वामग्रिवा श्री नवदुर्गा

निसर्गाचे आणि मंदिरांचे वैभवत्व लाभलेल्या अंत्रूज महालातील मडकई गावात स्थलांतरित झालेल्या वामग्रिवा श्री नवदुर्गेची कथा, तिचा महिमा आणि जत्रोत्सवातील भारावलेले वातावरण.

Story: पिरोज नाईक |
05th June 2021, 11:52 pm
वामग्रिवा श्री नवदुर्गा
कलेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या गोव्यामधील अंत्रूज महालामध्ये डोळ्यांचे पारणे फिटणारी वनराई, कान तृप्त करणारे, झुळझुळ वाहणारे झरे, मन प्रसन्न करणारी मंदिरे, मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान झालेली देव - दैवते व शेकडो वर्षांची परंपरा असलेले त्यांचे सण - उत्सव आपली संस्कृती वैभव संपन्न करीत आहेत. सावई-वेरे - मदनंत,  म्हार्दोळ - महालसा,  मंगेशी - मंगेश,  कवळे - शांतादुर्गा,  रामनाथी - रामनाथ,  नागेशी - नागेश,  केरी - विजयादुर्गा,  फर्मागुडी - गोपाळ गणपती,  खांडोळा - महागणपती,  माशेल – देवतीकृष्ण.अशी कितीतरीच भव्यदिव्य मंदिरे अंत्रूज महालात पहावयास मिळतात. पोर्तुगीज राजवटीत बाटाबाटीच्या काळात तिसवाडी तालुक्यातून काही दैवते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फोंडा तालुका सोईस्कर वाटल्याने येथे स्थलांतरित झाली व येथील भक्तगणांनी त्यांची मंदिरे उभारली. या मंदिरात वर्षभर परंपरागत सण - उत्सव साजरे केले जातात.मडकई गावात स्थलांतर झालेली देवी श्री नवदुर्गा आगशी - गावशी या गावातून होडीने पारंपई मडकई येथे आली. असे सांगितले जाते की, तिथे डोंगरावर एक गुराखी गुरांना घेऊन जात होता. महिलेच्या वेषातील देवीने त्या गुराख्याला ‘मला येथील भाटकाराला भेटायचे आहे. त्याला तू बोलावून आण’ असे सांगितले. मला गुरांना पाणी द्यायचे आहे पण इथे जवळपास पाणी नाही असे गुराख्याने सांगताच देवीने जमिनीवर लाथ मारली व क्षणार्धात पाणी वर काढले. ही जागा तळीखोल या नावाने ओळखली जाते. पाणी पहाताच ही दैवी शक्ती असल्याचे गुराख्याच्या ध्यानात आले. त्याने लगेच गावाकडे धाव घेतली व घडलेली हकिकत भाटकाराच्या कानावर घातली. भाटकार सुद्धा वेळ न दवडता धावत धावत डोंगरावर आला. देवीने भाटकाराला सांगितले की, मला या गावात रहायचे आहे. तुम्ही येथे माझे देऊळ बांधा. जेथे हा नारळ पडेल तेथे माझे मंदिर उभारा असे म्हणून देवीने हातातील नारळ गावाच्या दिशेने भिरकावून दिला. पुढे भाटकाराने नारळ पडलेल्या त्या ठिकाणी म्हणजेच आजचा दुतळीवाडा येथे देवीचे मंदिर उभारले.मूर्ती स्थापनेनंतर देवीचा मुखवटा करण्यासाठी भाटकाराने गावातील सोनाराला बोलावून घेतले व सुंदर असा सोन्याचा मुखवटा बनवण्यास सांगितले. देवीचा मुखवटा अप्रतिम कसा होईल हा एकच विचार त्याच्या डोक्यात घोळू लागला आणि आकस्मात त्याला असं वाटू लागलं की आपलीच मुलगी सर्वांग सुंदर आहे. तिचे ते घारे घारे डोळे, चाफेकळीसारखे नाक, काळे कुरळे केस, गोरे गोरे गाल सारंच कसं नक्षत्रासारखं सुंदर! जणू सौंदर्याची खाणच. हे सारं सौंदर्य मुखवट्यात ओतावं असा विचार करून लगेच त्याने मुखवट्याच्या कामाला सुरुवात केली. आठ-दहा दिवसात मुखवटा तयारही झाला. पहाणाऱ्यांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडू लागले. अरे व्वा! छानच. अगदी सोनाराच्या मुलीसारखाच दिसतोय देवीचा मुखवटा. हे कौतुकास्पद उद्गार ऐकून सोनाराच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या जसजशी मुर्ती तयार होऊ लागली. तसतशी तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेली सोनाराची एकुलती एक लेक अगदी वाळू लागली. ती ताजीतवानी उमलती कळी कोमेजलेली निस्तेज दिसू लागली. सोनाराला काय करावे ते सुचेना. शुभमुहूर्तावर मुखवटा नेण्यासाठी आलेली मंडळी मुखवटा घेऊन घराबाहेर पडली तोच सोनाराच्या घरात एकच आरडा ओरडा झाला. त्याची लेक आकस्मात खाली कोसळली, ती पुन्हा उठलीच नाही. साऱ्या घरावर अवकळा पसरली. असाच एक दिवस सोनार झोपला असताना देवीने त्याला दृष्टांत दिला व म्हणाली की ऊठ,  दु:खी होऊ नकोस. तुझी मुलगी कुठेही गेलेली नाही. मीच तुझी मुलगी आहे. वर्षातून एक दिवस मी माहेरी येईन. त्याचप्रमाणे देवी जत्रेच्या दिवसात अष्टमीच्या तिथीला सकाळी सोनाराच्या घरी जाते. तिथे पुजा - अर्चा,  आरती, नैवेद्य होतो. खणा-नारळाने देवीची ओटी भरतात व माहेरी आलेल्या लेकीला भेट म्हणून सुवर्ण अलंकार देतात. रात्री आरती, नैवेद्य झाल्यानंतर देवी पुन्हा मंदिरात येते.कार्तिक व चतुर्थीपासून नवदुर्गेच्या जत्रोत्सवाला सुरुवात होते. त्यानंतर अनुक्रमे मयुरासन, गरूडासन, सुखासन, लालखी, नौकाविहार, रथ अशा विविध आसनांवर बसवून मंदिराच्या प्रांगणात देवीची मिरवणूक काढली जाते. तळीमध्ये नौकाविहाराचा कार्यक्रम होतो.महानवमीच्या दिवशी देवीला महानैवेद्य असतो. याला ‘उपार’ असे म्हटले जाते. हा उपार म्हणजे भात, वडे, भाजी, वरण, खीर वगैरे. परंपरागत बांबूपासून तयार केलेल्या टोपलीतून उपार देवळात आणतात. गावातील महिला, लेकी, सुना नवमीचा उपवास धरतात. फक्त मडकईतीलच नव्हे तर गोमंतकातील बहुतेक लोक हा उपवास करतात. देवीला दुपारी तीन वाजल्यानंतर उपाराचा महानैवेद्य होतो. त्यामुळे महानवमीचा उपवास धरलेले भक्तगण दुपारी न जेवता रात्रीच्या वेळी भोजन करतात. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता देवीची रथात बसवून मिरवणूक काढतात. पहाटेची वेळ असून देखील यावेळी खूप गर्दी असते. नंतर रथ पारंपई येथे जातो. यावेळी ‘श्री नवदुर्गे माझे आई मजला ठाव द्यावा पायी, हासत नाचत इलिगे आई श्री नवदुर्गे अंबाबाई’ असे म्हणत भक्तगण तसेच हौशी लोक रथ नाचवतात.  बारा वाजता रथ तळेखोल येथे जातो. तेथे थोडावेळ थांबतो व चार वाजता परत मंदिरात येतो. यावेळी मडकई गाव सुशोभित केलेला असतो. प्रत्येकाच्या घरी पाहुण्याची वर्दळ असते. लग्नकरून दिलेल्या सर्व लेकी, जावई  जत्रेला आवर्जून हजर राहतात.भक्तांच्या हाकेला धावून येणारे, नवसाला पावणारे असे हे जागृत देवस्थान असल्याने लोक श्रद्धेने नवस बोलतात. असे सांगितले जाते की, एकदा एक भक्त, हे देवी तू माझी मनोकामना पूर्ण कर मी तुला हजार रूपयाची फुले वाहिन असा नवस बोलला. मनोकामना पूर्ण होताच देवीचा नवस फेडण्यासाठी तो देवळात आला तर सगळे फुलवाले फुले संपवून घरी गेले होते. एक म्हातारी बाई मात्र आपली फुले संपवून बाजूला फुलांची परडी ठेवून बसली होती. हा तिच्या जवळ गेला आणि फुले आहेत का याची चौकशी केली. तिने फुले संपवून मी घरी जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले व परडी उचलून हातात घेतली त्या बांबूपासून बनवलेल्या परडीच्या खाचेतून एक चाफ्याचे फूल डोकावत असलेले त्याला दिसले. त्याने म्हातारीच्या हातावर हजार रूपये ठेवले व ते फूल घेऊन तो देवळात गेला. देवीच्या ताटात ते फूल ठेवले व साष्टांग दंडवत घालून घडलेली सारी हकिकत देवीला सांगितली. मनोभावे आणि श्रद्धेने तिला, आपला नवस तुला पोहचला ना? असे विचारले आणि उठून डोळे उघडून देवीकडे पाहिले तो काय आश्र्चर्य देवीने चक्क होकारार्थ मान हलवली आणि तिची मान तशीच राहिली. आज देवीकडे पाहिले तर तिची मान डाव्याबाजूला कललेली दिसते म्हणून तिला ‘वामग्रिवा’ असे म्हटले जाते.या जत्रेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महापर्वणीच्या दुसऱ्या दिवशी जत्रेला चक्क माशाचा बाजार भरतो. खाडीतील तऱ्हेतऱ्हेचे ताजे मासे येथे विकायला येतात. यावेळी पाहुणे मंडळी तसेच इतर लोक मासे खरेदी करण्यासाठी गर्दी करतात.