२४ तासांत ५८ बळी, ३,८६९ बाधित

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th May 2021, 11:59 pm
२४ तासांत ५८ बळी, ३,८६९ बाधित

पणजी : करोना विषाणूने गोव्याभोवतीची मगरमिठी आणखी घट्ट केली असून, बुधवार आणि गुरुवारच्या चोवीस तासांत विक्रमी ३,८६९ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय आणखी ५८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. २,०२३ जणांनी करोनावर मात केली. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या २९,७५२ वर पोहोचली आहे. गुरुवारी एकूण १९२ जणांना कोविड इस्पितळांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नव्या ५८ बळींमुळे राज्यातील एकूण करोना मृतांचा आकडा दीड हजारांवर जाऊन १,५०१ झाला आहे. नव्या मृतांपैकी ३५ जणांचा गोमेकॉत, १८ जणांचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात, दोघांचा उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात, तर ईएसआय, धारबांदोडा, कासावली येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
बुधवार आणि गुरुवारच्या चोवीस तासांत आरोग्य खात्याने ७,६८८ नमुने गोळा केले. त्यातील ७,५१८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३,८६९ बाधित आणि ३,६४९ निगेटिव्ह आले. त्यामुळे राज्यातील बाधित होण्याचा दर वाढून ५१.४६ टक्के झाला आहे. अजून ३,६१५ अहवाल प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याने दैनंदिन अहवालातून दिली आहे.
५० वर्षांखालील १२ मृत
करोनाबाधित तरुणांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. नव्या ५८ बळींपैकी १२ जण ५० वर्षांखालील आहेत. त्यात २५, २७ वयाच्या युवक, युवतीचाही समावेश आहे. तरुणांचे मृत्यू वाढत असल्याने आरोग्य खात्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
राजधानीत धोकादायक स्थिती
राजधानी पणजीतील करोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. सक्रिय बाधितांत पणजी दुसऱ्यास्थानी असून, गुरुवारी पणजीत १,९७६ सक्रिय बाधित होते. मडगावात सर्वाधिक २,२५३, म्हापशात १,६२२, कांदोळीत १,५८७, फोंड्यात १,५१६, पर्वरीत १,४५८, साखळीत १,३३६, कुठ्ठाळीत १,३०९, कासावलीत १,०८३, डिचोलीत १,०५७, तर चिंबलमध्ये १,००७ सक्रिय रुग्ण आहेत.
पंचायतींकडून ‘लॉकडाऊन’ सुरूच
- पंचायतींनी वेगळा लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले असले तरीही अनेक पंचायतींकडून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यास सुरूच आहे.
- सद्यस्थितीत बार्देशमधील ३३ पैकी २५ पंचायती, वाळपई पालिकेसह तेथील सर्व पंचायती, डिचोली, साखळी पालिकांसह डिचोलीतील ७ पंचायती, सत्तरीतील बाराही पंचायती तसेच पेडण्यातील २० पैकी आठ पंचायतींनी लॉकडाऊनला सुरुवात केली आहे.
- दक्षिण गोव्यातील कुडतरी, नावेली, कार्मोणा, वार्का, कुर्टी-खांडेपार, वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये या पंचायतींसह कुंकळ्ळी पालिकेनेही लॉकडाऊन सुरू केले आहे.

हेही वाचा