‘आप’चा भाजप, काँग्रेसला पर्याय म्हणून उदय

गुजरात महापालिका निवडणूक : सूरत महापालिकेत २७ जागांवर विजय


24th February 2021, 12:15 am
‘आप’चा भाजप, काँग्रेसला पर्याय म्हणून उदय

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळवले आहे. गुजरात हा अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला राहिला आहे. तेथे काँग्रेसला पिछाडीवर ठेवत आपने केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे.
आम आदमी पक्षाने दिल्लीत सहा वर्षांपासून शिक्षण, आरोग्य सेवा, वाहतूक, पाणी, वीज आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले आहे. काँग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणून प्रत्येक राज्यातच लोक आम आदमी पक्षाकडे अपेक्षेने पहात आहेत. एक राज्य म्हणून गुजरात नेहमीच भाजपचा गड राहिला आहे. तेथील नागरिकांनी आतापर्यंत भाजप किंवा काँग्रेस पक्षाला मतदान केले आहे. यावेळी मात्र गुजरातवासीयांनी आपवर मोठा विश्वास व्यक्त केला आहे.
गुजरात महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांनी गुजरातचे अध्यक्ष गोपाल इटालिया यांच्या नेतृत्वात दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या विकासाच्या मॉडेलविषयी लोकांशी चर्चा केली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर हे सिद्ध झाले आहे की, गुजरातमधील नागरिकांनी केजरीवाल सरकारच्या विकासाच्या मॉडेलला पसंती दर्शवली आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी निवडणुकीपूर्वी घेतलेल्या प्रचंड मेहनतीचे चिज झाल्याचे पहायला मिळत आहे.
महाराष्ट्र ते गोवा आणि आता गुजरातपर्यंत आम आदमी पक्षाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतातील लोकांना भाजप आणि काँग्रेसला पर्याय ठरणारा राष्ट्रवादी विचारसरणी आणि विकास करू शकेल असा राजकीय पक्ष हवा होता, जो आता त्यांना आम आदमी पक्षाच्या रूपात मिळाला आहे, अशा प्रतिक्रिया आपच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहेत.

हेही वाचा