औद्यौगिक वसाहती ठरत आहेत करोना हॉटस्पॉट

करोना नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करा : आयटक


06th May 2021, 11:58 pm
औद्यौगिक वसाहती ठरत आहेत करोना हॉटस्पॉट

फोटो : सुहास नाईक
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून राज्य सरकारचे यावर काहीच नियंत्रण नाही. यात कामगारांच्या जीवाशी खेळले जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतींमध्ये जाऊन कामगारांच्या आरोग्याची पाहणी करावी. ज्या कंपन्या, कारखाने करोना नियमांचे पालन करत नाहीत, अशा कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आयटकचे सचिव कामगार नेते अॅड. सुहास नाईक यांनी केली आहे.
औद्योगिक वसाहतींतील कंपन्यांचे काम करोना महामारीच्या काळातही जोरात सुरू आहे. अशा वेळी कंपन्या कामगारांना कुठलीच सुरक्षा देत नाहीत. कँटीनमध्ये स्वच्छता असणे गरजेचे आहे. कामगारांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. करोनाग्रस्त कामगारांना कंपनीने भरपगारी सुट्टी द्यावी, अशी मागणीही अॅड. सुहास नाईक यांनी केली.
किमान १५ दिवसांचा लॉकडाऊन हवा
राज्यात झपाट्याने वाढत जाणाऱ्या करोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. इतर देशांनी कडक लॉकडाऊन करून स्थिती नियंत्रणात आणली. गोव्यात मात्र परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर जाताना दिसत आहे. कराेना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करावा, असेही यावेळी अॅड. सुहास नाईक म्हणाले.

हेही वाचा