घातलेल्या लिखित-अलिखित नियमावलीचे पालन करणे अपरिहार्य ठरते आणि नियमभंग झालाच, तर समाजद्रोह म्हणून समाजाचा रोष पत्करण्यापलीकडे हातात काही उरत नाही.समाजातून वेगळं व्हायला लागू नये म्हणून ती नियमावली पाळण्याचा अटोकाट प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. प्रसंगी त्यासाठी कुठल्याही थराला जायला तो मागेपुढे बघत नाही. मग अशावेळी क्रौर्याची परिसीमा गाठणे ही त्याला फारच क्षुल्लक बाब वाटू लागते. यातूनच ‘ऑनर किलिंग’ सारख्या हिंसक कृत्यांना चालना मिळते. समाजाने अमान्य आणि अपवित्र ठरवलेल्या नातेसंबंधांना हिंसक पद्धतीने संपवणे म्हणजे ऑनर किलिंग. आपला सामाजिक दर्जा हा जेव्हा आपल्या रक्ताच्या नात्यांपेक्षा वरचढ ठरू लागतो, तेव्हा स्वतःला पापभीरू म्हणवणारे या दुष्कृत्यात सहभागी होतात. ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर असलेली ‘पावं कथैगल’ ही तमिळ अँथॉलजी सिरीज ‘ऑनर किलिंग’च्या वेगवेगळ्या घटनांवर भाष्य करते. या सिरीजमध्ये चार एपिसोड्स असून चौघांचाही केंद्रबिंदू ‘ऑनर किलिंग’ आहे.सुधा कोंगारा दिग्दर्शित ‘थंगम’ हा पहिला एपिसोड सत्तार (कालिदास जयराम) या मुस्लीम ट्रान्सजेन्डरची कहाणी सांगतो. सत्तारचं त्याच्या हिंदू बालमित्रावर, सर्वननवर (शंतनू भाग्यराज) निस्सीम प्रेम आहे, ज्याला तो लाडाने थंगम (सोनं) म्हणतो. आपली लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी यशस्वी झाल्यानंतर तो सर्वननशी लग्न करायच्या तयारीत आहे पण सर्वनन मात्र सत्तारच्या बहिणीच्या प्रेमात पडल्याची कबुली देतो. या अनपेक्षित निर्णयाने दुखावलेला सत्तार मित्रप्रेमापायी त्याच्या बहिणीचं आणि सर्वननचं प्रेमप्रकरण यशस्वी व्हावं, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. या नात्याला दोघांच्याही घरच्यांकडून कडाडून विरोध झाल्यावर सत्तार त्याच्या शस्त्रक्रियेसाठी जपून ठेवलेली पै न पै सर्वननला देतो आणि त्यांना गाव सोडून जायला मदत करतो. त्यानंतर सत्तारला गावात मिळणारी वागणूक काळीज पिळवटून टाकते.समतावादाचे ढोल पिटणाऱ्या जातीयवादी वीरसिम्हनचं खरं रूप विग्नेश शिवन दिग्दर्शित ‘लव्ह पन्ना उत्त्रानुम’ मध्ये दिसतं. गावचा पुढारी असलेल्या वीरसिम्हनला (पदम कुमार) आदिलक्ष्मी आणि ज्योतिलक्ष्मी (अंजली) अशा दोन जुळ्या मुली आहेत, ज्यांना आपले वडील समतावादी आहेत यावर विश्वास आहे. वडिलांसोबत गावात राहत असलेली आदिलक्ष्मी आपलं ड्रायव्हरसोबत असलेलं प्रेमप्रकरण त्यांना सांगते आणि मग गोत्यात अडकते. आदिलक्ष्मीच्या सद्यस्थितीची कल्पना नसलेली ज्योती तिच्या मित्रांना, पेनोलपी (कल्की कोचलिन) आणि बी-क्युब (भरणी) यांना घेऊन गावात येते. वास्तवाची जाणीव झाल्यावर ती आपण लेस्बियन असल्याचं सांगते. एकवेळ प्रकरण आंतरजातीय असतं तर ते निकाली लावलं असतं पण आता या नात्याला कसं स्वीकारायचं हा पेचप्रसंग वीरसिम्हन कशापद्धतीने सोडवतो, याचं उत्तर एपिसोडच्या शेवटाकडे नेतं.‘वान्मगल’ या तिसऱ्या एपिसोडमध्ये दिग्दर्शक गौतम वासुदेव मेनन एक अतिशय वेगळा दृष्टिकोन मांडतो. सत्या (गौतम मेनन) आणि मती (सिमरन) हे एक सुखी मध्यमवर्गीय जोडपं. त्यांना भरत, वैदेही आणि पोन्नतायी ही तीन मुलं, त्यांपैकी पोन्नतायी हे शेंडफळ सर्वांचंच लाडकं. वैदेही वयात आल्यावर मती छोट्या छोट्या गोष्टींतून तिला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव करून देऊ लागते. वेगवेगळी बंधने घालू पाहते. एकेदिवशी काही भामटे वैदेही समजून पोन्नतायीचं अपहरण करतात आणि तिच्यावर बलात्कार करतात. जखमी, घाबरलेली पोन्नतायी बघून घरचेही भांबावतात. गावभर अफवांना पेव फुटतो आणि मतीच्या मनाची घालमेल सुरु होते. आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याची खंत तिला टोचू लागते आणि तो कोंडमारा सहन न करू शकणारी मती टोकाचं पाऊल उचलते, ज्याची प्रेक्षक कल्पनाही करू शकत नाही. ‘ऊर इरावू’ हा चौथा एपिसोड वेट्रीमारनने दिग्दर्शित केला असून, ‘ऑनर किलिंग’ चं जळजळीत वास्तव या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतं. घरच्यांच्या मर्जीविरुद्ध हरीसोबत (हरी कृष्णन) लग्न करून पळून जाणारी सुमती (साई पल्लवी) आता प्रेग्नंट असून शहरात तिने सुखाचा संसार थाटला आहे. अशातच सर्वकाही विसरून तिचे वडील जानकीरामन (प्रकाश राज) त्यांच्या या सर्वात लाडक्या लेकीला पहिल्या बाळंतपणासाठी म्हणून गावाला न्यायला येतात. वडिलांचा बदललेला स्वभाव बघून ती ही गावी येते आणि घरात डोहाळे जेवणाची तयारी सुरु होते. गावाला आल्यावर आपल्या कुटुंबाला कायकाय भोगावं लागलंय हे कळल्यावर तिचं मन उद्विग्न होतं पण इतकं होऊनही आपले वडील आपल्यावर तितकंच प्रेम करतात हे जाणवून ती सुखावते. कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच तिला त्रास होऊ लागतो आणि आपण कुठल्या जाळ्यात अडकलोय याची तिला प्रचिती येते. सत्यघटनेवर आधारित असलेला हा एपिसोड मन हेलावून टाकतो.‘थंगम’ मध्ये कालिदास जयरामने सत्तारची भूमिका, त्याच्या वागण्याबोलण्यातले बायकी हावभाव अतिशय उत्तमरित्या साकारले आहेत. शंतनू भाग्यराज आणि भवानी श्री यांनी सहाय्यक भूमिकांमध्ये रंग भरले आहेत. ‘लव्ह पन्ना उत्त्रानुम’ मधले अंजली, कल्की, पदम कुमार हे कलाकार तर लक्षात राहतातच मात्र ‘मुर्ती लहान पण किर्ती महान’ हे वाक्य खरं ठरवणारा नरीकुट्टी (जाफर सादिक) आपली छाप पाडतो. ‘वान्मगल’मध्ये दिसणारी अंजेलिनाने साकारलेली पोन्नताई आणि सिमरनने साकारलेली मती ही मायलेकींची जोडी आणि त्यांचे हृद्य संवाद प्रेक्षकांना भावूक करतात. आदित्य भास्कर, सतन्या आणि गौतम मेनन या सहकलाकारांनीही त्यांना योग्य ती साथ दिली आहे. प्रकाश राज व साई पल्लवी यांनी ‘ऊर इरावू’ मधली दाहकता आपल्या अभिनयाने अधिकच परिणामकारक बनवली आहे. दोन वर्षांनी अचानक समोर आलेल्या बापाला पाहून अवघडलेली मुलगी आणि मुलीला वाचवायचं की पत सांभाळायची या द्विधा मनस्थितीत अडकलेला बाप बघताना साई पल्लवी आणि प्रकाश राज यांच्या कसदार अभिनयाचा प्रत्यय येतो. चार दिग्दर्शक, चार एपिसोड्स आणि चार आगळ्यावेगळ्या कथा. ‘थंगम’ वगळता इतर कथा ह्या त्या त्या एपिसोड्सच्या दिग्दर्शकांनीच लिहल्या असून, ‘थंगम’ ही कथा शान करुप्पूसामी यांनी लिहिलेली आहे. आर. शिवात्मिका, जस्टीन प्रभाकरन, अनिरुध रविचंदर, विजय एलीबेझर आणि कार्तिक यांनी सिरीजला अगदी सूचक असं पार्श्वसंगीत दिलं असून, जस्टीन प्रभाकरनने गायलेलं ‘थंगमे’ हे गाणं कमाल झालं आहे. ‘ऑनर किलिंग’ या विषयावरील ह्या चारही एपिसोड्सच्या कथानकातील सस्पेन्स आणि ड्रामा एलिमेंट्समुळे ही सिरीज शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होते. विग्नेश शिवनने या संकल्पनेला डार्क ह्युमरचा टच देऊन युवा तमिळ दिग्दर्शकांच्या वेगळेपणाची झलक दाखवून दिली आहे. गौतम मेननचं दिग्दर्शन म्हणजे सामर्थ्यवान स्त्री व्यक्तिरेखा हे समीकरण इथेही उत्तम जुळून आलं आहे. सुधा कोंगारा यांचा एपिसोड त्याग आणि स्वार्थ यांतला फरक न कळू शकणाऱ्या मानवी भावभावनांचा गुंता दाखवतो. वेट्रीमारनने नेहमीच्या पद्धतीने एक हार्ड-हिटिंग कथानक उभं केलंय, जे ‘ऑनरकिलिंग’च्या बहुतांश घटना आणि त्यांची कारणमीमांसा कुठलाही आडपडदा न ठेवता प्रेक्षकांसमोर घेऊन येतं.समाजातील आपली खोटी प्रतिष्ठा, मानसन्मानाच्या बचावासाठी असे पापयुक्त मार्ग अवलंबून उजळ माथ्याने फिरणाऱ्या ढोंगी महाभागांसाठी तुकोबा म्हणतात,अहंकार तो नासा भेद । जगीं निंद्य ओवळा ॥१॥नातळे तो धन्य यासी । जाला वंशीं दीपक ॥२॥करवितो आत्महत्या । नेदी सत्या आतळो ॥३॥तुका म्हणे गुरूगुरी । माथां थोरी धरोनि ॥४॥‘ऑनर किलिंग’ हे फक्त आंतरजातीय/धर्मीय विवाह इतपतच मर्यादित नसून, त्याची व्याप्ती समाजातील कित्येक घटकांवर काय परिणाम करते याचा किमान अंदाज ही सिरीज बघून प्रेक्षक लावू शकतील. पाप आणि पुण्याच्या नक्की काय व्याख्या आहेत, त्या कुणी आणि का बनवल्या आहेत, याचीही कल्पना ही सिरीज बघताना येते.