नियम मोडणाऱ्यांमुळे लॉकडाऊन

राज्यातील स्थिती लवकर सुधारावी, जनजीवन पूर्ववत व्हावे, पुन्हा नव्याने सुरुवात व्हावी यासाठी करोनापासून दूर राहण्याची सर्वांचीच जबाबदारी ठरते.

Story: अग्रलेख |
28th April 2021, 11:51 pm
नियम मोडणाऱ्यांमुळे लॉकडाऊन


कितीही प्रयत्न करून करोना नियंत्रणासाठी कुठेच यश नाही. खुद्द राजकीय नेत्यांनी आयोजित केलेली उद्घाटने, राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांच्या लग्नाचे सोहळे, बाजारपेठा अशा सगळ्याच ठिकाणी कोविडचे निर्बंध मोडले जात असताना, गोव्यात दर दिवशी कोविड रुग्ण, कोविडचे बळी उच्चांक गाठीत असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात चार दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. कोविडच्या बाबतीत गोव्याची स्थिती हाताबाहेर गेलेली असताना अनेकजण दाटीवाटीने गर्दी करून सगळ्या कार्यक्रमांमध्ये वावरत होते. त्यांना लॉकडाऊनसाठी सरकारी आदेशाचीच गरज होती. गुरुवारी रात्री ७ वाजल्यापासून सुरू होणारा लॉकडाऊन सोमवार सकाळपर्यंत चालेल. सरकारला वाटलेच तर अजूनही काही दिवस हा लॉकडाऊन पुढे जाऊ शकतो. कारण गेल्या तीन चार दिवसांत कोविडचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण दर दिवशी दोन ते तीन हजाराच्या दरम्यान असल्यामुळे चार पाच दिवसांच्या लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या कमी होण्याची मुळीच शक्यता नाही. कारण गोव्यातील अनेक उद्योगांमध्ये, मोठ्या आस्थापनांमध्ये, रेस्टॉरेंट आणि कॅसिनोंमध्येही करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. धारबांदोडा, साखळी, वाळपई, सांगे, काणकोण, शिरोडा, मडकई, मये, कुडचडे अशा राज्याच्या आतील भागातील स्थिती पाहिली तर तिथेही शेकडोच्या संख्येने रुग्ण आढळलेत. मडगाव, पणजी, पर्वरी, कांदोळी, कुठ्ठाळी, फोंडा येथील आरोग्य केंद्रांमधील रुग्णांची नोंद एक हजाराच्या पार गेली आहे. याचाच अर्थ करोना राज्यभर पसरला आहे. तो कुठेही असू शकतो अशीच सध्याची आकडेवारी सांगते.
गेल्या वर्षभरात कधीच अशी स्थिती उद्भवली नव्हती. पण यावेळी एप्रिल महिन्यात करोनाचा उच्चांकच दर दिवशी दिसतो. १९ हजाराच्या आसपास सक्रिय रुग्ण, अकराशे पेक्ष जास्त मृत्यू ही गोव्यासाठी चिंतेची बाब आहे. ही स्थिती पाहता यापुढे चाचण्या वाढवल्या तर रुग्णही मोठ्या प्रमाणत मिळतील त्यामुळे स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत सध्या लागू केला आहे तसाच लॉकडाऊन लागू करावा लागेल. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे आणि लॉकडाऊन नंतर उद्भवलेल्या समस्यांची सुरूवात पहिल्याच दिवसापासून झाली आहे. अनेक कामगार आपल्या गावी परत जात आहेत. कामगारांनी रेल्वे स्थानक, बसस्थानकांवर रांगा लावायला सुरूवात केली. गेल्या लॉकडाऊन नंतर अनेकजण आपल्या नोकऱ्या कशाबशा वाचवून राहिले होते, त्यांच्यासमोर पुन्हा संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये आधीच नोकऱ्या गमावलेल्या हजारो लोकांना अजूनही नवा रोजगार मिळालेला नाही. अशातच पुन्हा लॉकडाऊन म्हणजे नव्या नोकऱ्या निर्माण होण्यासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी लागेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊन करताना पुन्हा बेरोजगारीची समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेतली आहे. उद्योग, व्यवसायांना सूट देऊनच लॉकडाऊन करावे अशी अनेकांची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांनी अनेक घटकांचा विचार करून लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. औद्योगिक आस्थापनांना लॉकडाऊनमधून वगळले आहे. त्यांच्या कामगारांसाठी असलेली वाहतूक व्यवस्था वगळली आहे. त्यामुळे गोव्यातील उद्योग क्षेत्रात पुन्हा किमान नव्या लॉकडाऊनमुळे नोकऱ्या गमवण्याची वेळ कोणावर येणार नाही असे अपेक्षा करूया. राज्यातील स्थिती लवकर सुधारावी, जनजीवन पूर्ववत व्हावे, पुन्हा नव्याने सुरुवात व्हावी यासाठी करोनापासून दूर राहण्याची सर्वांचीच जबाबदारी ठरते.
मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर लगेच बाजार, सुपरमार्केट, दुकानांमध्ये लोकांची गर्दी दिसू लागली. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे सांगितले असतानाही अनेकांनी साठा करून ठेवण्यासाठीच खरेदी केली असावी. त्यात गर्दी टाळण्याच्या निर्बंधांना हरताळ फासला गेला. गोव्यात सर्व ठिकाणी करोना पसरलेला असतानाही त्याची भीती लोकांना वाटत नाही. हे बिनधास्त फिरणारेच करोनाचे खरे ‘स्प्रेडर’ झाले आहेत. एप्रिलमध्ये अठ्ठावीस दिवसात २७९ जणांचा बळी गेला. आतापर्यंत अकराशे लोकांना जीव गमवावा लागला. अनेकांच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबातील सदस्यांची उपस्थितीही नसते. इतकी भयावह स्थिती असताना गर्दीची भीती नसलेल्या नियम मोडणाऱ्या लोकांसाठी आणि अशा लोकांमुळे लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांच्या जगण्याचे वांदे होतात, नोकऱ्या जातात, व्यवसाय बंद पडतात ही स्थिती पुन्हा येऊ नये. लवकर लॉकडाऊन संपून करोना पूर्ण नियंत्रणात यावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत यातच सर्वांचे हित आहे.