राज्यात ११ ते १४ एप्रिलपर्यंत लसीकरणाचा ‘टीका उत्सव’

मुख्यमंत्री : नाईट कर्फ्यू पर्याय नाही; लॉकडाऊनला पंतप्रधानांचीही असहमती

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th April 2021, 12:36 am
राज्यात ११ ते १४ एप्रिलपर्यंत लसीकरणाचा ‘टीका उत्सव’

पणजी : देशातील अन्य काही राज्यांप्रमाणेच गोव्यातही करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यामुळे ११ ते १४ एप्रिल असे चार दिवस ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यासाठी पंचायत स्तरावर ‘टीका उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी ही घोषणा केली.
लॉकडाऊन हा पर्याय नाही. गेल्या वर्षी सुविधा नसल्यामुळे लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला. आता सुविधा उपलब्ध आहेत. त्या सुविधांचा वापर करून करोना नियंत्रणासाठी काम करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी सर्व राज्यांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले.
मा. ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत म्हणजे ११ ते १४ एप्रिल असे चार दिवस राज्यभर ‘टीका उत्सव’ होणार आहे. ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यासाठी पंचायत स्तरावर जिथे सुविधा आहेत त्या सुविधांचा वापर करून तिथे टीका उत्सव होईल. कोणत्या पंचायतींमध्ये टीका उत्सव होईल, त्याची यादी शुक्रवारी जाहीर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
युवकांनी करोना चाचण्या, करोना नियंत्रणासाठी जागृती, लसीकरण यासाठी जागृती करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. गोव्यातही तरुणांनी जागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.
लॉकडाऊन हा पर्याय नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे. करोनाचे वाढते रुग्ण नियंत्रणात आणण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन, लसीकरण या गोष्टींवर भर देण्यासाठी संपूर्ण प्रशासन काम करणार आहे, जिल्हाधिकारी, पोलीस, आरोग्य खाते अशा महत्त्वाच्या खात्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
लघु प्रतिबंधित क्षेत्रावर भर!
गोव्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे ज्या भागात जास्त रुग्ण सापडतात तिथे चाचण्या वाढवण्यासह लघु प्रतिबंधित क्षेत्र करण्यात येईल. तसा पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना दिला आहे. नाईट कर्फ्यू अर्थात रात्रीच्या संचारबंदीचा प्रभावी परिणाम होत नाही. शिवाय पर्यटन राज्य असल्यामुळे रात्रीच्या संचारबंदीचा गंभीर परिणाम पर्यटनावर होऊ शकतो. त्यापेक्षा लोकांनी आवश्यकता नसेल तेव्हा घरातून बाहेर पडू नये, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
उत्तर गोव्यात काही प्रमाणात निर्बंध लागू
- दोन दिवसांत रुग्णांची संख्या पाचशेच्या वर गेल्याने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी काही प्रमाणात निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध उत्तर गोव्यातील सामाजिक, धार्मिक, क्रीडा, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर मेळाव्यांसाठी लागू असतील.
- शंभर जणांची आसनक्षमता असलेल्या सभागृहांत जास्तीत जास्त ५० व्यक्तींना प्रवेश द्यावा. ज्या सभागृहांची आसनक्षमता शंभरपेक्षा अधिक आहे, त्यांना जास्तीत जास्त १०० लोकांनाच प्रवेश देण्यास मुभा राहील. खुल्या जागेतील मेळाव्यांमध्ये जास्तीत जास्त २०० लोकांना सहभागी होता येईल. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.
बाधितांची संख्या ३ हजारांहून जास्त
राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहेत. राज्यात गुरुवारी ५८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजारांवर पोहोचली आहे. तर दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ८४२ झाली आहे.

हेही वाचा