ऑक्सिजनअभावी कर्नाटकात २४ करोनाबाधितांचा मृत्यू

रुग्णालय प्रशासनाने फेटाळला आरोप; मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक


04th May 2021, 12:12 am
ऑक्सिजनअभावी कर्नाटकात २४ करोनाबाधितांचा मृत्यू

बंगळुरू : कर्नाटकमधील चमराजनगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी रात्री तब्बल २४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावला आहे. रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता आहे. पण, हे मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नाहीत, तर इतर आजारांमुळे रुग्णांची प्रकृती बिघडल्यामुळे झाले आहेत, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने हा मुद्दा लावून धरत येडियुरप्पा यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच करोना संकट रोखण्यासाठी सरकारकडे कोणताच कृती आराखडा नाही, असाही आरोप केला आहे.
देशात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशात आरोग्य सुविधांचा मोठा अभाव जाणवत आहे. अनेक रुग्णांचा उपचार न मिळाल्याने मृत्यू होत आहे. तर, रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या रुग्णांचाही ऑक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच घटना चमराजनगर जिल्हा रुग्णालयात झाल्याचा आरोप होऊ लागला आहे. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नाहीतर इतर आजारांमुळे झाला आहे. परंतु, रुग्णालयातील दृश्यांवरून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे २४ लोकांचा जीव गेला आहे. संपूर्ण घटनेनंतर ६० ऑक्सिजन सिलिंडर रुग्णालयात दाखल झाले आहेत, असा दावा स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला आहे.
दरम्यान, २४ रुग्णांचे प्राण गेल्यानंतर रुग्णालयात ऑक्सिजनचे ६० सिलिंडर दाखल झाले. तसेच या रुग्णालयात म्हैसूरहून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र, म्हैसूरमधील ऑक्सिजनची गरज वाढल्याने हा पुरवठा वेळेवर होत नसल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
कर्नाटकात गेल्या २४ तासांत ३७ हजार करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच या महामारीच्या विळख्यात अडकून २१७ लोकांनी जीव गमावला आहे. तसेच एकूण आकड्यांबाबत बोलायचे झाले तर आतापर्यंत कर्नाटकात एकूण १६ लाख १ हजारांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तसेच १६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा