Goan Varta News Ad

मृत्यूचे थैमान सुरूच; आणखी २१ बळी

नवे १,४१० रुग्ण; सक्रिय बाधित दहा हजारांपार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd April 2021, 12:29 Hrs
मृत्यूचे थैमान सुरूच; आणखी २१ बळी

बुधवारपासून राज्यात ‘नाईट कर्फ्यू’ची अंमलबजावणी सुरू केली झाल्यानंतर रात्री १० वाजल्यानंतर फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करताना पोलीस. (नारायण पिसुर्लेकर)

पणजी : राज्यात करोनामुळे मृत्यूचे थैमान सुरूच आहे. गुरुवारी आणखी २१ करोनाबा​धितांचा मृत्यू झाला. तर नवे १,४१० बाधित रुग्ण सापडले. त्यामुळे सक्रिय बाधितांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला. गेल्या २२ दिवसांत १३३ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. मृत आणि बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे गोमंतकीय जनता हवालदिल झाली आहे.
गुरुवारी ४६१ जणांनी करोनावर मात केली. पण, करोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या दररोज बाधित होणाऱ्यांच्या तुलनेत कमी होत असल्याने राज्याचा करोनातून बरे होण्याचा दर कमालीचा घसरला आहे. महिन्याभरापूर्वी हा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला होता. पण, गुरुवारी हा दर ८४.५० टक्क्यांवर आला होता. नव्या २१ मृतांमुळे आतापर्यंतच्या एकूण बळींचा आकडा ९६४ झाला आहे. बुधवार आणि गुरुवारच्या चोवीस तासांत ३,९०६ चाचण्या झाल्या आहेत.
वेरे येथील ६५ व ७३, आके येथील ४६, तिसवाडी येथील ७०, वास्को येथील ५३, गिरी येथील ४१, ताळगाव येथील ७८, पर्वरी येथील ५९, आसगाव येथील ६० तसेच ६५ वर्षीय दोन व ४८ वर्षीय एका पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला. याशिवाय फोंडा येथील ४६, कळंगुट येथील ८७, वास्को येथील ७०, नेरुल येथील ७०, डिचोली येथील ५३, फोंडा येथील ५६, वास्को येथील ८१ आणि ८२ वर्षीय अनोळखी महिलेचेही करोनामुळे निधन झाले. २१ पैकी ११ जणांचा बांबोळी येथील गोमेकॉत, आठ जणांचा मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला. तर दोघांना मृत्यू झाल्यानंतर म्हापसा येथील आझिलो इस्पितळात आणण्यात आले होते.
मडगाव हजारांवर; पर्वरी, कांदोळी सुस्साट!
मडगावात सक्रिय बाधितांच्या संख्येने गुरुवारी हजारांचा टप्पा ओलांडला. सद्यस्थितीत मडगावात १,१३४ सक्रिय बाधित आहेत. त्याखालोखाल पर्वरीत ८८७ व कांदोळीत ८८५ पणजीत ६८३, वास्कोत ६३३ व फोंडा येथे ६०० सक्रिय आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा
करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने बुधवारी सरकारी कार्यालयांत ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच येण्याची परवानगी दिली आहे. तसेच त्यासंदर्भातील अधिकार संबंधित खात्यांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत. सरकारने गुरुवारी आदेश जारी करीत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी लावण्यापासूनही सूट दिली आहे. या कर्मचाऱ्यांना १५ मेपर्यंत हजेरी पटावर सही करावी लागणार आहे.
कोल्हापूरहून येणार ११ टन ऑक्सिजन
केंद्रीय गृहमंत्रालयाने काही राज्यांना इतर राज्यांत ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश गुरुवारी दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर (महाराष्ट्र) येथून गोव्याला ११ टन ऑक्सिजन पुरवठा होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

फोंड्यातून ठरावीकमार्गांवरील बसेस बंद
करोना नियंत्रणात येईपर्यंत उसगाव खासगी प्रवासी बसमालक संघटनेने सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फोंडा ते डिचोली, फोंडा ते वाळपई, फोंडा ते साकोर्डा आणि फोंडा ते मोले या मार्गावरील खासगी बसेस बंद राहणार आहेत.