साकोर्डे येथील ब्रह्मा बॉईज व्हॉलिबॉल स्पर्धेत विजयी


01st March 2021, 11:40 pm

कुळे : कुळे व्हॉलिबॉल लव्हर्स आयोजित कै. ठको लाम्बोर फ्लडलाईट व्हॉलिबॉल स्पर्धेत साकोर्डे येथील ब्रम्हा बॉईज संघ विजयी ठरला. त्यांनी सातेरी व्हॉलिबॉल संघ सातपाल-साकोर्डे यांचा १५-१४, १५-१४ अशा सेटनी दारुण पराभव केला. ही स्पर्धा कुळे-शिगाव पंचायतच्या मैदानावर खेळविण्यात आली होती. स्पर्धा सावर्डे मतदारसंघातील व्हॉलिबॉल गटासाठी मर्यादित होती. विजेत्या गटाला रोख बक्षीस रुपये २० हजार व चषक देण्यात आला. तसेच इतर वैयक्तिक बक्षिसेही देण्यात आली.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला मुख्य अथिती म्हणून कुळे-शिगावचे सरपंच मनीष लाम्बोर, खास अथिती पंच सदस्य नंदिश देसाई, यशवंत वेरेकर, भानुदास देसाई, एच. ए. सुरेश, प्रवीण गाड आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला मुख्य अथिती म्हणून राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, तसेच खास अथिती सावर्डेचे सरपंच संदीप पावसकर, कुळे सरपंच मनीष लाम्बोर, राउंड फॉरेस्ट ऑफिसर ज्ञानेश्वर कुडाळकर, पंच नंदिश नाईक देसाई, समाज कार्यकर्ता टोनी कोस्टा, सागर गांजेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला कुळे व्हॉलिबॉल लव्हर्स संघटनेचे अध्यक्ष यशवंत वेरेकर यांनी सर्वांचे स्वागत केले व मान्यवरांची ओळख करून दिली. मुख्य अथिती खासदार विनय तेंडुलकर यांनी इतर मान्यवरांच्या उपस्थित पारंपरिकरीतीने स्पर्धेचे उद्घाटन केले. गेली कित्येक वर्षे कुळे व्हॉलिबॉल लव्हर्स संघटना सावर्डे मतदारसंघात व्हॉलिबॉल स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करत असल्याबद्दल तेंडुलकर यांनी संघटनेचे अभिनंदन केले. यावेळी संदीप पावसकर यांनीही मार्गदर्शन केले. किस्तोद फर्नांडिस यांनी सूत्रसंचालन केले व त्यांनीच आभार मानले.