धोनी ब्रिगेडचा सलग तिसरा विजय

रसेल, कमिन्सच्या फटकेबाजीनंतरही केकेआर पराभूत


22nd April 2021, 12:34 am

मुंबई : आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स यांच्या आक्रमक अर्धशतकानंतरही कोलकाता नाईट रायडर्सचा १८ धावांनी पराभव झाला. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करत ३ बाद २२० असा विशाल धावा केल्या होत्या. २२१ धावांचा पाठलाग करताना केकेआरची अवस्था ५ बाद ३१ अशी झाली होती. त्यानंतर रसेल कमिन्स आणि दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत जोरदार प्रतिकार केला. त्यांचा हा प्रयत्न अखेर कमी पडला. केकेआरचा हा स्पर्धेतील सलग तिसरा पराभव असून चेन्नईचा सलग तिसरा विजय आहे.
आंद्रे रसेलने ५ बाद ३१ अशी अवस्था असताना मैदानात पाऊल ठेवले. त्यानंतर त्याने फक्त २२ चेंडूमध्ये ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ५४ धावा काढल्या. रसेलला दिनेश कार्तिकने ४० धावा काढत भक्कम साथ दिली. ही जोडी फुटल्यानंतर चेन्नई आरामात जिंकेल असे वाटत होते. पण त्याचवेळी पॅट कमिन्सने जोरदार फटकेबाजी केली. कमिन्सने सॅम करनच्या एकाच षटकांत ४ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ३० धावा काढल्या. कमिन्सने ३३ चेंडूमध्ये नाबाद ६५ धावा केल्या. वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा हे केकेआरचे शेवटचे दोन फलंदाज कमिन्सला स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नात धावबाद झाले आणि केकेआरचा पराभव झाला.
चेन्नई सुपर किंग्जचे २२१ धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या कोलकाताची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने पहिल्याच षटकात शुभमन गिलला शुन्यावर बाद करत केकेआरला पहिला धक्का दिला. त्यानंतर नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांनी केकेआरचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला पण, टिच्चून मारा करणाऱ्या दीपक चहरने राणाला ९ धावांवर बाद करत दुसरा सलामीवीरही पॅव्हेलियनमध्ये धाडला.
धोनीने चांगला स्विंग करत असलेल्या दीपकचा पहिला स्पेल लांबवला. धोनीचा हा निर्णय दीपकने योग्य ठरवत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन (७) लाही बाद केले. दीपकने त्याच षटकाच्या अखेरच्या सुनील नारायणलाही ४ धावांवर बाद करत आपला चौथा बळी टिपला. दीपकच्या या भेदक माऱ्यासमोर केकेआरची अवस्था ५ षटकात ४ बाद ३१ धावा अशी झाली. पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात एन्गिडीनेही चहरच्या पावलावर पाऊल टाकत राहुल त्रिपाठीला ८ धावांवर बाद केले. त्यामुळे केकेआरचा ३१ धावात निम्मा संघ माघारी गेला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने दमदार सुरुवात केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी चेन्नईला ७ षटकात ६० धावांपर्यंत मजल मारून दिली. ऋतुराज गायकवाडने पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी करत ३३ चेंडूत आपले अर्धशतक ठोकले. त्याच्या पाठोपाठ ड्युप्लेसिसही आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता. या दोघांनी १२ व्या षटकात चेन्नईचे शतक धावफलकावर लावले.
अखेर वरुण चक्रवर्तीने कोलकात्याला १३ व्या षटकात पहिले यश मिळवून दिले. त्याने ४२ चेंडूत आक्रमक ६४ धावांची खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला बाद केले. दरम्यान, ड्युप्लेसिसने आपले अर्धशतक पूर्ण केले. ड्युप्लेसिस आणि मोईन अली यांनी १६ व्या षटकात सीएककेला १५० च्या पार पोहचवले. अखेरची काही षटके राहिली असल्याने मोईन अली आणि ड्युप्लेसिसने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पण, सुनिल नारयणने त्याला २५ धावांवर बाद करत चेन्नईला दुसरा धक्का दिला.
मोईन अली बाद झाल्यानंतर धोनी क्रिजवर आला. त्याने अडखळत्या सुरुवातीनंतर अखेर मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. त्याने आणि ड्युप्लेसिसने सीएसकेला १८ व्या षटकात १८६ धावांपर्यंत पोहचवले. अखेरची दोन षटके राहिली असताना ड्युप्लेसिसने रसेलला सलग तीन चौकार मारत चेन्नईला २०० पार पोहचवले. पण, रसेलने आपल्या अखेरच्या चेंडूवर ८ चेंडूत १७ धावा करणाऱ्या धोनीला बाद केले. पण, अखेरच्या षटकात शतकाच्या जवळ पोहचलेल्या ड्युप्लेसिसने पॅट कमिन्सच्या दुसऱ्या चेंडूवर आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारले. आता ड्युप्लेसिसला शतकासाठी २ चेंडूत ६ धावांची गरज होती. पण, त्याला १ धावच करता आली. अखेरच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने षटकार मारत चेन्नईला २२० धावांपर्यंत पोहचवले.
......
धावफलक :
चेन्नई सुपर किंग्ग : २० षटकांत ३ बाद २२० धावा.
कोलकाता नाईट रायडर्स : १९.१ षटकांत सर्वबाद २०२ धावा.