Goan Varta News Ad

चांगल्या उमेदवारांना निवडा!

मतदारांनी आपल्या प्रभागाचा विकास करणाऱ्यांना संधी द्यावी. पैशांच्या आमिषाला बळी न पडता विकासासाठी चांगला उमेदवार निवडावा आणि निष्क्रिय नेत्यांना घरचा मार्ग दाखवावा!

Story: अग्रलेख |
23rd April 2021, 01:13 Hrs
चांगल्या उमेदवारांना निवडा!

महिन्याभरात दुसऱ्यांदा राज्यात निवडणुका होत आहेत. पाच पालिकांसाठी शुक्रवारी मतदान होईल. कोविडचे रुग्ण वाढत असताना आणि गोव्यातील कोविडची स्थिती हाताबाहेर जात असताना भीतीदायक वातावरणातच पाच पालिकांच्या निवडणुका होत आहेत. अशा स्थितीतही मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नागरिकांचे खरे तर कौतुकच व्हायला हवे. डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणूक झाली होती. त्यानंतर महापालिका आणि काही पालिकांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या. आता चार महिन्यांमध्ये ही तिसरी निवडणूक. आरक्षण, फेररचनेच्या गोंधळामुळे प्रकरणे न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मुदतीत ह्या निवडणुका होत आहेत. भाजप आणि काँग्रेस पुरस्कृत गटांसह काही ठिकाणी आप पुरस्कृत, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पुरस्कृत गट, अपक्ष, समविचारी उमेदवारांनी स्थापन केलेले पॅनेल पालिकांच्या निवडणुकांमध्ये आहेत. मागच्या महिन्यात झालेल्या पणजी महापालिका, डिचोली, वाळपई, पेडणे, काणकोण, कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा या पालिकांच्या निकालात भाजपाने बाजी मारली हे सर्वांनी पाहिले. काही ठिकाणी निवडून आलेल्या भाजप उमेदवारांमध्येच नंतर फूट पडली; तर काही ठिकाणी अविश्वास ठरावाचे राजकारण रंगले. अंतर्गत राजकारणामुळे पंधरा दिवसांत कुडचडे - काकोडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला पायउतार व्हावे लागले. विरोधी गटाने पोटनिवडणूक जिंकल्यामुळे साखळीच्या पालिकेत सत्तांतर झाले. मागच्या महिन्यातील निवडणुकीत भाजपाने सर्व ठिकाणी सत्ता मिळवली. त्याचा थोडाफार प्रभाव निश्चितच यावेळी निवडणुकांवर दिसू शकतो. पण, तरीही स्थानिक नेत्यांचाच पालिका निवडणुकांमध्ये प्रभाव जास्त दिसेल. मडगाव पालिकेसाठी भाजप पुरस्कृत, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युती, अपक्ष उमेदवारांची गर्दी आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि गोवा फॉरवर्डने युती केली आहे. काँग्रेसला हे मान्य नसले तरीही तिथे कामत आणि सरदेसाई एकत्र आले आहेत. त्यामुळे मडगाव पालिकेची निवडणूक रंगतदार होणार आहे. भविष्यातही विधानसभेच्या निवडणुकीत हे दोन पक्ष एकत्र येऊ शकतात, याचे संकेत मडगाव पालिकेच्या निवडणुकीने दिले आहेत. मुरगावमध्येही सत्ताधारी गटातील आमदार सक्रिय आहेत. स्वतः नगरविकास मंत्र्यांच्या मतदारसंघाचा भाग पालिका क्षेत्रात येत असल्यामुळे तिथे मिलिंद नाईक, पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो, कार्लुस आल्मेदा यांनी संयुक्तपणे भाजप पॅनेल निवडणुकीत उतरवले आहे. संकल्प आमोणकर, कृष्णा उर्फ दाजी साळकर यांच्या पॅनेलसह अपक्ष उमेदवारांची गर्दी आहेच. मडगाव आणि मुरगाव पालिकेच्या निवडणुकीत पॅनेलकडून एकमेकांवर गंभीर आरोप होत आहेत. सत्ताधारी गटाने विरोधी गटांची चालवलेली सतावणूक, काही ठिकाणी पोलिसांना पाळतीवर ठेवल्याचे तसेच काही ठिकाणी पैसे वाटपाचे आरोप झाल्यामुळे पालिकांच्या निवडणुका रंगतदार ठरत आहेत. मुरगावमध्ये ६८ हजार इतके सर्वाधिक जास्त मतदार आहेत; तर मडगावमध्ये ६६,४०० मतदार आहेत. सत्ताधारी भाजपाने म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे अशा पाचही ठिकाणी जोर लावला आहे. प्रचाराच्या काळातच ह्या पालिका क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणात कोविशिल्ड लसीकरण करण्यासाठी टीका उत्सव राबविण्यात आला. टीका उत्सव राज्यभर राबवला गेला; पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी सक्रियपणे टीका उत्सवात लोकांना लाभ घेण्यासाठी घरातून बाहेर आणले. काही ठिकाणी तर मतदारांनाच आणल्यासारखे उत्साहाने स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी वावरत होते. लसीकरणाचा लोकांना फायदा होईलच; पण पाच पालिका क्षेत्रांमध्ये इच्छुक उमेदवारांनीही लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे टीका उत्सवाचाही परिणाम मतदानावर दिसला तर आश्चर्य वाटू नये.
जास्त मतदान व्हावे यासाठी टीका उत्सव कामी आला तर ती एक सकारात्मक गोष्ट ठरेल; पण त्या मतदानाचा फायदा कोणाला होतो ते निकालानंतरच दिसेल. राज्यातील पाच पालिकांच्या ९३ प्रभागांसाठी २३१ बूथवर मतदान होणार आहे. कोविडमुळे सामाजिक अंतर, मास्कचा वापर सक्तीने होईल, याकडे निवडणूक आयोगाची यंत्रणा लक्ष ठेवणार आहे. पाचही पालिकांमध्ये १.८५ लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत. आपल्या प्रभागाशी थेट संबंध असलेला उमेदवार निवडण्याची संधी अशा निवडणुकांमधून असते. मतदारांनी आपल्या प्रभागाचा विकास करणाऱ्यांना संधी द्यावी. पैशांच्या आमिषाला बळी न पडता विकासासाठी चांगला उमेदवार निवडावा आणि निष्क्रिय नेत्यांना घरचा मार्ग दाखवावा!