पाच पालिकांसाठी ५३२ अर्ज दाखल

अर्जांची छाननी आज; माघार घेण्यासाठी उद्यापर्यंत मुभा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th April 2021, 12:38 am
पाच पालिकांसाठी ५३२ अर्ज दाखल

पणजी : राज्यातील उर्वरित पाच पालिकांच्या निवडणुकांसाठी एकूण ५३२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात गुरुवारी ९५ अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय सर्वण-कारापूर आणि वेळ्ळी पंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी दहा अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची शुक्रवार, ९ रोजी छाननी होणार आहे. शनिवार, १० रोजी अर्ज मागे घेण्यास मुभा राहील. त्यानंतर निवडणूक रिंगणात नक्की किती उमेदवार आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल.
राज्यातील महापालिका आणि अकरा पंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर राखीवता आणि प्रभाग फेररचनेच्या मुद्द्यावरून मुरगाव, मडगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या पाच पालिकांतील काहींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीच्यावेळी राखीवता आणि प्रभाग फेररचनेत दोष आढळल्याने खंडपीठाने पाचही पालिकांच्या निवडणुका रद्द करून नव्याने प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाच्या आदेशावर मोहोर उमटवल्याने या पाच पालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने नव्याने प्रक्रिया सुरू करून या पाच पालिकांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून २४ रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
सर्वाधिक अर्ज मुरगावातून
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानुसार शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे गुरुवारी पाचही पालिकांमधून एकूण ५३२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ‌सर्वाधिक १५७ अर्ज मुरगाव पालिकेतून दाखल झाले आहेत. त्याखालोखाल मडगाव पालिकेसाठी १३१, म्हापसा पालिकेसाठी १२२, केपे पालिकेसाठी ७६ आणि सांगे पालिकेसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कारापूर पंचायतीच्या प्रभागासाठी ६ तर वेळ्ळी पंचायतीच्या प्रभागासाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.