म्हापसा मार्केटमधील दुकाने १० मे पर्यंत बंद

व्यापारी संघटनेचा स्वच्छेने निर्णय


04th May 2021, 12:48 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सरकारने आठ दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर म्हापसा व्यापारी संघटनेने स्वयंस्फूर्तीने येत्या सोमवार (दि.१०) पर्यंत मार्केटमधील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध असतील, असे जाहीर केले होते. सरकारच्या निर्णयानंतर आमदार जोशुआ डिसोझा यांनी म्हापशातील व्यापार्‍यांची बैठक घेऊन स्वेच्छा लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार म्हापसा व्यापारी संघटनेने १० मे पर्यंत मार्केटमधील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला सरकारने तीन दिवस लॉकडाऊन पुकारला होता. त्यावेळी आम्ही दुकाने बंद ठेवली. आता पुन्हा सरकारने सोमवारपर्यंत कडक निर्बंध घातले आहेत. आमदार जोशुआ डिसोझा यांच्याशी चर्चा करून दुकाने बंदचा निर्णय स्वच्छेने घेतला आहे. तीन दिवसीय लॉकडाऊन प्रमाणेच सोमवारी मार्केटमधील बहुतांश दुकाने बंद होती. जीवनावश्यक दुकानांसोबत काही दुकाने वगळल्यास मार्केट पूर्णता बंद होते. रविवारप्रमाणेच म्हापसा व बार्देशमध्ये लोकांची वर्दळ सुरू होती.
सद्यस्थिती ही खूप बिकट बनली आहे. करोनामुळे अनेक तरुणांसह निष्पाप लोकांना जीव गमवावे लागत आहेत. सरकारने विकामकामे थांबवून आरोग्य यंत्रणेवर अधिक भर देण्याची गरज आहे. जीव वाचला तरच अर्थव्यवस्था उभारी घेईल. विरोधकांनी सरकारवर लॉकडाऊनसाठी दबाव आणण्याची गरज आहे. _आशिष शिरोडकर, अध्यक्ष, म्हापसा व्यापारी संघटना      

हेही वाचा